Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: 'खाओ पीओ' काँग्रेस बैठक

Khari Kujbuj Political Satire: काँग्रेसच्या सध्याच्या गोवा रक्षण यात्रेवर त्यांच्या विरोधी पक्षांकडून लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा काँग्रेसचेच कार्यकर्ते करू लागले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

काँग्रेस विरोधकांची यात्रेवर नजर!

काँग्रेसच्या सध्याच्या गोवा रक्षण यात्रेवर त्यांच्या विरोधी पक्षांकडून लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा काँग्रेसचेच कार्यकर्ते करू लागले आहेत; कारण मोर्चे, आंदोलने करण्यात माहीर असलेल्या भाजपला अशा उपक्रमांसाठी लागणारे साहित्य खरेदी, येणाऱ्या लोकांचा खर्च वगैरी सर्व माहिती आहे. त्याशिवाय त्यांचे विरोधी पक्षही काही कमी नाहीत, त्यांनाही त्याचा अंदाज आहेच. त्यामुळे काँग्रेसकडून यात्रेवर साधारण दिवसाला किती खर्च होत असेल, याचे अंदाज बांधले जात आहेत. २७ दिवसांनंतर कदाचित या खर्चाविषयी भाजप अथवा इतर पक्षांकडून प्रश्न उपस्थित केले जातील किंवा त्याविषयीच्या पारदर्शकतेची मागणीही केली जाऊ शकते. त्यामुळे काँग्रेसला आतापासूनच उत्तरे तयार करावी लागणार आहेत, हे नक्की.

त्यांचा पंचतारांकित मुक्काम

गोव्यात सध्या काँग्रेसची गोवा रक्षण यात्रा सुरू आहे. त्यासाठी गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर तसेच ठाकरे साहेबांचे खास माणूस डॉ. जितेंद्र देहाडे यांचा सध्या गोव्यात मुक्काम आहे. पणजीतील एका पंचतारांकित हॉटेलात ते उतरले आहेत. दु. ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत माणिकराव व अंजलीताई यात्रेत सहभागी होतात. मात्र, डॉ. देहाडे हॉटेलात बसून अनेक इच्छुकांना भेटतात, असे कॉंग्रेस उमेदवारीसाठी दावेदार आहेत, तेच कुजबुजू लागले आहेत. अनेकांनी ही गोष्ट प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या कानावरही घातली आहे. एरव्ही निधीची चणचण भासत असलेल्या कॉंग्रेस हायकमांडचे हे प्रतिनिधी मात्र पंचतारांकित हॉटेलात मुक्कामाला असल्याने त्यांचा खर्च कोण करतो? यावर कॉंग्रेसवालेच तर्क काढू लागले आहेत.

विच्छा माझी पुरी करा!

विधानसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. त्याचबरोबर इच्छुकांकडून निवडणूक लढण्याच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. सध्या तरी भाजप आणि काँग्रेसकडून आपणच उमेदवार म्हणून उघडपणे लोक बोलत आहेत. यावरून ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. अशा इच्छुकांची इच्छा पुरी करण्याचे काम पक्षश्रेष्ठींचे; परंतु सध्या इच्छा व्यक्त करायला काय हरकत म्हणत म्हापशातून संदीप फळारी, मयूर सावकार, गुरुदास पावस्कर, राजसिंग राणे, पेडण्यातून राजन कोरगावकर, बाबू आजगावकर, पणजीतून काँग्रेसकडून सुरेंद्र फुर्तादो, ताळगावातून ज्ञानेश्वर गोवेकर आणि माजी नगरसेवक शीतल दत्तप्रसाद नाईक यांनी रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. उरला प्रश्न आता राजेश फळदेसाई, प्रवीण आर्लेकर, केदार नाईक यांचा, तर हे तीन आमदार ‘डेंजर झोन’मध्ये असल्याने त्यांच्या मतदारसंघातून भाजपचे इच्छुक काही दिवसांत पुढे येतील, असे वातावरण तयार झाले आहे.

‘युगोडेपा’चे दुकान पुन्हा सुरू?

एकेकाळी प्रभावी विरोधी पक्ष अशी आपली ओळख निर्माण केलेल्या ‘युगोडेपा’ पक्षाकडे चर्चिल आलेमाव यांनी पाठ फिरवल्यानंतर या पक्षाची स्थिती ‘राहिलो निवडणुकीपुरता’ अशी झाली होती. ज्यावेळी निवडणूक यायची त्यावेळीच हा पक्ष सक्रिय व्हायचा. त्यामुळे काही पत्रकार ‘राधा आणि आनाक्लेत’ यांनी आपले दुकान उघडले, असे म्हणायचे. मात्र, तिथेही गिऱ्हाईक येणे बंद झाल्यावर या पक्षाने आपले काम पूर्णपणे बंद केले आणि नंतर निवडणूक आयोगानेही या पक्षाची मान्यता काढून घेतली. आता या पक्षाचे फोंडा भागातील काही सदस्य हा पक्ष पुनर्जीवित करण्यासाठी पुढे आले आहेत. म्हणजे मडगाव येथे असलेले ‘युगोडेपा’चे हे दुकान आता फोंड्याला हलविले जाणार का?

