Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: शिल्लक मंत्रिपद कोणाला?

Khari Kujbuj Political Satire: गिरीश चोडणकर यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर बरीच नानाजी व्यक्त झाली आहे व त्यांनी २१ जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्याची घोषणा केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

शिल्लक मंत्रिपद कोणाला?

प्रमोद सावंत मंत्रिमंडळात एक जागा रिकामी आहे. ती बंगाल निवडणुकीनंतर भरण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले होते; त्यामुळे आमदारांमध्ये चुळबूळ सुरू झाली आहे. प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना पुन्हा स्वप्ने पडू लागली आहेत. परंतु गेल्या वर्षभरात त्यांनी काय भरीव काम करून दाखवले, पक्षसंघटनेसाठी त्यांनी काय योगदान दिले, हे मुद्दे समोर आले. दुसरी गोष्ट म्हणजे गावडे यांची गच्छंती झाल्यानंतर त्यांच्या जागी दुसरा एसटी मंत्री आला; सभापती पद ‘एसटी’ला मिळाले. त्यामुळे तो स्लॉट संपला. आता त्या जागी महिलेला मंत्रिपद मिळू शकते. ते दिलायला लोबो यांना मिळणार का, या प्रश्नाचे उत्तर मायकल यांचे प्रमोद सावंत यांच्याशी वैयक्तिक संबंध कसे आहेत, यावर ठरणार आहे. पक्षाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दिल्लीला सोमवारी जाणार असल्याने या भेटीत मंत्रिपदाचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे.

गिरीश यांची कसोटी!

गिरीश चोडणकर यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर बरीच नानाजी व्यक्त झाली आहे व त्यांनी २१ जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्याची घोषणा केली आहे. ते म्हणतात की, त्यांचे उमेदवार तयार आहेत; पण त्यांच्या बूथ समित्या अस्तित्वात आहेत का? संघटना कुठे आहे? मनीषा यांच्यासारख्या तडफदार महिला कार्यकर्त्या पक्ष सोडून गेल्या. विश्वजीत राणेंविरोधात त्या एकट्या लढत होत्या. दक्षिणेत ठीक आहे; परंतु उत्तर गोव्यात पक्षाची हालत काय आहे? तेथे पक्ष पुन्हा उभारायला त्यांना खूप श्रम पडणार आहेत. गिरीशना वाटतेय तेवढे ते सोपे नाही. गिरीश यांच्या विश्वासार्हतेचीही कसोटी लागणार आहे!

‘लकी’ मुख्यमंत्री!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीला सहकुटुंब पंतप्रधान व गृहमंत्र्यांना भेटून आल्यापासून खुश आहेत. काल घटकराज्य दिनी पंतप्रधानांनी त्यांना तीन पानी पत्र पाठविले. त्यामुळे तर मुख्यमंत्री निर्धास्त झाले व राजकारणातील त्यांचा शीण कुठल्या कुठे निघून गेला. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी त्यांना सप्टेंबरमध्ये गोव्यात येण्याचे अभिवचन दिले असून त्यासाठी प्रकल्प तयार करण्याची सूचना केली आहे. निवडणुकीपूर्वीचे हे राज्यासाठी पॅकेज असेल. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. आरजी पक्षात फूट पडली आहे. या पक्षाच्या दहा टक्के मतांना तडा गेला आहे. भाजप पूर्वीपेक्षा बळकट झाला असल्याचे ते सांगतात. सारे काही डॉ. प्रमोद सावंत यांच्या मनासारखे होत आहे... ते खरोखरच ‘लकी’ मुख्यमंत्री ठरले आहेत.

हम करे सो कायदा!

भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत अनेक आमदार व मंत्र्यांनी ज्याप्रकारे नोकरभरतीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते चिडले आहेत. आमदारांना वाटते की सरकार त्यांनीच चालवावे व सर्व कर्मचारी त्यांच्याच संमतीने भरले गेले पाहिजेत. परंतु त्यामुळे वशिलेबाजीने कर्मचारी येतात, ते कामे करीत नाहीत. बुद्धिवानांवर अन्याय होतो. यापूर्वी पीडब्ल्यूडीमध्ये इंजिनीयर भरताना मोठा गफला झाला, एका मंत्र्याला घरी जावे लागले. पक्षश्रेष्ठीही नाराज झाले होते. अशाप्रकारांमुळे सरकारवर शिंतोडे उडतात. गोवा लोकसेवा आयोगामार्फत या जागा भरण्यास सुरवात झाल्यावर कार्यकर्तेही खुश झाले होते. मत्र्यांना मात्र सरकार म्हणजे हम करे सो कायदा वाटते, त्याला कोण काय करणार! (गंमत म्हणजे काही काँग्रेस आमदार कर्मचारी घुसवता यावेत म्हणूनच भाजपात सामील झाले होते, त्यांची मत गोची झाली आहे, राजेश फळदेसाई यांच्यासारखी!

दिगंबर निवांत अमेरिकेत

निवडणूक निकट आली आहे आणि मडगावमध्ये अनेक तरुण नेते गर्जत आहेत. एकेकाळचे दिगंबर यांचे खंदे समर्थक दत्ता नायक आता काँग्रेसच्या खजिनदारपदी आले आहेत. त्यामुळे चिराग नायक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल यात कोणतीही शंका नाही; परंतु असे असले तरी दिगंबर कामत कुठे आहेत? त्यांचे कार्यकर्ते सांगतात की, दिगंबर निर्धास्त आहेत आणि ते आपल्या कन्येकडे सुट्टी घालवायला अमेरिकेत गेले आहेत. गेले पंधरा दिवस दिगंबर संपूर्ण कुटुंबासह बोस्टन व इतर ठिकाणी मजा करीत आहेत. दिगंबर कामत यांना कसलेही टेन्शन नाही, असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात; खरे असेलही कदाचित, कारण निवडणुकीचे बिगुल वाजत असताना एखादा राजकारणी पंधरा दिवस सुट्टीवर का जाईल?

