शिवसेनेची शर्यत!
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा वर्धापनदिन पहिल्यांदाच गोव्यात साजरा केला. शिवसैनिक म्हटले की जोश, उत्साह, घोषणा, तुफान भाषण हे ठरलेले. शिवसेनेच्या सभेला कंटाळा येत नसतो, तीच स्थिती शुक्रवारच्या सभेत पाहायला मिळाली. येथे स्थानिक कार्यक्रमांना पाचशे लोक जमविणे मुश्कील असते. अशा परिस्थितीत हजारभर लोक आले हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. शेवटी राजकारणात कोणी कमजोर नसतो. ससा शर्यत हरून कासव जिंकतो. त्यामुळे गोव्यात कूर्मगतीने वाटचाल करणाऱ्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व दाखविले तर कोणाला नवल वाटू नये. ∙∙∙शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा वर्धापनदिन पहिल्यांदाच गोव्यात साजरा केला. शिवसैनिक म्हटले की जोश, उत्साह, घोषणा, तुफान भाषण हे ठरलेले. शिवसेनेच्या सभेला कंटाळा येत नसतो, तीच स्थिती शुक्रवारच्या सभेत पाहायला मिळाली. येथे स्थानिक कार्यक्रमांना पाचशे लोक जमविणे मुश्कील असते. अशा परिस्थितीत हजारभर लोक आले हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. शेवटी राजकारणात कोणी कमजोर नसतो. ससा शर्यत हरून कासव जिंकतो. त्यामुळे गोव्यात कूर्मगतीने वाटचाल करणाऱ्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व दाखविले तर कोणाला नवल वाटू नये.
कामतांचा आदेश!
मडगाव पालिकेत लहानसहान कामांसाठी लोकांना हेलपाटे मारावे लागतात. ‘कॉमन मॅन’ हा कटू अनुभव नेहमीच घेत असतो. शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी मडगाव पालिकेत जनता दरबार घेऊन लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी अनेकांनी या पालिकेच्या कारभाराचा अनुभव त्यांना कथन केला. लोकांना ताटकळत ठेवू नका, त्यांची कामे त्वरित करून द्या, असा कामत यांनी उपस्थित पालिका अधिकाऱ्यांना आदेश दिला. व सर्व अधिकाऱ्यांनी मान डोलवत त्यांचा हा आदेश स्वीकारला खरा. मात्र, त्याची खरोखरच अंमलबजावणी होणार की नाही, यावर येणारा काळच उत्तर देईल. पालिकेत राजकीय वशिल्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांकडून लोकांच्या भल्याचे काम होईल, अशी अपेक्षा ठेवणार तरी कोण? अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.
आंतोन वाझ यांचा त्रागा!
रहिवाशांनी आणखी किती काळ त्रास सहन करायचा? असा सवाल करत आमदार आंतोन वाझ यांनी सांडपाणी समस्येवर सरकारला जाब विचारला असला, तरी या प्रश्नात राजकीय उपरोधाची छटा अधिक दिसते; कारण वाझ हे विरोधी पक्षाचे नव्हे, तर सत्ताधारी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे हा सवाल सरकारला विचारतानाच तो काहीअंशी स्वतःच्या राजकीय भूमिकेलाही लागू होतो. सरकारच्या स्थैर्यासाठी खांदा द्यायचा आणि नंतर त्याच सरकारच्या कामकाजावर सार्वजनिकपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, हा प्रकार आता गोव्यात नवा राहिलेला नाही. त्यामुळे वाझ यांचा प्रश्न ‘रहिवाशांनी किती काळ सहन करायचे?’ यापेक्षा ‘सत्तेला पाठिंबा देणाऱ्यांनी सरकारला कामाला कधी लावायचे?’ असा अधिक बोचरा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
‘स्मार्ट’ शब्दाची लोकांत भीती!
राज्य सरकार म्हणते पाण्याचा साठा मुबलक आहे; पण लोक म्हणतात, नळातले पाणी कुठे आहे ते आधी दाखवा. सरकार म्हणते, स्मार्ट मीटर लावा, तर लोक म्हणतात, आधी वीज नियमित द्या. सरकार म्हणते, प्रीपेड व्यवस्था चांगली, तर लोक म्हणतात, आमचे आयुष्यच आधीपासून पोस्टपेड समस्यांनी भरलेले आहे! एकेकाळी सरकारने मोठ्या थाटामाटात ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखवले होते. रस्ते स्मार्ट, वाहतूक स्मार्ट, सुविधा स्मार्ट... पण जवळपास दशक उलटले तरी लोक अजूनही त्या ‘स्मार्ट’पणाचा शोध घेत आहेत. त्यामुळे आता सरकार कोणत्याही योजनेसमोर ‘स्मार्ट’ हा शब्द लावताच लोक सावध होतात. स्मार्ट मीटर, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट सेवा... काहीही असो, आधी संशय आणि मग विरोध, अशीच सध्याची स्थिती दिसते.
