Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबूज: भाजप मंडळ गप्प कसे?

Khari Kujbuj Political Satire: नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर छेडलेल्या आंदोलनाचे पडसाद गोव्यातही उमटले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

भाजप मंडळ गप्प कसे?

सांताक्रूझमधील सुरू होणारे कार्यालय पक्षाचे म्हणता-म्हणता मंत्री बाबूश मोन्सेरात यांना ते स्वतःचे असल्याचे जाहीर करावे लागले. भाजपच्या नेत्यांनी याविषयी निश्चित बाबूश यांना कानपिचक्या दिल्या असणार. परंतु सांताक्रूझमध्ये कार्यालय सुरू करण्यामागील कारण काही लपून राहिलेले नाही. उघडपणे नाहीतरी पडद्याआडून काही डावपेच याच कार्यालयात होणार आहेत, हे जाणूनच रुडाल्फ फर्नांडिस यांनी त्याला विरोध केला. सध्या वरिष्ठ पातळीवर या नेत्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण या मतदारसंघातील भाजप मंडळाची भूमिका काय, ही मात्र कळलेली नाही. कदाचित त्यांनाही स्थानिक पक्षश्रेष्ठींनी व्यक्त न होण्याचा सल्ला दिला असावा, असे वाटते. परंतु स्थानिक भाजपमध्ये वेगळाच सूर ऐकू येऊ लागला आहे.

घराणेशाही जपण्याचे प्रयत्न?

नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर छेडलेल्या आंदोलनाचे पडसाद गोव्यातही उमटले होते. गोव्यातील आंदोलनात देशाला हानी पोहोचेल, असे वादग्रस्त पोस्टर्स झळकल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चाही मैदानात उतरला होता. या निषेध कार्यक्रमात प्रथमच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कन्या पार्थवी सावंतही झळकली होती. त्यानंतर आता अनुसूचित जमातीच्या (एसटी) राजकीय आरक्षणाला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर आता त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी करीत माजी मंत्री तथा भाजप आमदार गोविंद गावडे यांची कन्या श्रावणी गावडेही आक्रमक झाली. ‘एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत गप्प बसू नका, सरकारला जाब विचारा’, असे आवाहन तिने केले. एकंदरीत, काँग्रेसच्या घराणेशाहीवर वारंवार टीकास्त्र करणाऱ्या भाजपनेही ‘राजकारणातील घराणेशाही’ जपण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केलेत का? असा प्रश्न आता अनेकजण विचारत आहेत.

नेत्यांच्या पाल्यांची इच्छा लढण्याची !

आगामी विधानसभा निवडणुकीत सध्याच्या मंत्री-आमदारांची मुले सक्रिय राजकारणात दिसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातील काहीजणांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारीही केली आहे. त्यातील आमदार बाबशू मोन्सेरात यांचे रोहीत मोन्सेरात यांनी ताळगावमधून निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. त्याशिवाय श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिद्धेश नाईक हे कुंभारजुवेतून आग्रही असणार आहेत. मंत्री सुदिन ढवळीकर यांचा मुलगा मिथील ढवळीकर दहा वर्षांपासून चॅरिटेबल ट्रस्टचे काम पाहत असल्याने तीन-चार महिने वाट पाहणार आहे. तसेच कळंगुटचे आमदार मायकल लोबोही आपल्या मुलासाठी हळूहळू सुरक्षीत विधानसभा मतदारसंघ तयार करण्यासाठी सरसावलेले आहेत. याशिवाय यापूर्वीच चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंका आलेमाव, मनोहर पर्रीकर यांचे उत्पल पर्रीकर हे पुन्हा नशीब आजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एक दिवसाचा शो नको!

मडगावला रानभाज्यांचा महोत्सव झाला. इतकी वर्षे रानभाज्यांचे महत्त्व कुणी ओळखले नव्हते का? पावसात कुर्डुकेची, शिरमंडोळेची व इतर भाजी होते ती भगिनींना अगोदर ओळखायला शिकवली पाहिजे. नंतर त्यांच्या मुलांना. मुलांनी ती चाखली पाहिजे, चवीने खाल्ली पाहिजे. कोकणी-मराठीत भाज्यांचे फोटो, ओळख, माहिती, रेसिपी देणाऱ्या पुस्तिका प्रकाशित केल्या पाहिजेत. राने कापून डोंगर बोडके केले, रानभाज्या कुठे उगवणार, असे मडगावकर रवींद्र भवनात बोलत होते. चारा, चुरणा, करवंदे, कणेरा व इतर रानफळे आणि रानभाज्या टिकवण्यासाठी राने सांभाळायला हवीत. बाजारातून पोटल्यातील फास्टफूड खाण्याची झालीय सवय. भाज्या बनवून पावसात खायला पाहिजेत. एक दिवसाचा शो नको. वर्षभर भाज्यांचे सेवन हवे.

‘ते’ आले आणि लगेच गेलेही!

