Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: कोण म्हणतोय, राजकारण 'डर्टी' आहे?

Khari Kujbuj Political Satire: मे २०२६ मध्ये गोव्यात २४२ रस्ते अपघात, २२ मृत्यू, ४५ गंभीर जखमी आणि ८७ किरकोळ जखमी, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

कोण म्हणतोय, राजकारण ‘डर्टी’ आहे?

‘पॉलिटिक्स इज डर्टी गेम’ असे संबोधून राजकारणात यशस्वी न झालेल्यांनी राजकारणाला उगीच बदनाम केले आहे. राजकारणात युवा वर्ग येत नाही. शिकलेले युवक राज्यशास्त्र शिकतात, मात्र त्यांना प्रत्यक्ष राजकारण कळत नाही, असे आरोप युवा वर्गावर केले जातात. मात्र, हे अर्धसत्य असल्याचे अनेक युवकांनी सिद्ध केले. आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी राज्यात अनेक युवक सज्ज आहेत. कुडचडे मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी रोहन गावस देसाई परिश्रम घेत आहेत. सावर्डे मतदारसंघातून संकेत आर्सेकर यांनी मजबूत तयारी चालविली आहे. मडगावात विद्यमान आमदारांचे सुपुत्र, एका माजी आमदारांचा नातू व एक उद्योगपती मिळून तिघे युवक आमदार बनण्यासाठी घाम गाळत आहेत. विशाल देसाई हे युवक कुंकळळी मतदारसंघाचे आमदार बनण्यासाठी धडपडत आहेत. उत्तरेतील दोघा आमदारांचे चिरंजीव व दक्षिणेतील एक आमदार आपल्या मुलीला आमदार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मांद्रेत अमित सावंत आमदारकीसाठी झटत आहेत. डिचोलीत एक युवा उद्योजक आमदार बनण्यासाठी पैसे वाहत असल्याची चर्चा आहे. बाणावली मतदारसंघात डिक्सन वाझ, वॉरन आलेमाव, नावेलीत वालंका आलेमाव असे अनेक युवा चेहरे राजकारणात यशस्वी होण्यासाठी धडपडत आहेत. असे सकारात्मक चित्र असताना राजकारण घाणीचे डबके म्हणणे म्हणजे ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ म्हणावे लागेल...

विरोधकांची नजर आता सांगे मतदारसंघावर

‘एकीत बळ असते’ हे आपण बालवयातच बालकथेतून चांगले समजलो. मात्र, एकीत बळ असते हे आपल्या राज्यातील भाजपविरोधकांना कळत नाही की कळते, पण वळत नाही, हे समजत नाही. सांगे मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला. या मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष फळदेसाई यांना भाजपातून तरी विरोध जाणवत नाही. या मतदारसंघात आपले बस्तान मजबूत करण्यासाठी काँग्रेस व गोवा फॉरवर्डने प्रयत्न चालविले आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाने गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या मतदारसंघात चांगली कामगिरी केली होती. काही सक्रिय युवा राजकारणी गोवा फॉरवर्ड पक्षात दाखल होण्यास तयार असल्याची चर्चा आहे. एका एसटी नेत्याने यापूर्वीच फॉरवर्डचा मफलर गळ्यात घातला आहे. गोवा फॉरवर्ड सक्रिय असताना आता काँग्रेस पक्षानेही या मतदारसंघात आपले स्थान मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जर गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्ष या मतदारसंघात एकत्र आले, तरच काही वेगळे घडण्याची शक्यता आहे. अन्यथा सत्ताधारी पक्षाला या मतदारसंघात ‘वॉकओव्हर’ मिळाल्यातच जमा आहे.

रस्ता सुरक्षेच्या नावाखाली...

मे २०२६ मध्ये गोव्यात २४२ रस्ते अपघात, २२ मृत्यू, ४५ गंभीर जखमी आणि ८७ किरकोळ जखमी, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दररोज रस्ता सुरक्षा, वाहतूक शिस्त आणि जनजागृतीच्या गप्पा रंगत असल्या, तरी प्रत्यक्षात अपघातांचा वेग मात्र कमी होताना दिसत नाही. उत्तर गोव्यात १५ आणि दक्षिण गोव्यात ७ जणांनी जीव गमावला; पण प्रत्येक अपघातानंतर काही दिवस चर्चा होते आणि नंतर पुन्हा ‘जैसे थे’ अशीच परिस्थिती कायम राहते. रस्त्यांवरील खड्डे, बेफिकीर वाहनचालक, नियमांची पायमल्ली आणि अपुऱ्या अंमलबजावणीचा हा घातक संगम आता इतका नेहमीचा झाला आहे की, अपघातांची संख्या नव्हे, तर अपघात नसलेला दिवसच कदाचित बातमी ठरेल, अशी उपरोधिक परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोकणी पाठ्यपुस्तकांतील चुका

