मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त
थिवी मतदारसंघाचे आमदार आणि मत्स्योद्योग मंत्रिपदी असलेले नीळकंठ हळर्णकर हे एका बाजूने ‘आरजी’ आणि दुसऱ्या बाजूने किरण कांदोळकर यांचे आव्हान पेलून २०२२ साली विजयी झाले होते. त्यावेळी त्यांच्यापुढे तगडे आव्हान होते; परंतु यावेळी ‘आरजी’चे माजी प्रमुख मनोज परब यांनी आपली तलवार म्यान केल्याने कांदोळकर विरुद्ध हळर्णकर अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. किरण कांदोळकरांनी कितीही शड्डू ठोकले तरी त्यांच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपण तयार असल्याचे हळर्णकर छातीठोकपणे सांगत आहेत. हळर्णकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर जोपर्यंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आपल्याला आशीर्वाद आहे, तोपर्यंत ‘भिवपाची गरज ना...’ आणि ते खरेदेखील आहे; कारण ज्यावेळी मंत्रिमंडळात कॉंग्रेसमधून आलेल्या आमदारांना सामावून घेण्याचा प्रश्न यायचा त्यावेळी नीळकंठ हळर्णकरांना डच्चू मिळेल, असे म्हटले जायचे; परंतु घडले भलतेच, त्यामुळे आशीर्वाद असेल नसेल; परंतु त्यांच्यावर वरदहस्त नक्कीच आहे.
तरुणाई विजयसोबत?
काँग्रेससोबतच्या आघाडीच्या चर्चेला तूर्तास स्थगिती दिल्यानंतर आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई पक्षाला बळकटी देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. काहीच दिवसांपूर्वी ‘नीट’ पेपरफुटीचा विरोध करीत तरुणांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर छेडलेले आंदोलन, या आंदोलनाचे गोव्यात उमटलेले पडसाद आणि भाजपविरोधात तयार झालेले वातावरण याचा फायदा उठवण्याचे प्रयत्न सरदेसाईंनी सुरू केले आहेत. त्यामुळे युवावर्गाशी त्यांनी संवादही वाढवला आहे; परंतु गोव्यातील तरुणाई सरदेसाईंच्या पाठिशी उभी राहणार? की तीही ‘अजीब है गोवा के लोग’ हे पं. नेहरूंचे वाक्य खरेच असल्याचे सिद्ध करणार? हे निवडणूक निकालानंतरच कळेल.
फातोर्ड्यात रंगत वाढली!
फातोर्ड्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापू लागले आहे. राजकारणात ‘नाही म्हणजे आहे आणि आहे म्हणजे नाही’, याचा अनुभव मतदारांना नवा नाही. दामू नाईक यांनी फातोर्ड्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी त्यांचा वाढलेला मतदारसंघातील वावर, विविध कार्यक्रमांतील सहभाग आणि सुरू झालेला लोकसंपर्क पाहता चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हेही फातोर्ड्यातून मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची उमेदवारी तर निश्चितच आहे. त्यामुळे दामू, गिरीश आणि विजय अशी तिरंगी लढत रंगली तर फातोर्ड्याच्या राजकीय आखाड्यात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे!
मेरे अंगने मे!
सध्या गोवा सरकारने कुशावती या तिसऱ्या जिल्ह्याची स्थापना केली असली तरी त्यासाठी लागणारी प्रशासकीय साधनसामग्री उभारली नसल्याने या जिल्ह्याचे मुख्यालय मडगाव की केपे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची कुचंबणाही झाली आहे. याचाच फटका या जिल्ह्यासाठी नेमलेले नवीन जिल्हाधिकारी गुरुदास तुबकी देसाई यांनाही बसला. त्यांची यापदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मडगाव येथे असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका केबिनमध्ये जाऊन बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स यांना ते रुचले नाही. तुम्ही कुशावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मग तुमचे येथे काय काम? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे या दोघांतील वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी तो मिटवण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव कंदवेलू यांना स्वतः मडगावमध्ये जावे लागले. दोन जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झालेला हा ‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है!’ वाद सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. ∙∙∙
चर्चा गणेश गावकरांची!
सावर्डे मतदारसंघाचे आमदार तथा विधानसभेचे सभापती गणेश गावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. त्यावेळचा फोटो प्रसारमाध्यमांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडल्सवर घालताच सावर्डे मतदारसंघातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. राजकारणाची आवड असलेल्यांनी तर हा फोटो आपल्या स्टेटसवरही ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच इतर केंद्रीय नेत्यांशीही गणेश गावकर यांचे चांगले संबंध आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांना पंतप्रधानांशी चर्चा करायला मिळाली. त्यामुळे गणेश गावकर हे केंद्रीय नेत्यांच्या ‘हुशार’ आणि ‘व्हिजनरी’ नेत्यांच्या यादीत तर नाहीत ना? अशीच चर्चा रंगली आहे.
