भारतीय जादू पार्टी?
सध्या देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने धुमाकूळ घातलेला असतानाच आता गोव्यात ‘भारतीय जादू पार्टी’ असे नामकरण करणारा कुणी पुढे येऊन धुमाकूळ घालणार तर नाही ना? अशी शंका लोक व्यक्त करू लागले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे जादूगार असून ते आपल्या जादूच्या पोतडीतून २२ हजार सरकारी नोकऱ्या बाहेर काढतील आणि त्यावर भाजपचा विजय निश्चित आहे, अशा आशयाचे वक्तव्य आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काढल्यानंतर सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर युवा नेते प्रभव नायक यांनी समाजमाध्यमांवर एक उपरोधिक पोस्ट टाकताना, ही ‘भारतीय जादू पार्टी’ तर नाही ना? असे म्हटले आहे. युवा काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनीही भाजपवर टीका करताना, गोव्यातील युवकांना अशी फसवी आश्वासने नकोत असे म्हणत भाजप सरकारने प्रशासनाला जादुच्या प्रयाेगाच्या पातळीवर आणले आहे अशी टीका केली आहे. आता या भारतीय जादू पार्टीबद्दल इतर ‘ॲक्टीविस्ट’ काय म्हणतात ते आता पहावे लागेल. ∙∙∙सध्या देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने धुमाकूळ घातलेला असतानाच आता गोव्यात ‘भारतीय जादू पार्टी’ असे नामकरण करणारा कुणी पुढे येऊन धुमाकूळ घालणार तर नाही ना? अशी शंका लोक व्यक्त करू लागले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे जादूगार असून ते आपल्या जादूच्या पोतडीतून २२ हजार सरकारी नोकऱ्या बाहेर काढतील आणि त्यावर भाजपचा विजय निश्चित आहे, अशा आशयाचे वक्तव्य आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काढल्यानंतर सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर युवा नेते प्रभव नायक यांनी समाजमाध्यमांवर एक उपरोधिक पोस्ट टाकताना, ही ‘भारतीय जादू पार्टी’ तर नाही ना? असे म्हटले आहे. युवा काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनीही भाजपवर टीका करताना, गोव्यातील युवकांना अशी फसवी आश्वासने नकोत असे म्हणत भाजप सरकारने प्रशासनाला जादुच्या प्रयाेगाच्या पातळीवर आणले आहे अशी टीका केली आहे. आता या भारतीय जादू पार्टीबद्दल इतर ‘ॲक्टीविस्ट’ काय म्हणतात ते आता पहावे लागेल.
हा इशारा कुणासाठी ?
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरूवारी प्रदेश कॉंग्रेसने बांबोळी येथे त्यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. यावेळी राजीव गांधींच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी शिडी चढून जाताना एक पायरी तुटली व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा पाय घसरला. आपल्या अंगरक्षकाचा आधार घेत युरीबाब कसेबसे वर चढले व त्यांनी पुष्पहार घातला. परत खाली येताना युरींच्या तोंडून ‘सायबा मात्शें चोय आं, बरें लागना’ असे शब्द बाहेर पडले व ते तेथे उपस्थित पत्रकार, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बरोबर टिपले. युरींच्या तोंडचे शब्द बाहेर पडताना कॅमेरा नेमका राजीव गांधीच्या पुतळ्यावर फोकस झाला होता. युरी आलेमाव कॉंग्रेस भवनात श्रद्धाजंली कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत. त्यामुळे युरींचा पाय घसरणे व त्यांच्या तोंडचे शब्द हा नेमका त्यांना की कॉंग्रेस पक्षाला एकप्रकारचा इशारा होता. यावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
‘आप’चा बी प्लॅन
सध्या गोव्यात विधानसभा निवडणूक अवघ्या सात ते आठ महिन्यांवर आलेली असताना कित्येक ठिकाणी राजकीय वावटळी येऊ लागल्या आहेत. सध्या या वावटळीत ‘आरजी’ पक्षाचे तारु सापडले आहे. या पार्श्वभूमीवर काहीजण आम आदमी पक्षाचे आमदार पक्षाला राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या उठवू लागल्या आहेत मात्र यावर ‘आप’चे पदाधिकारी शांतपणे उत्तर देत आहेत. काहीही झाले तरी आमच्याकडे आमचा ‘बी प्लॅन’ तयार आहे. त्यामुळे आम्हाला कसलीही भीती वाटत नाही, असे काही पदाधिकाऱ्यांनी आता सांगण्यास सुरुवात केली आहे.