शालेय स्तरावर पाचवी ते आठवी, नवी कोकणी पाठ्यपुस्तके आली. पाचवीच्या पुस्तकात काही धड्यात लांब लांब वाक्ये आहेत, वाचताना विद्यार्थ्यांना घाम सुटावा. एका धड्यात काही वनस्पतींची शास्त्रीय नावे दिली आहेत ज्यांचा उच्चार करणं ही शिक्षा ठरावी. ‘जिंगिबेर अफ्फ्सिनालो रक’ हे आलें (जिंजर) यासाठी नाव दिले आहे. मुळात ते चुकीचं. एलेटारिया कार्डमो नीवं हे ‘वेल्ची’साठी दिलं आहे. वेलचीचं वेल्ची कधी झालं कळत नाही. हे फक्त हिमनगाचं टोक. सातवीच्या पुस्तकात सुरवातीला ‘भारताचे (चें) संविधान’ असं दिलंय. अनुस्वार हा कोंकणी तज्ञांना अजून हुलकावणी देत आहे. सायडीन (कुशीक) असा इंग्रजी शब्द आहे. चुकांवरच एक पुस्तक व्हावं. कोंकणी शिक्षणाच्या क्षेत्रात सर्व स्तरावर जी अंदाधुंदी चाललीय त्यावरून म्हालगड्यांना भविष्याची काळजी वाटू लागली आहे.

अरुणसायबांवर वर्कलोड ....

मडगावचे ‘पीआय’ अरुण गावस देसाई यांच्याकडे तूर्तास मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचा अतिरिक्त ताबा आहे. या ठाण्यातील पोलिस निरीक्षक कपिल नायक हे सध्या रजेवर आहेत. मडगाव व मायणा कुडतरी या दोन्ही पोलिस ठाण्यांची जबाबदारी सांभाळणे म्हणजे एका प्रकारे कसरतच. एका युवकाला मारहाण केल्याप्रकरणी मायणा कुडतरीतील तीन पोलिस निलंबित झाले, तर दोन ‘पीएसआय’वर शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांच्या राखीव पोलिस दलात पाठवण्यात आले. आता मायणा कुडतरीत केवळ दोन उपनिरीक्षक आहेत. त्यातील एक महिला अधिकारी आहे. या ठाण्याचा आवाका बराच मोठा आहे. हाती असलेल्या या कर्मचाऱ्यांसह हे ठाणे हाताळणे बरेच कठीण आहे. आता अरुणसायबही तो अनुभव घेत आहेत.

चिऱ्याला पाय फुटले?

कुळे परिसरातील आगळोटे येथे सरकारी महसूल आणि वनजमिनीतून अज्ञातांनी चक्क चिरे काढून नेल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडांची चोरी झाली, सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले; परंतु हे सर्व करणारे ‘अज्ञात’च राहिले. दगडांनी स्वतः चालत जाऊन जागा बदलली नसावी, तरीही दोषींचा मागमूस लागत नाही, हीच खरी गंमत. सरकारी जमीन, वनक्षेत्र आणि नैसर्गिक संपत्तीवर डल्ला मारणाऱ्यांचे हात मात्र अद्यापही कायद्याच्या आवाक्याबाहेरच असल्याचे चित्र दिसत आहे. ‘चिरे गेले; पण चोर कुठे गेले?’ हा प्रश्न आता सर्वसामान्यांनाही पडला आहे.

पोर्तुगीज पासपोर्टधारकांना दिलासा

पासपोर्ट हे प्रवासासाठी वापरले जाणारे कागदपत्र असून तो नागरिकत्वाचा दाखला नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. यावर राजकीय भाष्यकार राधाराव ग्रासियस यांनी गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्टधारकांना या निर्णयाचा फायदा होणार का, असा सवाल केला आहे. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट टाकली आहे. पोर्तुगालमध्ये आपली नावनोंदणी करून त्या देशाचा पासपोर्ट घेणे म्हणजे त्या देशाचे नागरिक होणे असे नव्हे, यावर आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. राधाराव म्हणतात, गेली कित्येक वर्षे मी हेच सांगत आलो आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही तेच सांगितले आहे. ते म्हणतात, आता तरी माझे म्हणणे कुणी गांभीर्याने ऐकून घेणार का? विधानसभा निवडणुकीत राधाराव हा मुद्दा म्हणून राजकीय व्यासपीठावर तर आणू पाहत नाहीत ना?