दामूंची ट्रेन टू वालांकिणी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ख्रिस्ती धर्मियांना वालांकिणी फेस्ताला जाता यावे म्हणून खास ट्रेनची सोय केली असून गोव्यातील भाविकांना घेऊन ही खास ट्रेन २८ ऑगस्ट रोजी वालांकिणीला रवाना होणार आहे. यासाठी दामू नाईक यांच्या फातोर्डा येथील कार्यालयात रजिस्ट्रेशनही सुरू झाले आहे. या वालांकिणी वारीचा संपूर्ण खर्च दामू स्वतः करणार आहेत. त्यामुळे दामू पुन्हा एकदा फातोर्डा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, या चर्चेने जोर धरला आहे. कदाचित काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील युतीची गाडी सध्या अडलेली असताना दामूंची ही ‘ट्रेन टू वालांकिणी’ त्यांची स्वतःची राजकीय ट्रेन रुळावर आणण्यास फायद्याची ठरेल, असे दामू नाईक यांना वाटत तर नसावे ना? ∙∙∙
खरेच, ‘मगो’त दलबदलू ‘एन्ट्री’ करणार?
‘मगो’ पक्षात आता दलबदलू राजकारण्यांना तिकीट मिळणार नाही. काहीजण माझ्याशी संपर्क साधत आहेत, असा दावा पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला असला, तरी त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. ‘मगो’मध्ये येण्यासाठी नेमके कोण संपर्क साधत आहेत? पक्षाची ‘जेन-झी’शी असलेली कनेक्टिव्हिटी किती? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलबदलूंची ‘मगो’कडे नजर आहे तरी का? आणि खरेच या पक्षाकडे येणारे किती आहेत? हे प्रश्न आता चर्चेत येत आहेत. एकेकाळी गोव्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या ‘मगो’कडे सध्या केवळ दोनच आमदार आहेत. अशा परिस्थितीत दलबदलूंच्या उड्या रोखण्याची भूमिका पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरणार? ढवळीकरांनी ‘काहीजण संपर्कात’ असल्याचे सांगितले; पण त्यांची नावे ते उघड करायला तयार नाहीत. तसेच ‘मगो’च्या दारात उभे असलेले हे दलबदलू नेमके कोण? असा सवाल आता ‘मगो’चे मतदारच विचारू लागले आहेत.
पुत्रप्रेमाचा आदर्श
भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच मडकईची जागा चिरंजीव मिथिलसाठी सोडण्याची तयारी जाहीर करून मंत्री सुदिन ढवळीकरांनी ‘पुत्रप्रेम’ या राजकीय परंपरेला आणखी एक नवा अध्याय जोडला. भाऊसाहेबांनी गोव्याच्या राजकारणात जनतेला केंद्रस्थानी ठेवून राजकारणाची पायाभरणी केली; आणि आज त्याच दिवशी मतदारसंघ मात्र घरच्या वारसासाठी राखून ठेवण्याची तयारी दिसते, हा योगायोग म्हणायचा की राजकारणातील काळाचा महिमा? उद्या कदाचित मतदारांनी कोणाला निवडायचे यापेक्षा कोणत्या घराण्याने कोणता मतदारसंघ ‘सोडायचा’ यावरच चर्चा होईल! म्हटले तर मडकई मतदारसंघ; पण तयारी मात्र ‘मिथिलसाठी राखीव’ अशीच दिसते.
कळंगुटमध्ये अशीही विकासाची गंगा!
कळंगुटमध्ये विकासाची गंगा वाहतेय; पण यावेळी ही गंगा थेट रस्त्यावरच्या खड्ड्यातून वाहताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला खोदलेला चर पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला असून, त्याभोवती साधे अडथळे किंवा सुरक्षाकवचही नाही. त्यामुळे विकासकाम आणि धोक्याचा सापळा यातील फरकच नागरिकांना कळेनासा झाला आहे. पर्यटकांनी कळंगुटचा समुद्र पाहावा की रस्त्याकडेला तयार झालेला ‘लघु तलाव’, असा प्रश्न पडण्याची वेळ आली आहे. विकासकामे अशीच सुरू राहिली तर उद्घाटनाच्या फितीबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही ‘रामराम’ करण्याची वेळ येऊ नये, एवढीच अपेक्षा!