पोलिसांची चौकशी कोण करणार?
लोकांची तक्रार आली की, पोलिसांनी चौकशी करायची, हे सर्वसामान्यांना माहीत असलेले सरळ गणित; पण हल्ली हे गणित जरा गुंतागुंतीचे झाले आहे. कारण, लोकांच्या तक्रारींची चौकशी करण्याऐवजी काही ठिकाणी पोलिसांच्या कामकाजाबाबतच तक्रारी वाढू लागल्या आहेत. मग त्या तक्रारी वरिष्ठांकडे जातात, समित्या बसतात, अहवाल मागविले जातात आणि अखेर पोलिसांचीच चौकशी सुरू होते. यामुळे सामान्य माणूस जरा गोंधळलाच आहे. मूळ तक्रार कोणाची होती, चौकशी कोणाची सुरू आहे आणि जबाब कोण देतो आहे, हे समजून घेण्यासाठी वेगळाच तपास अधिकारी लागेल की काय, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे पोलिस नेमके लोकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आहेत की, पोलिसांवरील तक्रारींची चौकशी करण्यासाठी, हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे.
परतीची ‘नीट’, नीटपणे व्हावी!
उद्या ‘नीट’ परीक्षा परत होत आहे. गोव्यात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कदंब महामंडळाने विविध ठिकाणांहून विद्यार्थांसाठी विशेष बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. सरकारने उचललेले हे स्तुत्य पाऊल; परंतु परीक्षा, पेपर फुटल्याविना होणे फार गरजेचे आहे. आमच्या देशात प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार अणुरेणूत घुसला, रूतला आहे. फार मोठे रॅकेट, साखळी पेपरफुटीमध्ये होती, असे प्राथमिक चौकशीत दिसून आले. जी जी छिद्रे भ्रष्टाचारात, पेपरफुटीत आढळली ती योग्य सिमेंट लावून बंद केली असावी, अशी आशा करूया. डॉक्टरांची पुढची पिढी घडवणारी ही परीक्षा निरोगीपणे सुरळीतपणे होवो, हीच सदिच्छा.
साचू नयेत राज्य पुरस्कार!
भोलानाथला विचारले - पाऊस पडेल? भोला वदला, कला संस्कृती खात्यात पुरस्कारासाठीच्या अर्जांचा पाऊस पडतो. गेल्या वर्षीच्या अर्जांचा ढीग छताचे चुंबन घेतो. त्यांचा निकाल नाही. आता हा पूर. ४० वर्षांअगोदर चार नाटकांनी भूमिका केलेला नट अर्ज करतो. ८० पानांची चोपडी लिहिलेला, कुणीही ओळखत नाही, असा कथित लेखक अर्ज करतो. भजनावेळी टाळ वाजवणारा भाऊही संगीत कॅटगरीत आहे. लोककलाकार ताईने अर्ज करून धमकी दिलीय, महिलांना एकही पुरस्कार दिला नाही तर बघा. काही ‘ए वन’ कलाकार, लेखक आपणहून अर्ज करत नाहीत. ज्येष्ठांनी याचकासारखे अर्ज करणे ठीक नाही, असे भोला म्हणतो. ‘सु-मोटो’ दखल घेऊन अशांना पुरस्कार प्रदान केला जावा, भोला म्हणाला. कॉपी मारलेली कोकणी नाटके पाहून भोला हा विक्रम-वेताळातल्या वेताळासारखा बरळू लागला, असे वाटले. तो खरे बोलत असावा.
महापौरांचे दुसरे कार्यालय!
महापौर रोहित मोन्सेरात यांनी या महिन्याच्या सुरवातीपासून पणजीतील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यास सुरवात केली. त्यामुळे ते महानगरपालिकेच्या आपल्या कार्यालयात अमुक वेळेत उपलब्ध असतील, असेही त्यांनी जाहीर केले. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुकही होत आहे; परंतु दोन दिवसांपूर्वी त्यांनी वडील तथा आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या मिरामार येथील कार्यालयात बैठक घेतली आणि शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पाणीपुरवठा, जलसंवर्धन आणि दीर्घकालीन नियोजनाशी संबंधित बाबींवर विविध विभागांचे प्रतिनिधी व तांत्रिक तज्ज्ञांशी चर्चा केली. महानगरपालिकेत त्यांना भेटण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना परत जावे लागले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, हे महापौरांना लक्षात घ्यावे लागेल. अन्यथा मिरामारमधील कार्यालयातील बैठकीवरून ते नेमक्या कोणत्या कार्यालयात उपलब्ध असणार, हे नागरिकांना शोधावे लागू नये म्हणजे मिळवले.