विरोधकांची नजर आता सांगे मतदारसंघावर

‘एकीत बळ असते’ हे आपण बालवयातच बालकथेतून चांगले समजलो. मात्र, एकीत बळ असते हे आपल्या राज्यातील भाजपविरोधकांना कळत नाही की कळते, पण वळत नाही, हे समजत नाही. सांगे मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला. या मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष फळदेसाई यांना भाजपातून तरी विरोध जाणवत नाही. या मतदारसंघात आपले बस्तान मजबूत करण्यासाठी काँग्रेस व गोवा फॉरवर्डने प्रयत्न चालविले आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाने गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या मतदारसंघात चांगली कामगिरी केली होती. काही सक्रिय युवा राजकारणी गोवा फॉरवर्ड पक्षात दाखल होण्यास तयार असल्याची चर्चा आहे. एका एसटी नेत्याने यापूर्वीच फॉरवर्डचा मफलर गळ्यात घातला आहे. गोवा फॉरवर्ड सक्रिय असताना आता काँग्रेस पक्षानेही या मतदारसंघात आपले स्थान मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जर गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्ष या मतदारसंघात एकत्र आले, तरच काही वेगळे घडण्याची शक्यता आहे. अन्यथा सत्ताधारी पक्षाला या मतदारसंघात ‘वॉकओव्हर’ मिळाल्यातच जमा आहे.

व्हिडिओ आधी की जीव?

आजकाल कुठे काही घडलं की आधी मोबाईल बाहेर येतो आणि मग माणसं! बागा किनाऱ्यावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतरही अशीच चर्चा रंगली. व्हिडिओ करताना समुद्राच्या लाटांनी जीव घेतला आणि तो क्षण मोबाईलमध्ये कैद झाला. आता गावोगावी चर्चा अशी की, ‘फोटो काढा, व्हिडिओ काढा, रील बनवा... पण स्वतःच रीलचा विषय बनू नका!’ समुद्र हा फिल्टर लावून शांत दिसतो, पण त्याचा स्वभाव क्षणात बदलतो. लाटांना ना लाईक्स कळतात, ना फॉलोअर्स. म्हणूनच आता नवा मंत्र तयार झाला आहे, ‘सेल्फी नंतरही काढता येईल, पण श्वास आधी वाचला पाहिजे.’ कारण शेवटी व्हायरल व्हिडिओपेक्षा सुरक्षित घरी परतलेला माणूसच जास्त महत्त्वाचा असतो. समाजमाध्यमावर सतत फिरणाऱ्या या व्हिडिओचा धसका मात्र अनेकांनी घेतला आहे.

विरोधकांचा बसस्टॉप नेमका कुठे?

कदंब बस ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी. रोज हजारो प्रवासी वेळेवर कामावर, शाळेत, कॉलेजात पोहोचण्यासाठी ‘कदंब’वर अवलंबून असतात. पण, हीच बस मध्येच बंद पडली की प्रवाशांची धावपळ सुरू होते आणि वेळेचे गणितही बिघडते. यावर लोकांमध्ये एक भन्नाट चर्चा रंगली. बस बंद पडली की प्रवासी ढकलायला पुढे येतात, पण सरकारला ढकलायला विरोधक मात्र कुठेच दिसत नाहीत! एखाद्या पत्रकार परिषदेत माईकसमोर दिसणारे नेते बसस्थानकावर मात्र क्वचितच दिसतात. लोक तर गंमतीने म्हणू लागले आहेत, आता प्रवाशांना प्रश्न पडला आहे, बस रस्त्यावर आहे, सरकार सत्तेत आहे... पण विरोधक नेमके कोणत्या मार्गावर धावत आहेत?

