

सासष्टी: गोव्यात चित्रपट संस्कृती रुजत असून लघुपट, म्युझिक व्हिडिओ आणि विविध दृक्श्राव्य निर्मितींमधून नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात फिल्म सिटी उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत गोवा मनोरंजन सोसायटीचे कार्यकारी समिती सदस्य शर्मद पै रायतुरकर यांनी सांगितले.
या महास्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता रवींद्र भवन, मडगाव येथील लयभास्कर खाप्रुमाम पर्वतकर सभागृहात होणार आहे. याबाबतची माहिती युव संजिवनीचे शर्मद पै रायतुरकर यांनी मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
संजिवनी, कोकणी नाटक संगीत अकादमी आणि श्री दामबाबाले घोडे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा कवी दामू नाईक यांच्या दहा गीतांचे चित्रीकरण व संगीतबद्ध करण्यासाठी ‘गीत चित्रंगी’ महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला गोव्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ४५ निर्मात्यांनी ७८ गाण्यांचे चित्रीकरण केले.
यावेळी गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी, दामबाबाले घोडेचे दिलीप नाईक, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर, तसेच केदार सावंत आणि साईराज कामत उपस्थित होते. बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन रवींद्र भवन, मडगावच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल तसेच बॉलिवूड दिग्दर्शक आदित्य जांभळे यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
महास्पर्धेत प्रत्येक दहा गीतांमधून उत्कृष्ट ठरलेल्या दोन गीतांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच अंतिम फेरीतील दहा उत्कृष्ट गीतांचे या सोहळ्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. सिनेमॅटोग्राफर आकाशदीप तसेच दिग्दर्शक व अभिनेता पार्था आकेरकर यांनी या महास्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.