आझाद मैदानावर सध्या रामा काणकोणकर हे कारापूरवासियांना घेऊन उपोषणास बसले आहेत. दररोज विविध पक्षाचे नेते येऊन त्यांना पाठिंबा देतात. आज ‘लास्ट क्राय..लास्ट ट्राय'' म्हणत ‘आम्ही गोंयचो राखणदार'' म्हणून सरकारसमोर दहा मागण्या मांडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यास पाठिंबा देण्यासाठी विविध पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. परंतु यावेळी काँग्रेसचे काही नेते आले आणि तेथून निघून गेले. त्याला कारणही तसे असावे, कारण गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी विरोधी पक्षांबाबत जी भूमिका मांडली, त्यात उपस्थित स्थानिकांनी आमदार सरदेसाई यांना ठाम भूमिका घेण्याचा सल्ला दिला. त्याशिवाय वक्त्यांची संख्या वाढत असल्याचे दिसताच म्हणे काँग्रेसच्या नेत्यांनी तेथून काढता पाय घेतला होता.

क्रूझ सिल्वांचा कामाचा सपाटा...

‘आप’चे वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी आपल्या मतदारसंघात विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करण्याचा धडाका लावला आहे. पेशाने अभियंते असलेले व शांत स्वभावाचे असलेल्या सिल्वांचे मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांची कामेही त्वरित मार्गी लागतात. गेल्यावर्षी झालेल्या झेडपी निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी त्यामुळे ते हताश झाले नाही. मध्यंतरी क्रूझ हे काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची खात्री झाल्यास ‘आप’ला सोडचिठ्ठी देणार या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र, या चर्चांना छेद देत क्रुझ सिल्वा हे ‘झाडू’वरच वेळ्ळीतून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार, असे त्यांचे समर्थक पैजेवर बोलताना सांगतात. प्रत्यक्षात पुढे काय राजकीय उलथापालथ घडेल हे आताच्या घडीला कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही म्हणा. सध्या तरी सिल्वा हे आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा जोमाने सक्रिय झालेले आहे. पुढे काय होणार यासाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच.’

मंत्र्यांचा सल्ला!

गणेश चतुर्थी आली की माटोळीच्या साहित्यासाठी रानाची वाट धरायची, अळंबी दिसली की रानभाज्यांची आठवण काढायची आणि बाकी वर्षभर मात्र त्या भाज्यांकडे पाठ फिरवायची... ही गोमंतकीयांची सवयच झाली आहे, अशी खंत दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. प्रत्येकाच्या घरात किमान चार-पाच प्रकारच्या रानभाज्या वापरल्या जाव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला. आता मंत्र्यांनीच रानभाज्यांचा ‘डोस’ वाढवण्याचा सल्ला दिल्याने घराघरात भाज्यांच्या ताटात नेमका किती बदल होतो, याकडे लक्ष लागले आहे.

बेघरांना आशा गणेश कृपेची!

म्हणतात ना, माणूस हा आशेवर जगतो. आपल्या राज्यात असे अनेक लोक आहेत, ज्यांचा डोक्यावर ‘आसरा’ नाही. सरकारची ‘अटल आसरा योजना’ म्हणा किंवा ‘प्रधानमंत्री निवारा योजना’ म्हणा किंवा तवडकर यांची ‘श्रमधाम’ योजना म्हणा. फायदा न मिळालेले अनेक जण आता आपल्या डोक्यावर एक कायमचे छत्र असावे म्हणून श्री गणेशाची आराधना करीत आहेत. गणेश चतुर्थी निमित्त राज्यातील काही सार्वजनिक गणेश मंडळांनी देणगी कूपन्स काढली असून विजेत्यांना फ्लॅट व महागड्या गाड्या बक्षीस म्हणून मिळणार आहेत. आपल्याला फ्लॅट लागल्यास डोक्यावर छप्पर येणार म्हणून अनेक जण पाचशे, हजार खर्चून डोनेशन कूपन्स खरेदी करून देव गणपतींची आराधना करीत आहेत. आता पाहूया.. बाप्पा कोणत्या भक्ताच्या हाकेला पावतो.

मग बाबूशना असाच इशारा का नाही?

सांगेचे आमदार आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कुडचडे मतदारसंघावर डोळा ठेवत त्या मतदारसंघातील देवस्थानाला भेट दिली आणि लागलीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दुसऱ्यांच्या मतदारसंघात केलेली लुडबुड सोसून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. यापूर्वी, बाबूश मोन्सेरात यांनी रुडॉल्फ यांच्या सांताक्रूझ मतदारसंघात आपले कार्यालय सुरू केल्यावर असाच गदारोळ माजला, पण त्यावेळी दामू नाईक हे काहीच बोलले नाहीत. जो न्याय सुभाष यांना लागू होतो तो बाबूश यांना लागत नाही का? सुभाष हे ऐकून घेणारे, बाबूश ऐकून घेणाऱ्यांपैकी नाहीत याची दामू यांना जाणीव होती? सुभाष हे घरचेच, त्यांना कितीही फटकारले तरी आपल्याला कुणी काही म्हणणार नाही, असे अध्यक्ष महोदयांना वाटले तर नसेल ना?

