

म्हापसा: पारंपरिक ‘सांजाव’ सणाच्या आनंदाला बुधवारी दारूच्या नशेमुळे गालबोट लागले. मानसीवाडा-चिखली (कोलवाळ) येथे जुन्या वादातून झालेल्या बेदम मारहाणीत कृष्णा (शांगो) नाईक (६०) यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून ख्रिस्तोफर पॉल (रा. चिखली) आणि प्रतीक गावस (रा. नादोडा) या दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, फरार असलेले संशयित आरोपी स्टीफन पॉल (२२, रा. चिखली) आणि श्रवण शेटकर (२०, बांदोडा) हे दोघेही गुरुवारी सायंकाळी शरण आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी ख्रिस्तोफर पॉल व त्याच्या भावाचा कृष्णा नाईक यांच्याशी पूर्वीपासून वाद होता. त्याच वादातून काल सायंकाळी पाचच्या सुमारास संशयितांनी दारूच्या नशेत कृष्णा नाईक यांच्यावर अचानक हल्ला चढविला.
दंडुके व लाथा-बुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी कृष्णा यांना वाचविण्यासाठी धावलेले त्यांचे बंधू रुपेश आणि महेश यांनाही मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कृष्णा नाईक यांना तातडीने गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कोलवाळ पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून ख्रिस्तोफर पॉल आणि प्रतीक गावस या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरोधात गुन्हाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जुना वाद आला उफाळून : प्राथमिक तपासात कृष्णा नाईक आणि मुख्य संशयित ख्रिस्तोफर पॉल यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचे समोर आले आहे. ‘सांजाव’ सण साजरा करून परतताना झालेल्या भेटीनंतर हा वाद पुन्हा उफाळून आला आणि त्याचे रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले.
दारूच्या नशेत असलेल्या संशयितांनी कृष्णा नाईक यांना लाथाबुक्क्यांनी तुडवले. तसेच दंडुक्यांनी बडवले. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेले कृष्णा नाईक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.