‘खाओ पीओ’ काँग्रेस बैठक

काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेदरम्यान गोव्यात आलेले काँग्रेसच्या केंद्रीय समितीचे सरचिटणीस वेणुगोपाल हे गोव्यात आल्यावर भाजपचे केंद्रीय नेते जसे गोव्यात बैठकांचा सपाटा लावतात तसे ते करतील, असे वाटले होते. त्यांनी आपल्या गोवा दौऱ्यात एक बैठक घेतलीही; पण बाणावली येथे झालेल्या या बैठकीत चर्चा कमी आणि खाणे-पिणेच जास्त झाल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसचे हे नेते गोव्यात फक्त ‘खाओ पीओ गोवा हमारा’ करण्यापुरतेच येतात का? अशी चर्चाही आता रंगली आहे. ∙∙∙

केतन भाटीकरांच्या आठवणी

बुधवार पेठ गणेशोत्सवात काल झालेल्या महाप्रसादाच्या वेळी अनेकांना फोंड्याचे दिवंगत नेते डॉ. केतन भाटीकर यांची आठवण झाली. ते गेली तीन वर्षे महाप्रसादाच्या वेळी तिथे येणाऱ्या भाविकांना तीर्थ घालण्याचे काम करत असत. सकाळी अकराच्या सुमारास येणारे भाटीकर साधारण संध्याकाळी चार-पाच वाजेपर्यंत उभे राहून मोठ्या उत्साहाने हे काम करताना दिसत असत. त्यामुळे भाविकांना त्यांची गेली तीन वर्षे सवय झाल्यासारखी झाली होती. यंदा मात्र ते तिथे नसल्यामुळे अनेकांना चुकल्यासारखे वाटत होते. काही महिला तर भावनावश होऊन भाटीकरांच्या आठवणी काढताना दिसत होत्या. शेवटी ‘जानेवाले नही आते, जाने वालों की याद आती है’ हेच खरे. नाही का?

यादी झाली, कुरबूर बाकी!

‘एसआयआर’ची प्रक्रिया पूर्ण झाली, मतदार यादीही आली; पण त्यावरून राजकीय कुरबुरी काही थांबताना दिसत नाहीत. ‘एसआयआर’ आणि मतदार यादीचा मुद्दा आता राजकीय आखाड्यात चांगलाच तापला आहे. आमदार विजय सरदेसाई यांच्यावर सिद्धेश नाईक यांनी टीकेची धार सोडताच युवा फॉरवर्डचे मेशू डिकॉस्टा यांनीही पलटवार केला. सरदेसाई गोवेकरांच्या प्रश्नांना वाचा फोडत असल्याचा दावा करत डिकॉस्टा यांनी ‘एसआयआर’मधील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. म्हणजे मतदार यादी अंतिम झाली असली, तरी राजकीय हिशेबाची बेरीज-वजाबाकी सुरूच! आता ‘एसआयआर’च्या आकड्यांपेक्षा कोणाचा टोला किती जोरात बसतो, याचीच चर्चा रंगू लागली आहे

चुकीमुळे का होईना!

चतुर्थीच्या पूर्वी सरकारने उज्ज्वला योजनेची घोषणा केली. त्यावेळी महिलांसोबत ज्या पुरुषांच्या नावे गॅस एजन्सीचे बूक आहे, अशा पुरुषांनी या योजनेत अर्ज केले. योजनेसाठी अर्ज करण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्टता नसल्याने घोळ झाला. एक-दोन नव्हे तर ४० हजार कुटुंब प्रमुखांनी अर्ज भरले, त्यामुळे ते अर्ज मागे घ्यायचे कसे आणि नाकारायचे तरी कसे, असा प्रश्‍न प्रशासनासमोर आला. ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशा स्थितीत शेवटी आता अर्ज केलेल्या पुरुषांच्या खात्यावर उज्ज्वला योजनेची रक्कम येणार आहे, त्यामुळे पहिल्यांदाच राज्यातील काही पुरुषांच्या बॅंक खात्यात सरकारी योजनेचे रक्कम जमा होईल. बहुतांशी योजना या महिला केंद्रीत असतात, त्यामुळे प्रशासनाच्या चुकीमुळे का होईना, पुरुष लाभार्थी ठरणार आहे आणि नव्याने करावी लागणारी अर्जप्रक्रिया चुकणार आहे

हॉटेल्सच्या बिलांचा धक्का!

