म्हापसा: आचार्य अत्रे यांच्या अजरामर ‘तो मी नव्हेच’ नाटकातील लखोबा लोखंडे हे पात्र भरपूर गाजले होते. अनेक महिलांना फसविणारा हा लखोबा अशी या पात्राची ओळख. त्यामुळे हे नाव फसवेगिरीशी जोडले गेले. आता आधुनिक काळात असे ‘लखोबा’ भलतेच उद्योग करताहेत. याच धर्तीवर गोव्यातही एक लखोबा लोखंडे अवतरला आहे.
वेरे, रेईश मागूश येथील एक महिला याशिका योगेश सावंत यांची द्विभार्याविवाह करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली साळगाव पोलिसांनी फिर्यादी महिलेचे पती योगेश सावंत ऊर्फ देवेंद्र भोसले (रा. सध्या मुंबई) आणि सासू सासऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हा द्विभार्याविवाह आणि फसवणुकीचा प्रकार ९ नोव्हेंबर २००९ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
संशयित योगेश सावंत ऊर्फ देवेंद्र भोसले याने फिर्यादी पत्नीसोबत लग्नापूर्वी आपली पूर्वीचे दोन लग्ने आणि बलात्काराचा गुन्हा जाणीवपूर्वक लपवला आणि तक्रारदार महिलेशी लग्न झाल्यानंतरही संशयिताने आपले विवाहबाह्य संबंध सुरू ठेवले. तसेच घटस्फोटाद्वारे कायदेशीर विवाह संपुष्टात न आणता पुन्हा लग्ने करून तक्रारदार पत्नीची फसवणूक केली.
शिवाय, पुढे संशयिताने फिर्यादींचा मानसिक छळ, भावनिक अत्याचार, अपमान, मानहानी आणि हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यास तिला प्रवृत्त केले.
ज्यामुळे तक्रारदार महिलेला तीव्र भावनिक त्रास, भीती आणि मानसिक आघात झाला. परिणामी तिच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे.
अशा द्विभार्याविवाह आणि फसवणुकीच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहितेच्या ८२(१), ८५, ३१८ व ३(५) कलमान्वये पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे. अनेक लग्ने करून महिलांची फसवणूक व मुलांची हेळसांड करणाऱ्या या लखोबा लोखंडेबद्दल सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी संशयित योगेश सावंत यांच्याशी संपर्क साधला असून तो सध्या देशाबाहेर आहे. भारतात परतल्यावर चौकशीला हजर राहण्याची सूचना पोलिसांनी त्याला केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय फातर्पेकर हे करत आहेत.
१.२००९ मध्ये फिर्यादी याशिका सावंत यांची मॅट्रिमोनी या संकेतस्थळावर संशयित योगेश सावंत यांच्याशी ओळख झाली, नंतर त्यांनी लग्न केले. हे लग्न दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थित झाले. त्यावेळी उपनिबंधक कार्यालयात कायदेशीर विवाह नोंदणी करण्यात आली नाही, तर फिर्यादीच्या अट्टाहासामुळे २०१३ मध्ये ही विवाह नोंदणी करण्यात आली.
२.योगेश सावंत याचे या लग्नापूर्वी दोन लग्ने झाली होती, तसेच २००९ मध्ये एका महिलेच्या तक्रारीनुसार लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याखाली त्याला अटक झाली होती. संशयिताने २०१४ मध्ये तिसरे लग्न केले व तो फिर्यादी पत्नी व आपल्या लहान मुलीला टाकून गोवा सोडून मुंबईमध्ये गेला. तिथे गेल्यावर त्याने अजून दोन महिलांसमवेत लग्ने केली. सध्या देवेंद्र भोसले हे नाव बदलून संशयित मुंबईत राहत असल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.