पणजी : Goa आरोग्य खात्याच्या प्रलंबित असलेल्या सुमारे 100 कोटींच्या बिलांना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांना दिलासा मिळाला आहे. मागील बैठकीत या बिलांवरून आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री (Goa CM DR. Pramod Sawant) यांच्यात खडाजंगी झाली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर त्यावर पांघरूण घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बैठकीला आरोग्यमंत्र्यांसह सर्व मंत्री उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, कोविडच्या सर्व थकित बिलांना मुख्यमंत्र्यांनी संमती दिली. गोमेकॉच्या ह्रदयरोग विभागाला हल्लीच निधन झालेल्या डॉ. मंजुनाथ देसाई यांचे नाव देण्याचा प्रस्ताव या बैठकीत होता. राज्यभर मुख्यमंत्री चषक स्पर्धा होत आहे व ती वाळपईतही झाली तरी तिला विरोध नाही मात्र त्यासाठी युवक पुढे येणे आवश्यक आहे.
उर्वरित 150 कुटुंबियांनाही सौरऊर्जा
राज्यातील ग्रामीण भागात ज्या ठिकाणी वीज वाहिन्या नेता येत नाहीत तेथे सरकारने सौरऊर्जा पुरवठा केला होता. तेव्हा सुमारे 150 घरांना ही सौरउर्जेची सोय देण्यात आली होती. त्यावेळी काही कुटुंबांनी त्यासाठी अर्ज केला नव्हता. आता ही सुविधा सोयीस्कर असल्याचे मत या कुटुंबियांचे झाल्याने त्यांनीही अर्ज केला आहे. त्यामुळे त्या उर्वरित 150 कुटुंबियांनाही सौर ऊर्जा पुरवठा करण्यास बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी सांगितले.
डांबरीकरणाचे काम लवकरच
राज्यात सुमारे 80 टक्के रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले आहे. सरकारने दिलेल्या मुदतीत ते 100 टक्के पूर्ण करणे शक्य नाही. खड्डे बुजविल्यानंतर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाईल असे वीजमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.
राज्य पर्यटन धोरणालाही मंजुरी
कित्येक वर्षे अडकून पडलेल्या राज्य पर्यटन धोरणाला मंजुरी देण्यात आली. या पर्यटन धोरणाद्वारे सरकार फक्त समुद्रकिनारी पर्यटनावरच अवलंबून नाही तर ग्रामीण अंतर्गत पर्यटन, पर्यावरण पर्यटन, वासरा पर्यटन, आरोग्य पर्यटनावर अधिक भर देणार आहे. राज्यातील पर्यटन हे धोरण व नियोजनानुसार पुढे नेले जाणार आहे, असे पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.