गणेशोत्सवात पणजीतील हॉटेल्सची रंगरंगोटी सुरू झाली आणि त्याचवेळी ग्राहकांच्या खिशालाही कात्री लागणार, अशी चर्चा सुरू झाली होती. चतुर्थीनंतर काही हॉटेल्सनी दरवाढ करून ती खरीही ठरवली. आधी ‘सिलिंडर महागला’ म्हणून चहा-थाळीचे दर वाढवले; आता पुन्हा दरवाढीची तयारी! म्हणजे सिलिंडर एकदा महागला; पण त्याची उष्णता ग्राहकांच्या खिशात अजूनही कायम आहे. चहापेक्षा किटली गरम आणि किटलीपेक्षा बिल तापलेले! दरवाढीवर प्रशासनाचे नियंत्रण आहे की हॉटेलांच्या दरपत्रकाला ‘फ्री पास’ मिळालाय, असा सवाल ग्राहक करत आहेत. अखेर चहाचा घोट हॉटेलमध्ये; पण कात्री मात्र थेट खिशावर, अशीच स्थिती दिसत आहे.

आशेची झाली निराशा!

माणूस आशेवर जगतो. आपल्या नशिबी काही चांगले घडणार, ही आशा माणसाला आनंदी ठेवते. अशाच आशावादी लाखो गणेशभक्तांनी आपल्याला गणेशकृपेने लॉटरीत फ्लॅट लागणार, आलिशान गाडी लागणार, काही नसेल तर दुचाकी लागणार या आशेने गणेश मंडळानी गणेशचतुर्थीनिमित्ताने काढलेली लॉटरी कूपन्स खरेदी केली होती. काही भक्तांनी यासाठी वीस-वीस हजार रुपये खर्च केले होते. लॉटरी लागणार म्हणून केवळ गरिबांनी व मध्यमवर्गीयांनीच नव्हे तर श्रीमंतांनी ही हजारांची नव्हे तर लाखांची लॉटरी कूपन्स खरेदी केली होती. आपल्याला लॉटरी लागो म्हणून गणेशभक्तांनी गणेशाची आराधना ही केली होती. मात्र, दोन लाख लॉटरी कूपन्समधून केवळ दहा ते पंधरा भाग्यवंतानाच बक्षीस लागते. नशीब उघडण्याची शक्यता फार-फार कमी असते. लॉटरीचा ड्रॉ झाला आणि आपला नंबर आला नाही, हे समजल्यावर दोन लाख भक्तांमधील एक लाख नव्याण्णव हजार नऊशे पंच्याऐंशी भक्तांची मात्र निराशाच झाली.

चुकीचे नियम!

‘जुने ते सोने’ असे म्हणून आपले शिक्षण खाते चुकीच्या जुन्या नियमांकडे बोट दाखवितात, ज्याचा परिणाम विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायला लागते. हल्लीच शिक्षण खात्याने सरकारी माध्यमिक विद्यालयात शिकविणाऱ्या काही शिक्षकांना साहाय्यक भागशिक्षणाधिकारी व ग्रेड वन शिक्षक म्हणून बढती दिली. ज्या शिक्षकांची उच्च माध्यमिक विद्यालयात बढती झाली ते शिक्षक नकोत म्हणून पेडणे, काणकोण, सांगे व मडगाव येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तीस-तीस वर्षांचा अनुभव असलेल्या शिक्षकांना सेवानिवृत्तीकडे पोहोचले असता असा अपमान सहन करावा लागला. याला कारण शिक्षण खात्याचे नियम. खरे म्हणजे माध्यमिक विद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांना थेट मुख्याध्यापक म्हणून बढती देणे गरजेचे आहे. भागशिक्षणाधिकारी पद मुख्याध्यापक पदाशी समांतर करायला हवे. अन्यथा या अनुभवी शिक्षकांना असे अपमान वारंवार सहन करावे लागणार!

अत्याधुनिक फेरींचा विस्तार

पणजीत एकेकाळी ‘रीवर नावेगासांव’ खाते होते. तिथून संध्याकाळी कामाच्या लोकांना घेऊन एक वाफोर सुटायचा. एकोशी, बिठ्ठोण, चोडण करत पुढे जायचा. चोडण-माडेल मार्गावर नदी परिवहन खात्याने दोन रो-रो फेरीबोटी सुरू केल्या. अत्याधुनिक. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. १० मिनिटांच्या आत नदी पार होते. आता दिवाडी - सांपेद्र मार्गावर २१ मीटर लांबीच्या दोन नवीन ‘रो-रो’ फेरी सुरू व्हायच्या आहेत. ही सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कार्यान्वित करण्याचे नियोजन सुरू आहे. कारण रॅम्प व इतर कामांचा उरक जोरात सुरू आहे. रस्त्यावरील सध्याचे अपघातांचे धोके व इतर अडचणी लक्षात घेता इतर देशांसारखे प्रवासी जलमार्ग गोव्यातही रहदारीत सुलभता आणतीलच, अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association: प्रशांत काकोडेंचे 'आयसीए' सदस्यत्व निलंबित, जीसीए नैतिक अधिकारी-लोकपालाकडून कारवाई

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेचं बंपर गिफ्ट! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ; पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

SCROLL FOR NEXT