Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: काँग्रेस नेत्यांना घरचा आहेर

Khari Kujbuj Political Satire: मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचे आणि बूथ पातळीवर संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

काँग्रेस नेत्यांना घरचा आहेर

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचे आणि बूथ पातळीवर संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. ‘जर एकता असेल तर सर्व काही घडू शकते’, असे सांगताना त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस नेत्यांनाही सोडले नाही. नेत्यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, ‘आधी तुम्ही तुमच्यातील एकी दाखवायला हवी. तसे केल्यास तुमचे कार्यकर्तेही एकत्र राहतील.’ खर्गे यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यावेळी व्यासपीठावर अशा प्रकारची वृत्ती बाळगणारे कित्येक नेते उपस्थित होते. त्यामुळे खर्गेंचा हा सल्ला नेमका कुणाला उद्देशून होता, याची कुजबुज मात्र सुरू झाली.

खर्गेंचे सल्ले ऐकणार?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी वेर्णा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करीत येत्या विधानसभा निवडणुकीची काँग्रेसनेही जय्यत तयारी सुरू केल्याचे दाखवून दिले. खर्गे यांनी भाजपवर हल्लाबोल चढवताना गोव्यासह देशभरातील प्रमुख विषयांना हात घातला. गेल्या काही महिन्यांत केंद्रातील भाजप सरकारविरोधात तयार झालेल्या वातावरणाचा पूर्ण लाभ उठवण्याचे प्रयत्न त्यांनी आपल्या भाषणातून केले. मंगळवारीही ते प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी बैठका घेऊन त्यांनाही याच विषयांवर जोर देण्याचा सल्ला देतील. परंतु, ते गोव्यातून निघाले की त्यांचे सल्ले ऐकून कितीजण पक्षकार्यात झोकून देणार? आणि कितीजण केवळ उमेदवारीच्या आशेने काँग्रेस भवनात फेऱ्या मारणार? याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

पाटकरांची भूमिका काय?

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा भेटीबद्दल आपल्याला कोणी काही सांगितलेच नाही, असे म्हणत जाहीररित्या खंत व्यक्त केलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर सोमवारच्या या सभेला येतील की नाही, याची सर्वांना उत्सुकता होती. पण ते या सभेला आले. व्यासपीठावर ते त्यांच्या गोटातील मानले जाणारे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या बाजूला बसले होते. या सभेत पाटकर काही बोलले नाहीत, पण कॅप्टन फर्नांडिस यांनी काँग्रेस पक्षात फूट पडणार ही फक्त अफवा असल्याचे सांगितले. अमित पाटकर खरेच काँग्रेस पक्ष फोडून नवा गोवा काँग्रेस पक्ष स्थापन करणार का? हा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यातच व्यासपीठावर बसलेल्या अमित पाटकर यांच्या गळ्यात काँग्रेसचा स्कार्फ दिसत नव्हता. त्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात पडलेच!

खर्गे आणि इंधन

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी आपल्या भाषणात सत्ताधारी भाजपला कधी चिमटे काढले, तर कधी शालजोडीतून आहेरही दिला. राजकारणात ५६ वर्षे पूर्ण केली, पण भाजप सरकारसारखे इतके भ्रष्ट सरकार कधीच पाहिले नाही, असा टोला त्यांनी लगावला. आता ८५ वर्षांचे खर्गे इतकेच बोलून थांबतील तर ते खर्गे कसले! त्यांनी थेट ई-२० इंधन धोरणावरही निशाणा साधला. ‘माझे इंजिन खूप चांगले चालत आहे म्हणून मी वयाच्या ८५व्या वर्षीही धावत आहे. कारण मी माझ्या इंजिनसाठी ई-२० इंधन वापरत नाही,’ असे सांगत त्यांनी ई-२०वरून सरकारला चिमटे काढले. आता खर्गेंचे हे ‘इंजिन’ पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला किती वेग देते, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे!