पाटकरांच्या हातात करवंटी

बुधवारच्या वीज खात्यावरील मोर्चात कार्यकर्त्यांनी हातात कट्ट्या (करवंट्या) घेतल्या, जमिनीवर लोळण घेतली... त्यामुळे अमित पाटकर थोडे लाजले. फॉर्च्युनर गाडीने फिरणारे, छान धुतलेला शर्ट परिधान केलेल्या पाटकरांना मनीषा उसगावकर यांच्यासारख्या अशा उचापती करण्याची सवय नाही. त्यामुळे ते थोडे लाजत होते; परंतु मनीषाने त्यांना मनोहर पर्रीकरांची आठवण सांगितली. मनीषा सुरुवातीला पर्रीकरांच्या तालमीत तयार झाली आहे. ते म्हणायचे, ‘राजकारण करायचेय तर लाजून चालणार नाही. शिगमा करायची तयारी ठेवा!’ मनीषाने पाटकरांना सुनावले, ‘तुला आमदार व्हायचेय ना, आता रस्त्यावर झोपायची, हातात कट्टी धरायची तयारी ठेव.’ पाटकरांना त्याचा पहिला धडा बुधवारी मिळाला. एकूण मनीषांच्या तालमीत पाटकर गडी तयार होईल, असे वाटायला लागले आहे.

चोडणकरांना उपरती!

वीज खात्यावर बुधवारी अमित पाटकर व त्यांच्या समर्थकांनी काढलेला मोर्चा ‘काँग्रेसचा नाही’ असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना गुरुवारी उपरती झाली. ‘हा काँग्रेसचा मोर्चा होता’, असे विधान त्यांना करावे लागले. त्यामुळे पाटकर समर्थकांची हसून हसून पुरेवाट झाली. या मोर्चात आमदार कार्लुस फेरेराही सहभागी झाले होते आणि पाटकर तर कधी नव्हे ते आपला शर्ट मळू देत जमिनीवरही झोपले. मनीषा उसगावकर हातात कट्ट्या घेऊन तार स्वरात ओरडत होती... नाही म्हणायला समाज माध्यमांवर बऱ्याच लोकांनी हे पाहिले व कॉंग्रेसचा मोर्चा नाही म्हणणाऱ्या चोडणकरांना लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. समाज माध्यमे खवळली. तुला भुर्दंड बसला नाही का? वीज दरवाढ तुला लागत नाही का? असे प्रश्‍न गिरीशना नेटकऱ्यांनी विचारले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. आता निवडणुका होईपर्यंत चोडणकरांना थोडे संयमाने व हुशारीने वागावे लागणार आहे.

सुदेश-आग्नेलो एकत्र..!

येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळंगुटमध्ये राजकीय हवा तापली आहे. निवडणुका जवळ येताच समाजकारणाचा पूर येतो, पण कळंगुटमध्ये सध्या भल्याभल्यांच्या भुवया उंचावणारी एक वेगळीच कुजबूज सुरू आहे. निमित्त ठरले ते नुकत्याच झालेल्या रेनकोट वाटपाचे! पक्के काँग्रेसवादी असलेले माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस आणि भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक असलेले समाजसेवक सुदेश मयेकर हे दोन परस्परविरोधी विचारसरणीचे नेते अचानक एकाच मंचावर एकत्र आले. वरकरणी हे सामाजिक कार्य वाटत असले, तरी राजकारणात ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हा नियम अचूक लागू होतो. या दोन्ही नेत्यांचा सामाईक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे कळंगुटचे बलाढ्य आमदार मायकल लोबो. त्यामुळे दोन वेगळ्या किनाऱ्यांचे हे नेते एकत्र येणे म्हणजे लोबोंना आव्हान देण्याची अंतर्गत तयारी तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या नव्या युतीमुळे ‘कळंगुटमध्ये नक्कीच काहीतरी शिजतेय.’ बघूया पुढे काय होते ते!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Revolutionary Goans Party: 'आरजीपी'तील वाद पोलिसात! पक्षाच्या सोशल मीडियाच्या खात्याचा बेकायदा ताबा

Goa Monsoon: मान्सूनचा दमदार कमबॅक! पाच दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी, तीन दिवसांत 24 टक्के तुटवडा निघाला भरून

Goa Crime: दारूच्‍या नशेत बेदम मारहाण; एकाचा मृत्‍यू, चिखली-कोलवाळ येथे 'सांजाव'ला गालबोट; चौघे संशयित अटकेत

Kadamba Electric Bus: ई-बसेसना 29 तासांचा 'ब्रेक', कदंबची चार्जिंग व्यवस्था ठप्प; अनेक मार्गांवरील बससेवा बंद

Horoscope: शुक्रवार ठरणार सुपर लकी! 'या' राशींना धनलाभ, पदोन्नतीसह करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

SCROLL FOR NEXT