ही आयडिया कुणाची?
फोंडा, मडकईतील राजकीय वातावरण तापले आहे. कारण एवढेच की, येणारी विधानसभा निवडणूक. फोंडा मतदारसंघाचे आमदार आणि बडे नेते रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंड्याला गेले आठ महिने आमदारच नाही. आता विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने मडकईचे आमदार आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंडा मतदारसंघात लुडबूड चालवली आहे. आता सुदिनरावांना रोखण्यासाठी एक भन्नाट आयडिया कुणाच्या तरी डोक्यातून आली आणि रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांना मडकई मतदारसंघातून उतरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी रॉयच्या वाढदिवसाचे फलक मडकई मतदारसंघात जागोजागी झळकले आहेत. अर्थातच ‘सुदिन’ विरोधात ‘रॉय’ असा हा डाव आहे. आता ही आयडिया कुणाची हे शोधावे लागेल बुवा!
आम्ही आहोत दर्शवण्यासाठी!
राज्यात एखादी चोरी झाली की, पोलिसांना अचानक नाकाबंदीचे महत्त्व आठवते. एखादा भीषण अपघात घडला की, मद्यधुंद चालकांविरोधात धडक मोहीम सुरू होते आणि काही दिवस चौकाचौकांत तपासण्यांचा धडाका दिसतो; पण विषयाची चर्चा थंडावली, मथळे बदलले आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळले की सगळे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ होते. मग नाकाबंदी विरळ होतात, तपासण्या कमी होतात आणि नियमांची अंमलबजावणी पुन्हा कागदोपत्री राहते. त्यामुळे कारवाई ही प्रतिबंधात्मक कमी आणि एखाद्या घटनेनंतरची प्रतिक्रियात्मक जास्त वाटू लागली आहे. जणू गुन्हेगार आणि बेफाम चालकांना पकडण्यापेक्षा जनतेला ‘आम्ही जागे आहोत’ हे काही दिवस दाखवणे हाच उद्देश असल्याचा टोला नागरिकांकडून लगावला जात आहे. ∙∙∙
डिनरची गोष्ट!
गोवा प्रदेश युवक काँग्रेसची राज्य कार्यकारणी बैठक पणजीत एका लहानशा सभागृहात पार पडली. बैठकीला कॉंग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी मनीष शर्मा, गोवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर पदाधिकारी हजर होते. युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनी सुरवातीला जोरदार भाषण केले. त्यानंतर राष्ट्रीय प्रभारी शर्मा यांनी उपस्थितांमध्ये किती राज्य कार्यकारणीचे सदस्य व किती युवक काँग्रेस गट अध्यक्ष आहेत, त्यांनी हात वर करण्याची सूचना केली. यावेळी राज्य कार्यकारिणीचे १२ व १२ गट अध्यक्ष असे केवळ चोवीस हात वर झाले. कोणी काय केले, हे विचारल्यावर एका गटाध्यक्षाने मागील काही महिन्यांत आम्ही ‘कॅंडल लाईट डिनर'' आयोजिला होता, असे सर्वांसमोर सांगितल्याने युवकांचे काय चाललेय याचा अंदाज सर्वांना आला. त्यामुळे उपस्थित युवक एकमेकांकडे पाहण्याशिवाय काहीच करू शकले नाहीत.
हवाबाजांना ‘ठाकरी’ डोस!
म्हापशातील काँग्रेसची ‘जनक्रांती सभा’ यशस्वी ठरली आणि त्याचे सर्वाधिक श्रेय उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष ॲड. शशांक नार्वेकर यांना मिळाले. सुनियोजित व गर्दीने फुललेल्या सभेमुळे भावी उमेदवार म्हणून त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाल्याची चर्चा आहे. सप्टेंबरमध्ये होणारी ‘गोंय राखण यात्रा’ ही त्यांच्यासाठी पुढील कसोटी ठरणार आहे. मात्र, कौतुकाच्या वातावरणात काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला. पक्षाला केवळ हवाबाजी करणारे नव्हे, तर जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत, असे त्यांनी ठणकावले. निवडणुका जवळ आल्या की, अचानक सक्रिय होणारे आणि नंतर गायब होणारे ‘हंगामी’ नेते-कार्यकर्ते त्यांच्या निशाण्यावर होते, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे काहींची राजकीय धडधड वाढल्याचे म्हापशात बोलले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.