

पणजी: स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेची तब्बल ३७६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘लील इलेक्ट्रिकल्स लिमिटेड’ (पूर्वीची लॉयड इलेक्ट्रिक ॲण्ड इंजिनिअरिंग लिमिटेड), कंपनीचे मुख्य प्रवर्तक भारत राज पुंज आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंगच्या तपासाअंतर्गत गोव्यासह देश-विदेशातील सुमारे ११२.९० कोटी रुपयांच्या २२ जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. ईडीच्या जयपूर विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली आहे.
ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये दिल्ली, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू येथील जमीन, औद्योगिक भूखंड आणि निवासी इमारतींचा समावेश आहे.
याशिवाय, अमेरिकेतील टेक्सास (ह्युस्टन) येथील एक निवासी मालमत्ता, बँक खात्यांमधील शिल्लक रक्कम, मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरही ईडीने टाच आणली आहे. तपासात ही सर्व मालमत्ता प्रवर्तक कुटुंबाच्या मालकीची आणि त्यांच्याच नियंत्रणाखाली असलेल्या बनावट कंपन्यांच्या नावावर लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नवी दिल्ली येथे ‘लील इलेक्ट्रिकल्स लि.’, भारत राज पुंज आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आयपीसी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावरून स्पष्ट झाले की, संशयितांनी बनावट आणि फेरफार केलेली वित्तीय पत्रके सादर करून ‘एसबीआय’च्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाची ३७६ कोटी रुपयांची फसवणूक केली. यावरूनच ईडीने ''पीएमएलए'' कायद्यांतर्गत स्वतंत्र तपास सुरू केला होता.
ईडीच्या तपासानुसार, संशयितांनी कंपनीच्या खात्यांमध्ये मालमत्ता, इन्व्हेंटरी आणि येणे असलेल्या रकमा दाखवून बँकांकडून कर्ज मिळवणे सुरूच ठेवले. हा निधी प्रवर्तकांच्या नियंत्रणाखालील इतर कंपन्यांच्या नेटवर्कद्वारे फिरवण्यात आला, तसेच परदेशातील उपकंपन्यांना गुंतवणूक आणि कर्जाच्या नावाखाली हस्तांतरित करण्यात आला.
या पैशांचा मोठा हिस्सा भारतातून बाहेर पाठवून त्यातून अमेरिकेत भारत राज पुंज आणि त्यांची पत्नी पूजा पुंज यांच्या नावे संयुक्त मालमत्ता खरेदी करण्यात आली होती, जी आता जप्त केली आहे.
आईच्या नावावरही वळविला निधी
घोटाळ्यातील पैसा नंतर स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आला. यातील काही मालमत्तांची विक्री करून आलेली रक्कम प्रवर्तक कुटुंबाच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरली. यामध्ये भारत राज पुंज यांची आई रेणू पंजाब यांच्या नावावरही निधी वळविल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ईडी करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.