उदंड बहु काव्य वर्षा

पावसाची यंदा तूट. पण, कवितांची लयलूट. बाराही तालुक्यात कवी संमेलनांचा सुकाळ. धो धो अगदी तिन्ही त्रिकाळ. श्रावणात काव्य सरी चालू आहेत. काही कवी कविता गातात. हरकत नाही. पण, काही जण सूर सोडतात तेव्हा तो विनोद व्हायला लागतो. जीवनाची सजावट करायला काव्य, शास्त्र, विनोद हवा. उत्तर भारतात जे मुशायरे होतात त्या कवी संमेलनांचा दर्जा उच्च असतो. कारण मुशायरा हा त्यांच्या संस्कृतीचा भाग बनलाय. कविता सुबोध हव्या. दुर्बोध नको. कवितेच्या पावसाचं पाणी ओंजळीत कायम राहायला हवं. कसं? दत्ता हलसगीरांची एक कविता आहे जी अजून पिढ्यानपिढ्या जिरलेली आहे मनात. ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत; ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत.

हे ‘बीएलए’ कोणाचे?

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सोमवारी गोव्यात आगमन झाले. नेमके याचेच औचित्य साधून १०८ ‘बीएलए’ म्हणजेच बूथ लेव्हल एजंटांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला, अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. हे ‘बीएलए’ म्हणजे आमदारांचे किंवा मंत्र्यांचेच कार्यकर्ते असतात. जे कोण निष्ठावंत कॉंग्रेसवाले आहेत, त्यांना कदाचित या बातमीमुळे धक्काच बसला असेल. पण, प्रत्यक्षात हे जे कोण बीएलए आहेत, ते कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेल्या आमदारांचे असावेत, अशी चर्चा लगेच सुरू झाली. कॉंग्रेसचे आमदार भाजपमध्ये गेले तेव्हा हेच कार्यकर्ते सुद्धा भाजपवासी झाले होते. जे कोण कॉंग्रेसमधून भाजपवासी झाले, त्यातील एकाने तरी कॉंग्रेस पक्षाला आपला राजीनामा पाठवला होता का? एखाद्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला की संपूर्ण मंत्रिमंडळ सुद्धा बरखास्त होत असते. त्याचप्रमाणे आमदारांनी पक्ष बदलला म्हणजे त्याच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्ष सोडला, असा त्याचा अर्थ होतो का? या प्रश्नावर सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. एक मात्र खरे, ज्या कोणी ही आजच राजीनाम्याची शक्कल लढवली, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे. पण आता लोक शहाणे झाले आहेत. त्यांना सुद्धा आता राजकारणातील छक्के-पंजे समजायला लागले आहेत, बरे का!

गावडे पक्ष कधी सोडणार?

माजी मंत्री आणि आदिवासी नेते गोविंद गावडे यांनी एसटी आरक्षणाविषयी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आत्तापर्यंत सरकारविरोधात केलेली विधाने, त्याचबरोबर म्हार्दोळ येथील धनगर समाजाच्या युवकाला दिलेला संदेश पाहिल्यास गावडे यांची भूमिका वेळ आल्यास पक्षविरोधी जाण्याचीच दिसते. एसटी आरक्षण लागू होण्याची प्रक्रिया भाजप सरकार किती गतीने करणार आहे, हे आगामी काही महिन्यांत स्पष्ट होईलच. पण, जर आरक्षण लागू करण्यास वेळ लागल्यास किंवा ऐनवेळी प्रियोळ मतदारसंघ मित्रपक्षाला भाजपने देऊ केल्यास गावडे शांत बसणार नाहीत, हे त्यांच्या निकटवर्तीय छातीठोकपणे सांगत आहेत. त्यामुळे कदाचित जर-तर नुसार त्यांच्यावर पक्षविरोधी भूमिका घ्यायची वेळ आलीच तर ते काँग्रेस पक्षाचाही पर्याय स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे खरं महिला सशक्तीकरण