राण्याक किदें जाला...!
ज्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे एमबीएचे शिक्षण घ्यायचे त्यावेळी ते वर्गात शेवटच्या बाकावर बसायचे. जास्त कुणाशी बोलत नसत. मुख्य म्हणजे त्यांचा हजेरी क्रमांकही शेवटचा म्हणजे ६१ क्रमांक होता. परंतु आता त्यांचे महाविद्यालयीन मित्र म्हणतात, हा शांत स्वभावाचा इतका बदलला कसा? अशी विचारणा करत असल्याचे राणे यांनी सांगितले. ते म्हणाले, मी आक्रमक आहे असे लोक म्हणतात परंतु मी तसा नाही....हल्ली लोक बोलताहेत की, राण्याक किदें जाला तो कायच उलयच ना ! प्रत्येकजण वेळेनुसार बदलत असतो एवढेच खरे... बाकी आरोग्यमंत्री देखील समाजात नेमके त्यांच्याबद्दल काय बोलले जाते, समाजात काय चाललंय याकडे बारीक लक्ष ठेवून असतात. एवढे मात्र खरे.
मी आणि मीच चा परिणाम
आरजीपीचे सर्वेसर्वा यांच्या राजीनाम्यानंतर गोव्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची नवी मैफल रंगली आहे. त्यातच युगांक नाईक यांनी फेसबुक पोस्टद्वारे लगावलेला बोचरा टोला सध्या चांगलाच चर्चेत आहे. ३० ओळींच्या राजीनामा पत्रात ‘मी’ १४ वेळा, ‘माझे’ आणि ‘मला’ मिळून १९ वेळा... पण ‘आपण’ फक्त एकदाच! युगांक नाईक यांनी नेमका हाच धागा पकडत पक्षाच्या नेतृत्वशैलीवर उपरोधिक हल्ला चढवला. ‘संघटना ‘आपण’वर चालते; पण नेतृत्व ‘मी’भोवती फिरू लागलं की पक्षाचा प्रवास विचारांपासून व्यक्तिपूजेकडे सुरू होतो,’ असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे. कार्यकर्त्यांनी झेंडे उचलायचे, घोषणाबाजी करायची, संघर्ष करायचा... आणि शेवटी श्रेय मात्र ‘मी, माझे, मला’ यांच्याच खात्यात जमा व्हायचं, अशी चर्चा आता उघडपणे सोशल मीडियावर सुरू झाली आहे. राजकारणात ‘आपण’ हरवलं की पक्ष उरत नाही, फक्त व्यक्ती उरते... आणि मग राजीनामा पत्रही पक्षनिष्ठेपेक्षा आत्मकेंद्रीपणाचं प्रतिबिंब वाटू लागतं, असा चिमटा युगांक यांनी काढला आहे.
फोंड्यात आता तोंडी नव्हे, कृतीतून विकासकामे!
फोंडा पोटनिवडणूक रद्द झाली खरी, पण रवी पुत्र रितेशची विकासकामांसाठी धडपड मात्र कायम सुरू आहे. फोंड्यातील विकासकामांच्या फाईल्स रितेश नाईक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाताना दिसतात आणि मुख्यमंत्रीही त्यांना आवश्यक प्रतिसादही देतात. सांगायचा मुद्दा असा आहे की, फोंडा मतदारसंघात आवश्यक विकासकामे करण्यात येतील, अशी ग्वाही पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली होती, मात्र अजूनही तशी कार्यवाही होताना दिसत नसल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे, मात्र फोंड्यात सरकारकडून निश्चितच ‘मास्टरप्लॅन’नुसार विकास केला जाईल, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांचे एक प्रबळ विरोधक असलेले काँग्रेसचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी आपल्या मृत्यूपूर्वी एक दिवस आधी सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेताना निवडणुकीत आश्वासने दिली ती हवेत विरली, असे म्हटले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या विधानावर मौन बाळगणेच पसंत केले. फोंड्यात तोंडी नव्हे तर कृती करूनच विकासकामे राबवली जातील, असे मुख्यमंत्री खासगीत म्हणाले होते, असे त्यांच्या एका निकटच्या कार्यकर्त्याने सांगितले.