मांद्रेकर धाडस दाखवतील?
राज्य सरकारच्या अनुसूचित जाती-जमाती वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद मांद्रेकर हे शिवोली मतदारसंघातून आपण अपक्षच लढणार, असे सांगण्याचे धाडस कधी दाखवणार आहेत. शिवोलीत भाजपच्या दिलायला लोबो या आमदार आहेत. त्यामुळे मांद्रेकर यांच्या उमेदवारीच्या दाव्यावर तेथे विचार होणार नाही, हे ठरून गेलेले आहे. असे असतानाही महामंडळाचे अध्यक्षपद टिकवण्यासाठी ते भाजपची उमेदवारी हवी आहे, असे म्हणत दिवस ढकलत असल्याची शंका आहे. त्यांनी अपक्ष लढणार, असे सांगितल्यास महामंडळाचे अध्यक्षपद धोक्यात येणार, असे त्यांना वाटत असावे.
कार्यकर्त्यांच्या मनात भीती!
म्हापशात आगामी विधानसभा निवडणुकीचे आतापासूनच वारे वाहू लागले असून राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. सत्ताधारी भाजपकडून उमेदवारीचे तिकीट नक्की कोणाला मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु सामाजिक कार्यकर्ते मयूर सावकार यांनी या भाजपच्या तिकिटावर थेट दावा ठोकला आहे. दुसरीकडे, विद्यमान आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा हेसुद्धा या तिकिटाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सध्या मयूर सावकार यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते फिरताना दिसत आहेत, ज्यांतील बहुतांश कार्यकर्ते हे काँग्रेस नेते सुधीर कांदोळकर यांचे समर्थक किंवा जवळचे आहेत! मध्यंतरी सुधीर कांदोळकर पुन्हा भाजपमध्ये वापसी करणार, अशा चर्चांनी जोर धरला होता. मात्र, सुधीरबाब अजूनही काँग्रेसचा ‘हात’ घट्ट धरून आहेत आणि तेथून तिकिटाचे प्रमुख दावेदार आहेत; पण खरा गोंधळ तर भाजपच्या तिकिटावरून सुरू आहे. कारण सध्या सावकार यांच्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात उद्या जर तिकीट पुन्हा जोशुआ यांनाच मिळाले तर आपला चांगलाच ‘पचका’ होईल, या विचाराने पाल चुकचुकू लागली असून कार्यकर्ते पार संभ्रमात पडले आहेत!
...म्हणून ‘त्यांच्या’कडे दुर्लक्ष
राज्यातील ‘एसटी’ समाजाला विधानसभेत आरक्षण देण्यासंदर्भातील अधिसूचना केंद्र सरकारने जारी केल्यानंतर आता क्षत्रिय मराठा समाज आणि भंडारी समाजाच्या इच्छाही जाग्या होण्यास सुरवात झाली आहे. क्षत्रिय मराठा समाजाने काहीच दिवसांपूर्वी जनगणना पूर्ण झाल्यानंतर ‘एसटी’ समाजाला आरक्षण देण्याची विनंती केली. त्यानंतर आता भंडारी समाजाचे काही नेतेही ‘एसटी’प्रमाणेच भंडारी समाजालाही विधानसभेत आरक्षण मिळावे, अशी मागणी करीत आहेत. गोव्यात आपल्या समाजाची लोकसंख्या जास्त असल्याने सरकारने आपल्या मागण्या मान्य न केल्यास सरकारला निवडणुकीत फटका बसेल, असा त्यांचा समज आहे; पण याआधीही या नेत्यांचा हा केवळ ‘समज’च असल्याचे सिद्ध झालेले असल्याने सरकारनेही भंडारी नेत्यांच्या मागणीकडे लक्ष देणे बंद केल्याची चर्चा सुरू आहे.
काँग्रेसचे चाललेय काय?
एका बाजूला भाजपविरोधी आघाडी उभी करण्यासाठी काँग्रेसने इतर पक्षांसाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत, तर दुसऱ्या बाजूला चाळीसही मतदारसंघांत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यक्रमांची आखणी सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतल्याने या हालचालींना आणखी रंग चढला आहे. त्यामुळे काँग्रेसला आघाडी हवी आहे की, प्रत्येक मतदारसंघात स्वतःच्या बळावर लढायचे आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांपेक्षा राजकीय निरीक्षकांनाच जास्त पडला आहे. म्हणजे दार उघडे आघाडीसाठी; पण घराची डागडुजी स्वतःची!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.