गोव्याच्या ‘ड्रोन दीदीं’नी ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केले. त्यात १२ महिला होत्या. महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात राज्यातील ही एक महत्वाची घटना होय. दर वर्षी १०० महिलांना प्रशिक्षण देण्याचं लक्ष्य ही उल्लेखनीय बाब. तंत्रज्ञानामुळे आज दैनंदिन जीवनाच्या किती तरी प्रांतांत सुलभता येत आहे. व्हिडीयोग्राफी, फोटोग्राफी, शेती अशा अनेक व्यवसायात या नव्या ड्रोन यंत्रणेचा लाभ होणार आहे. काळाप्रमाणे माथ्याक कुरपणे, अशा कोकणी म्हणीप्रमाणे आपण तंत्रज्ञान क्रांती अंगिकारून पुढं जायलाच पाहिजे. प्रशिक्षित ड्रोन दीदींनी जेव्हा ड्रोनचं प्रात्यक्षिक घडवलं तेव्हा उपस्थितांना आनंद झालाच पण, दीदींचे चेहरे हर्षाने आत्मविश्वासाने उजळून निघाले. ग्रामीण भागातील रोजगार संधी व महिला नेतृत्वाखाली उद्योजकतेला नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालायचा हा गोव्यातील महत्वाचा टप्पा ठरलाय यात दुमत नाही.

अतिथी मार खावो!

‘अतिथी देवो भव’ ही आपली संस्कृती जगाला सांगत असताना पाटो-पणजीत मात्र पर्यटकाला ‘देव’ नव्हे, तर मारहाणीचा ‘प्रसाद’ मिळत असेल तर गोव्याच्या पर्यटनाच्या प्रतिमेचे काय? ऑफशोअर कॅसिनोशी जोडलेल्या टॅक्सीचालकाने स्टार हॉटेलमध्ये जाणाऱ्या ग्राहकाला रस्त्यातच मारहाण केल्याचा प्रकार रविवारी घडला. पाहुण्याला सुरक्षितपणे हॉटेलच्या दारापर्यंत पोहोचवण्याऐवजी त्याच्यावर हात उगारण्याची ही ‘सेवा’ असेल, तर ‘अतिथी देवो भव’चा फलक काढून ‘अतिथी, सावधान!’ असा लावण्याची वेळ आली म्हणायची!

स्थानिक भाज्या अन्‌ मुख्यमंत्र्यांचे आवाहन

बाजारात गेल्यावर ५०० रुपयांचे मासे घेणार आणि लाल भाजी किंवा वांगी विक्रेत्यांकडे दरासाठी किंवा एक फळ वर टाक म्हणून हुज्जत घालणार. ही एक वृत्ती आहे. उन्हात काबाडकष्ट करून भाजी पिकवली जाते. पाणी शिंपणे, गुरांपासून संरक्षण असे अनेक प्रयत्न त्यात असतात. स्थानिक शेतकऱ्यांना उत्तेजन देण्याऐवजी खरेदीवेळी वाटाघाटी करणं हे लक्षण बरोबर नव्हे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेला सल्ला योग्य आहे. स्थानिक भाज्या खरेदी करताना ‘बार्गेनिंग’ करू नका, ही त्यांची कानउघाडणी संयुक्तिक आहे. श्रमांना प्रतिष्ठा देण्याचा संस्कार आहे तो. ताळगावला वांगी, हिरवी भाजी, वाल, तांबडी भाजी, मुळा व अन्य भाजी असते. कित्येक हमरस्त्यांवर दिवसभर वृद्ध महिलासुद्धा टोपली घेऊन विक्री करतात. कैऱ्या असतात, फुले असतात. विकत घेताना कष्टांचे स्मरण केले तर वाटाघाटीची उर्मी होणार नाही.

फलकांचे काय करायचे?

