Goa Campal Swimming Pool कांपाल येथील जलतरण तलावात नियमित सरावासाठी मंगळवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रातील युवा जलतरण प्रशिक्षणार्थी सरावासाठी आले तेव्हा त्यांची पाचावर धारण बसली.
कारण तलावातील पाण्यात मगरीचे एक पिल्लू आरामात पोहत होते. त्यानंतर गोवा क्रीडा प्राधिकरण आणि खेलो इंडियातील संबंधितांनी त्या पिलास पकडून वन खात्याच्या हवाली केले; पण सध्या या प्रकल्पात भीतीचे वातावरण आहे.
कांपाल येथील क्रीडा संकुलाच्या जवळील ओहोळातून मगरीचे पिल्लू जलतरण तलावात दाखल झाले असावे, असा अंदाज या जलतरण प्रकल्पाचे प्रमुख आल्बर्ट दोरादो यांनी व्यक्त केला, तरीही हे पिल्लू नेमके कसे दाखल झाले याबाबत अनभिज्ञता आहे.
प्रशासनाने या प्रकरणी त्वरित लक्ष घालून मगर असल्यास जेरबंद करावे, अशी मागणी युवा खेळाडूंच्या पालकांकडून होत आहे. ‘या ठिकाणी सकाळच्या सत्रात खेलो इंडिया प्रशिक्षणार्थी, नंतर आरसीसी व सर्वसामान्य जलतरणपटू सकाळ व संध्याकाळच्या सत्रात येतात.
या भागात मगरीचे वास्तव्य असल्यास त्याचा धोका केवळ जलतरणपटूच नव्हे, मैदान संकुलात खेळणाऱ्या खेळाडूंनाही आहे,’ असे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतील एका प्रशिक्षकाने सांगितले.
सापांचाही खुलेआम वावर
‘गोमन्तक’ने गुरुवारी कांपाल येथील क्रीडा संकुल परिसरास भेट दिली असता, तेथील भयावह परिस्थितीची जाणीव झाली. प्रकल्पाच्या बाजूस, मैदानाच्या कडेला झुडपे वाढली आहेत. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर अपेक्षित आहे.
‘‘या परिसरात सापही आहेत. मैदानाच्या कडेला असलेल्या गवतात, झुडपांत तसेच ओहाेळाच्या बाजूस आम्ही साप पाहिले आहेत. त्यामुळे आम्ही नेहमीच प्रशिक्षणार्थींना याबाबत सावधानतेचा इशारा देतो,’’ असे या आणखी एका क्रीडा प्रशिक्षकाने सांगितले.
खाडीला जोडलेला ओहोळ
जलतरण प्रकल्प आणि इनडोअर स्टेडियम भागातून जाणारा ओहोळ सांतिनेज खाडीला जोडलेला आहे. या खाडीत मगर असल्यास पिल्लू ओहाळातून पुढे सरकले असेल आणि नंतर जलतरण प्रकल्पात शिरले असावे असाही अंदाज आहे. कारण नूतनीकरण कामानिमित्त या प्रकल्पाला काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत.
मंगळवारी सकाळी जलतरण तलावात मगरीचे पिल्लू सापडले. प्रकल्प प्रमुख या नात्याने मी यासंबंधी माहिती कार्यकारी संचालकांना दिली असून, जलतरण तलाव प्रकल्प भोवताली काही त्रुटी असल्यास त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केली आहे.
- आल्बर्ट दोरादो, कांपाल जलतरण प्रकल्प प्रमुख.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.