पहले तुम, पहले तुम!

सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आता काही जण बोलत आहेत. काँग्रेसने विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षांशी युतीची चर्चा करण्यासाठी समिती सुद्धा नियुक्त केली. पण या समितीने आपले काम सुरू केले आहे का? विरोधी पक्षांशी संपर्क साधला का? त्यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले का? या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. विजयबाब स्वतः काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना भेटून आले. पण, त्यामध्ये सुद्धा निवडणुका व्हायच्या आहेत, निकाल लागायचा आहे, जिंकून येणार की नाही याची शाश्वती नाही, तरी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची स्वतः घेण्यासाठी धडपडणाऱ्या नेत्यांनी त्यामध्ये खो घातला आहे. ‘आप’ची सुद्धा तीच गत आहे. ‘आरजी’ पक्ष सध्या अंतर्गत कलहात गुरफटलेला आहे. सध्या विरोधी पक्षांमध्ये ‘पहले तुम, पहले तुम’ असेच चालले आहे.

...म्हणून ‘आप’ला कुरवाळण्यास सुरुवात

आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आम आदमी पक्षाचे (आप) आमदार व्हेंझी व्हिएगश यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. एरव्ही, अधिवेशन काळात विधानसभा सभागृहात विजय आणि व्हेंझीत तसे फारसे पटल्याचे किंवा दोघांनी मिळून संघटितरित्या सरकारला घेरल्याचे दिसलेले नाही. रविवारी मात्र शुभेच्छा देत असताना आपण व्हेंझीचे किती जवळचे मित्र आहोत, हे दाखवण्याचे प्रयत्न विजयनी केल्याचे त्यांच्या फोटोतून स्पष्टपणे दिसते. विजय सरदेसाई हे राजकारणातील अतिशय चाणाक्ष नेते आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची एकी करण्याचे प्रयत्न त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केले होते. परंतु, काँग्रेसकडून मात्र त्यांना त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने, उलट विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीच त्यांच्यावर आरोपबाजी केल्याने विजय यांच्या गोवा फॉरवर्डने काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चांना तूर्तास स्थगित दिलेली आहे. अशा स्थितीत काँग्रेसला आपल्या पायाजवळ आणण्यासाठी आता विजयनी ‘आप’ला कुरवाळण्यास सुरुवात केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

गोंधळात गोंधळ!

विधानसभा निवडणुकीची तारीख अजून जाहीर झालेली नाही. पण, कुणी म्हणतात, नोव्हेंबर, डिसेंबर, दुसरा म्हणतो फेब्रुवारी २०२७ मध्ये. मात्र, निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे गोव्यातील राजकीय क्षेत्र गढूळ होत चालले आहे. नेमके काय चालले आहे. कोणाला नेमके काय म्हणायचे आहे व कोणाला नेमके काय पाहिजे हे कळणेच कठीण होऊन बसले आहे. सत्ताधारी म्हणा किंवा विरोधी पक्षांमध्ये सुद्धा अविश्वास, नाराजी, एकमेकाला धडा शिकवण्याची भाषा हेच दिसून येत आहे. आदिवासींच्या राजकीय आरक्षणामुळे तर गोंधळात गोंधळ झालेला दिसत आहे. हे जे घडत आहे, ते विरोधी पक्षांपेक्षा सत्ताधारी भाजप पक्षाच्या निश्चितच हितावह नाही, असे लोक बोलू लागले आहेत. आरक्षण दिले किंवा दिले नाही. शेवटी सत्ताधारी पक्षामधील नेते, कार्यकर्ते व मतदारांमधील दरी वाढत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बघूया काय होते ते!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: काणकोणमध्ये काँग्रेसला 'बळ', 'दया' गावकरांसह समर्थकांचा प्रवेश; पक्षसंघटना मजबूतीवर भर

VIDEO: सॉरी नको, माझा मुलगा परत द्या! राहुलच्या आईची 'दीपविहार'च्या प्राचार्यांना आर्त विनवणी, शाळेनं जबरदस्तीनं मुलांना धबधब्यावर नेल्याचा आरोप

Horoscope: सोमवार ठरणार लकी! 'या' राशींना मिळणार महादेवाचा आशीर्वाद; अडकलेली कामं होतील पूर्ण, आर्थिक लाभाचेही संकेत

Brett Lee On Vaibhav Sooryavanshi: 'तो खरंच 15 वर्षांचा असेल तर...' वैभव सूर्यवंशीच्या वयावरील वादावर 'ब्रेट ली'चं सडेतोड उत्तर Watch Video

UPI Transaction Charges: 'यूपीआय पेमेंट' विनामूल्यच! केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण; निवडक व्यवहारांवरच शुल्क आकारणी

SCROLL FOR NEXT