फोंड्यात कॉंग्रेसकडून व्यूहरचना
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून नियोजनबद्धरीत्या व्यूहरचना सुरू करण्यात आली आहे. वास्तविक केतन भाटीकर आणि राजेश वेरेकर हे फोंड्यातील काँग्रेसचे हुकमी एक्के ठरले होते, पण भाटीकर यांचे निधन झाल्यामुळे आता पुढे काय, असा सवाल उपस्थित होत असतानाच राजेश वेरेकर यांनाच पुन्हा एकदा संधी देण्याबाबत घाटत आहे. काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्याला दुजोराही दिला. मात्र मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राजेश वेरेकर यांना अपार मेहनत ही करावीच लागेल, कारण सध्या दिशाहीन ठरलेल्या केतन भाटीकर यांचे समर्थक आणि मतदारांना काँग्रेस पक्षाकडे आणण्यासाठी काँग्रेस पक्षाला ही मोठी मेहनत करावी लागणार आहे, तरच विजय समीप येईल, असे जाणकारांचे मत आहे.
विनय फोंड्यातही लोकप्रिय?
‘उपरवाला जब भी देता छप्पर फाडके देता’ या उक्तीचा प्रत्यय सध्या माजी खासदार विनय तेंडुलकर यांच्याबाबतीत येताना दिसत आहे. धारबांडोदा इथे त्यांनी आयोजित केलेल्या दळवी चषक क्रिकेट स्पर्धेला अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे तेंडुलकरांचे सितारे सध्या सातव्या आसमान पर पोहोचल्यासारखे वाटू लागले आहे. या स्पर्धेनंतर दुसऱ्या दिवशी तेंडुलकर साहित्यिक मिलिंद म्हाडगुत यांच्या फोंड्यात झालेल्या नाट्य पुस्तक प्रकाशनाला प्रमुख पाहुणे होते. तिथेही त्यांना फोंड्याचे अनेक कार्यकर्ते भेटायला आलेले दिसले. त्यांच्यात काय चर्चा झाली हे कळले नसले तरी तेंडुलकर फोंड्यातही तेवढेच लोकप्रिय असल्याचे मात्र दिसून आले. आता ही त्यांची लोकप्रियता येत्या निवडणुकीत कशी ‘कॅश’ होते, हे मात्र बघावे लागेल. पण शेवटी तेंडुलकर हे ‘पुराने खिलाडी’ असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट कशी ‘कॅश’ करावी, हे माहीत असणारच. आगे आगे देखो होता है क्या? !
कोकणी व वेबसाईट
कोणे एकेकाळी म्हणजे १९७०च्या दशकात कोकणी पेपर वा इतर साधने नसल्याने कोंकणी नावाचं एक लहान मुखपत्र यायचं. त्यात महिन्यातील सांस्कृतिक, साहित्यिक बातम्या सविस्तर असायच्या. चळवळ जोर घेत होती. गावोगावी लळीतक हा कार्यक्रम व्हायचा. मंडळाचा दिवाळी अंक जबरदस्त यायचा. नाट्य स्पर्धा मूळ धरू लागली होती. हे बुलेटीन हा कोंकणीचा आवाज होता. ते नेमाने यायचं. लळीतकच्या सादरीकरणातील लेखकांचा उल्लेख आहे ते सातत्याने लेखन करत आहेत. काही गायब. त्या काळी भलत्याच चळवळीत गुंतलेले काही वीर आज ती यंत्रणा हायजॅक करू पाहताहेत. म्हणूनच ते बुलेटीन लुप्त झाले. वेबसाईट अद्ययावत बातम्या देत नाही. दिवाळी अंक तिसाल, चौसाल करत बंदच. सरकारच्या कोंकणी अकादेमीचं बरं. वेबसाईटच नाही. ती असणं म्हणजे लोक चुका दाखवतात. वा, वालोर! ∙∙∙
हळदोण्यातून तारक आरोलकर!
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हळदोणे मतदारसंघातून समाजसेवक तारक आरोलकर निवडणूक लढवणार, अशी जोरदार चर्चा असून, त्यांच्या लोकसंपर्कामुळे आणि सामाजिक कार्यामुळे त्यांनी आतापासूनच या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री आणि सत्ताधारी भाजप नेत्यांशी असलेल्या उत्तम संबंधांमुळे डॉ. आरोलकर हे भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, जर पक्षाने त्यांना तिकीट दिले तर ते निवडून येतील, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. दुसरीकडे, माजी आमदार ग्लेन हेही भाजप तिकिटासाठी जोरदार प्रयत्न करत असून, ‘कमबॅक’ साठी संधी शोधत आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्व डॉ. आरोलकर यांच्या नव्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब करते, की माजी आमदार टिकलो यांना पुन्हा संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.