नवीन मंत्री काय करणार?

मंत्रिपद जरी पुढच्या पंधरा दिवसांत भरण्याचे संकेत मिळत असले तरी निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. गेली विधानसभा निवडणूक फेब्रुवारीत झाली होती. त्यामुळे प्रत्यक्ष कामासाठी पुढचे सहा महिनेच मिळणार आहेत. जो कोणी मंत्री बनेल तो केवळ कार्यकर्ते व लोकांच्या अपेक्षा वाढवेल. भरीव काम करू शकणार नाही. शिवाय खर्चासाठी पैसा कुठे आहे? अनेक जुनी बिले खोळंबली आहेत. पायाभूत सुविधा वाढवून ठेवल्या आहेत. परंतु पैसा नाही. अर्थसंकल्पातही तरतूद नाही. आता निवडणूक मोडमध्ये सरकार जाणार असल्याने नोकरशाही काही ऐकणार नाही. नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू शकते... एकंदरीत नवीन मंत्र्यांकडे आव्हानेच जादा असतील!

नावेलीत सिप्रू सक्रिय

नावेलीत आता राजकीय ज्वर चढू लागला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यात माजी जिल्हा पंचायत सदस्य सिप्रु कार्दोज यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. नावेली जिल्हा पंचायतीचे त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या वर्षी गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते नावेलीत सक्रिय झाले असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गेल्या निवडणुकीत नावेलीत उमेदवारांची भाऊगर्दी झाली होती. मतविभागणीचा लाभ भाजपचे उल्हास तुयेकर यांना झाला आणि या मतदारसंघात भाजप पहिल्यांदाच विजयी झाला होता. त्याची पुनरावृत्ती होणार का, हे पाहावे लागेल. कारण, वालांका आलेमाव आणि प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह अनेक हौसे-गौसेही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. बघूया, पुढे काय घडते ते.

चोडणकरांना २१ आमदार हवेत!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गिरीश चोडणकर यांनी सूत्रे हातात घेतली आणि आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष २१ जागा जिंकणार व सरकार स्थापन करणार, असा आत्मविश्वास व्यक्त केला. २१ चा आकडा गाठला तर पक्षांतर होणार नाही, असेही ते म्हणाले. गिरीशबाब काठावरच्या बहुमतावरच का अडकले, हा प्रश्न अनेकांना पडलेला असणार आहे. त्यामुळे गिरीशरावांचे २१ आकड्यावरील संबोधन ऐकण्यासाठी यापूर्वी २०२७ मध्ये २७ जागा जिंकू, असे सांगणारे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव मात्र यावेळी हजर नव्हते. आता पाहूया, परदेशातून परतल्यावर युरीबाब किती जागा जिंकणार, यावर काय म्हणतात ते

फातोर्ड्याचे महत्त्व

एकेकाळी मडगाव हे गोव्यातील राजकारणाचे मुख्य केंद्र होते. आता फातोर्डाची स्थिती तशी झाली आहे. परवा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनीही स्पष्ट केले की, फातोर्डा हा मडगावचा विस्तारित भाग राहिलेला नसून ते नवे मडगाव बनले आहे. आता तर फातोर्डाचे महत्त्व भलतेच वाढल्याचे बोलले जाऊ लागले आहे. फातोर्डात तीन पक्षांचे प्रदेशाध्यक्ष राहतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि आता काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर. त्यामुळे गोव्यातील राजकारणातील घडामोडी या निवडणूक वर्षात फातोर्डातूनच सुरू होतील, असे लोक म्हणू लागले आहेत. बघूया, फातोर्डा या तिघांसाठी किती नशीबवान ठरतो!

‘एनएसयूआय’ला अध्यक्ष मिळणार?

गोवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा गिरीश चोडणकर यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करणे, जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे आणि सरकारला विविध मुद्द्यांवर घेरणे, ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील. त्यासाठी युवक आणि विद्यार्थी संघटनांनाही नवसंजीवनी देणे आवश्यक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या गोवा ‘एनएसयुआय’ अध्यक्षपदाच्या नियुक्तीकडे लक्ष वेधले जात आहे. या पदासाठी दोन इच्छुकांमध्ये चुरस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गिरीश चोडणकर यांचा पहिला मोठा संघटनात्मक निर्णय कोणता ठरतो आणि ‘एनएसयुआय’ला नवा अध्यक्ष कधी मिळतो, याकडे विद्यार्थी नेते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: चोडणकरांनी स्वीकारला पदभार; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह

"सिंधुदुर्गात गुन्हेगारांना अभय मिळतंय!" गोवा बनावटीच्या दारू तस्करीवरून नीलेश राणेंचा थेट पोलीस अधीक्षकांवर हल्लाबोल Watch Video

VIDEO: 'आरजी'च्‍या बैठकीत खडाजंगी, आमदार बोरकर आणि अजय खोलकर यांच्यात शाब्‍दिक द्वंद्व; तब्बल पाच तास 'तू-तू, मै-मै'

Horoscope: रविवार 'या' राशींच्या लोकांसाठी ठरणार वरदान! प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळणार गुड न्यूज, अपार धनलाभाची शक्यता

Goa Cash For Job Scam: मुलाला पीएसआयची नोकरी देण्याचं आमिष दाखवून निवृत्त पोलिसाला 10 लाखांचा गंडा VIDEO

SCROLL FOR NEXT