काणकोणात रस्त्याच्या कडेला वाहतूक नियमांची माहिती देणारे फलक इतके फिकट झाले आहेत की ते पाहून वाहनचालकांना नियम समजण्यापेक्षा हा फलक नेमका कोणत्या विभागाचा आहे, याचा शोध घ्यावा लागतो; मात्र दुसरीकडे ‘एआय कॅमेरे’ मात्र अगदी डोळ्यात तेल घालून वाहनचालकांवर नजर ठेवत आहेत! म्हणजे नियम सांगणारे फलक ‘गुप्तहेर’ झाले आणि नियमभंग टिपणारे कॅमेरे ‘साक्षीदार’ अशी गोव्याच्या वाहतूक व्यवस्थेची भन्नाट अवस्था आहे. फलक दिसत नाहीत, पण कॅमेऱ्यांची नजर चुकत नाही; त्यामुळे वाहनचालकांचा साधा सवाल आहे. दंड करण्यापूर्वी नियम दिसतील अशी व्यवस्था तरी करा, नाहीतर उद्या फिकट फलकावरही एआय कॅमेरा दंड ठोठावतोय, असे म्हणण्याची वेळ येऊ नये!

प्रशिक्षण देणाऱ्यांना सापत्न वागणूक का?

राज्याच्या मजूर व रोजगार खात्यातर्फे शिवण क्लास शिकवणाऱ्या काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या महिला अजूनही आपले कर्तव्य बजावत आहेत. प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या या महिला वर्गाला अजूनही पंधरा-सोळा हजार वेतनावर काम करावे लागते. दुसरीकडे, मजूर खात्याकडून रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना रोजचा भत्ता पकडला तर त्यांच्या महिन्याचे वेतन त्यांच्यापेक्षाही अधिक होते. एकीकडे सरकारी कर्मचारी आता आठवा वेतन कधी लागू होतोय याची वेळ पाहत आहेत. तर दुसरीकडे, अनेक वर्षे प्रशिक्षण देणाऱ्या महिला वर्गाचे वेतन काही वाढत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे मजूर व रोजगार खात्याने या महिलांना सापत्न वागणूक न देता किमान महागाईचा विचार करून वेतन लागू केले तर त्यांना ही गणेशोत्सवाची भेटच ठरेल.

नावेलीत ‘आप’चा कोण?

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व ‘आप’ ची युती झाली नाही तर नावेली मतदारसंघात झाडू चिन्हावर निवडणूक कोण लढविणार? सध्या नावेलीत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनामध्ये हा विषय चर्चेत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिमा कुतिन्हो ह्या ‘आप’च्या उमेदवार होत्या. पराभूत झाल्यानंतर काहीकाळ सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून त्यांनी सक्रियता दाखवून मागाहून यथावकाश कॉंग्रेस पक्षात घरवापसी केली. सिद्देश भगत यांनीही ‘आप’ला रामराम ठोकला असून, तेही तूर्तास सामाजिक कार्यकर्ते ही बिरुदावली लावून नावेलीत सक्रिय आहेत. सध्या तरी या मतदारसंघात ‘आप’कडे तसा ‘न्यू फेस’ नाही. कदाचित सिद्धेश भगत पुन्हा एकदा घरवापसी करणार तर नाही ना? सांगता येत नाही. शेवटी हे राजकारण आहे.

रितेशचा ‘फिल्म स्टुडिओ’?

फोंड्यात एका नवीन चित्रपटाच्या प्रीमियर शोला उपस्थित असलेले राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक यांनी कला मंदिरात लवकरच फिल्म स्टुडिओ सुरू करणार असल्याचे जाहीर केले. गेली चार वर्षे कमिटी नसल्यामुळे कला मंदिराची अक्षरशः दुर्दशा झाली होती. लिफ्टसुद्धा बंद असल्यामुळे कार्यक्रम करता येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची परवड होताना दिसत होती. त्यामुळे रितेशांनी ही घोषणा केल्यामुळे तिथे उपस्थित असलेल्यांना ‘उन्हाळ्यात श्रावण सरी’ पडल्यासारखे वाटले. मात्र, हे निवडणूक वर्ष असल्यामुळे आणि रितेशही एक इच्छुक उमेदवार असल्यामुळे या घोषणेला पंख फुटायला मुहूर्त कधी मिळणार? यावरही नंतर उपस्थितांत चर्चा सुरू होती. पण, तरीही रितेशांनी ही घोषणा करून राज्यातील सिने कलाकारांना दिलासा देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले, हेही नसे थोडके. नाही का?

