Goa News | Fish Market
Goa News | Fish Market  Dainik Gomantak
गोवा

Goa News: बांगड्याचे बंपर पीक! पण काय आहे गूढ?

दैनिक गोमन्तक

Goa News: किनारपट्टीवर सुरू असलेल्या नियोजनशून्य, बेसुमार मासेमारीमुळे बांगडे, तारली, टुना यासारखे शाकाहारी मासे मोठ्या प्रमाणात सापडत असून इतर मांसाहारी मासे कमी झाले आहेत. हे असेच होत राहिल्यास याचा विपरित परिणाम सागरी अन्नसाखळीवर होऊ शकतो, असे मत ‘आयसीएआर’ केंद्रीय किनारी शेती संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ त्रिवेश मयेकर यांनी व्यक्त केले आहे. याला ग्लोबल वॉर्मिंगही कारणीभूत असू शकते, असे ते म्हणाले.

मयेकर म्हणाले की, सागरी अन्नसाखळीमध्ये पहिल्या टप्प्यात वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य प्लवंग, शेवाळ असते. यावर गुजराण करणारे शाकाहारी मासे दुसऱ्या टप्प्यात येतात. तर तिसऱ्या टप्प्यात या शाकाहारी माशांवर जगणारे मोठे मांसाहारी मासे येतात.

सध्या पश्चिम किनारपट्टीवर व्यावसायिक स्पर्धेतून मोठ्या प्रमाणात नियोजनशून्य, बेसुमार मासेमारी सुरू आहे. कमी खर्चिक म्हणून अशी मासेमारी केली जाते. शिवाय समुद्री वनस्पती वाढल्यानेही बांगडा, तारली, टुना यासारखे शाकाहारी मासे मुबलक प्रमाणात मिळत आहेत. याचा परिणाम त्यांच्या किमतीवरही झाला असून सध्या 100 रुपयांना 10 ते 15 बांगडे मिळत आहेत. मात्र,  तारली बाजारातून गायब आहे.

अर्थात मांसाहारी मासेही कमी प्रमाणात मिळत आहेत. यात कर्ली, मोडूसा, घोळ, चनक, शेंगाळे, बोंबील यासारख्या माशांचा समावेश आहे. बाजारात या माशांची आवक कमी झाल्याने त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. प्रामुख्याने समुद्रात मिळणारे अन्न आणि वातावरणाचा माशांच्या पैदासीवर  परिणाम होतो, असे मयेकर यांचे म्हणणे आहे. 

बांगडा-तारलीचे व्यस्त प्रमाण

शास्त्रज्ञांच्या मते, बांगडा आणि तारली हे समुद्राच्या वरच्या (सरफेस फिडर) भागात राहणारे मासे आहेत. या दोन माशांचा एकमेकांवर व्यस्त परिणाम जाणवतो. ज्यावेळी बांगडा जास्त मिळतो, त्यावेळी तारली कमी होते आणि ज्यावेळी कर्ली जास्त प्रमाणात मिळते, त्यावेळी बांगड्यांचे प्रमाण कमी झालेले असते. यामागे दोन्हीही माशांच्या अन्नाचे कारण शास्त्रज्ञांनी शोधले असून हे दोन्हीही मासे शाकाहारी आहेत.

समुदी वनस्पतीवर जगतात अनेक मासे

समुद्र अन्नसाखळीतील दुसऱ्या टप्प्यातील मासे प्रामुख्याने झुप्लॅक्तन (41.56टक्के), फायटोप्लॅक्तन (37.64टक्के), या एकपेशीय वनस्पती म्हणजे शेवाळ 7 टक्के प्रमाणात खाऊन जगतात. यात बांगडा, तारली, टुना यांच्यासह शेकडो प्रकारचे छोटे शाकाहारी मासे समुद्रात मिळतात.

राज्यात सप्टेंबरपासून मासेमारी सुरू झाल्यानंतर बांगडा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. दुसरीकडे तारली मासा गायब आहे. मासेमारांच्या मताप्रमाणे यापूर्वी बांगड्याचे कधीही इतके मोठे बंपर पीक आले नव्हते. आम्ही गेल्या दोन महिन्यांची तुलना गेल्या तीन वर्षांबरोबर करत आहोत. त्यातही बांगड्यामध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

- चंद्रकांत वेळीप, अतिरिक्त संचालक, मच्छीमारी खाते.

सध्या बेसुमार मासेमारी सुरू आहे. याचा परिणाम समुद्री जैवविविधतेवर होत आहे. प्रत्येक माशासाठी असलेली ‘लीगल साईज’ मासेमारी होणे गरजेची आहे. यासाठी मच्छीमार विभागानेही दक्ष राहणे गरजेचे आहे. यासाठी नियम आहेत, मात्र, त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

- त्रिवेश मयेकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयसीएआर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT