

वास्को: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दाबोळी विमानतळावर काँग्रेस आणि भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मंगळवारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी, धक्काबुक्की तसेच एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. मात्र, तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
खर्गे हे वेर्णा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या बूथस्तरीय एजंट व कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार होते. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते दाबोळी विमानतळावर जमा झाले होते. दुसरीकडे, १५ ऑगस्ट रोजी काँग्रेस भवनात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चा अवमान केल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते खर्गे यांच्या निषेधासाठी विमानतळाबाहेर जमले होते. त्यांनी काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली होती.
भाजप कार्यकर्ते विमानतळाबाहेर जमल्याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळविले. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी विमानतळ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला.
खर्गे विमानतळाबाहेर आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचा ताफा निघत असताना भाजप युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी वाहनासमोर जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना बाजूला केले. या गोंधळात काही कार्यकर्त्यांनी सोबत आणलेले काळे झेंडे खर्गे यांच्या वाहनावर भिरकावण्याचा प्रयत्न केला; मात्र झेंडे रस्त्यावर पडल्याने हा प्रयत्न फोल ठरला.
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस पक्ष हाय हाय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी विमानतळावरून बाहेर आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. काहीजणांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखले.
काही काळ तणाव
दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी धावपळ केली. त्यांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिक चिघळली नाही. या घटनेचा काही काळ विमानतळ परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. विशेष म्हणजे, दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करताना ‘वंदे मातरम्’चा घोषही सुरू होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.