तानावडे बनले ‘बिग बॉस’

राजकारणाच्या मैदानात आपली खेळी गाजविल्यानंतर आता खासदार सदानंद शेट तानावडे क्रीडाक्षेत्राच्या मैदानात ‘एन्ट्री’ मारण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील गोवा ऑलिंपिक असोसिएशनची नवी समिती आमसभेत ‘जीओए’ची सूत्रे स्वीकारणार आहे. श्रीपाद नाईक यांनी अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून ‘जीओए’चा कारभार सांभाळला. आता संघटनेला नवा ‘गडी’ मिळणार आहे. वजनदार राजकीय नेतृत्व क्रीडा संघटनेच्या शीर्षस्थानी आल्याने राज्यातील क्रीडा संघटनांच्या आशाही उंचावल्या आहेत. ‘आपले प्रश्न आता लवकर सुटतील’, अशी अपेक्षा अनेक संघटनांना वाटत असणारच! दुसरीकडे, क्रीडा संघटनांना अधिक सक्रिय कसे करता येईल, यावर तानावडे भर देण्याच्या विचारात असल्याचे समजते. समिती आणि संघटनांचा मेळ योग्यरीत्या जुळला तर राज्यातील मरगळलेल्या क्रीडाक्षेत्राला नक्कीच नवी ऊर्जा मिळू शकते. आता ‘बिग बॉस’ची क्रीडा मैदानातील ही नवी इनिंग किती रंगते, एवढेच पाहायचे!

भगोड्यांना धडा शिकवा

खर्गे आपल्या भाषणात गोवामुक्ती चळवळीतील काँग्रेसच्या योगदानाचा उल्लेख करताना म्हणाले की, गोव्याच्या मुक्तीमध्ये काँग्रेसने मोठी भूमिका बजावली होती. त्या वेळी मी मॅट्रिकमध्ये होतो आणि मी स्वतः गोव्याच्या मुक्तीसाठी झालेल्या आंदोलनात भाग घेतला होता. त्यांनी असा आरोप केला की, गोव्याच्या १२ मंत्र्यांपैकी १० मंत्री हे पूर्वीचे काँग्रेस नेते आहेत, ज्यांनी भाजप पक्षात पक्षांतर केले आहे. मतदारांना आवाहन करताना ते म्हणाले, ‘हे सगळे भगोडे (पळपुटे) आहेत. या भगोड्यांना लोकांनी परत मत देऊ नये.’ खर्गे यांनी ‘भगोडे’ हा शब्द उच्चारताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film City Project: जागेअभावी फिल्म सिटीचे स्वप्न लांबणीवर; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

Lucky Zodiac Signs: गुरु-शनीच्या दुर्मिळ योगानं 'या' राशी होणार श्रीमंत! दिवाळीपूर्वीच उघडणार कुबेराचा खजिना; बरसणार लक्ष्मी देवीची असीम कृपा

School Shooting: शाळेत अंधाधुंद गोळीबार; सातवीतील विद्यार्थ्यानं वर्गात झाडल्या गोळ्या, 2 जणांचा मृत्यू; 9 जण जखमी Watch Video

Goa Drug Smuggling: कुरिअर-टपाल सेवांतून ड्रग्सची तस्करी; गोवा पोलिसांची कुरिअर कंपन्यांसोबत जनजागृती मोहीम

VIDEO: LIVE सामन्यात मोठी दुर्घटना; फलंदाजाचा पॉवरफुल शाॅट अन् चेंडू थेट अम्पायरच्या गालावर! धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT