Goa News: कोलवात 30 बेकायदा दुकानांवर ‘हातोडा’

Goa News: पर्यटन खात्याने एक महिन्याच्या आत या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले होते.
Goa News
Goa NewsDainik Gomantak

Goa News: किनाऱ्यावरील निर्धारित कक्षेत अतिक्रमण केल्यामुळे सीआरझेड प्राधिकरणाच्या आदेशानुसार आज कोलवा येथे 30 दुकानांचे बेकायदा विस्तार पाडण्यात आले. ही कारवाई इतक्या गतीने करण्यात आली की, दुकानदारांना या कारवाईवर स्थगिती आणण्यासाठीही वेळही मिळाला नाही. येथे उभारलेले बेकायदेशीर गाडेही जमीनदोस्त करण्यात आले.

कडक पोलिस बंदोबस्तात पर्यटन खात्याने ही कारवाई केली. या बेकायदा विस्तारांना कोलवा सिव्हिक फोरमच्या ज्युडिथ आल्मेदा यांनी हरकत घेऊन सीआरझेड प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. 31ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने हे विस्तार हटविण्याचे आदेश देत पर्यटन खात्याने एक महिन्याच्या आत या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले होते.

त्यानुसार पर्यटन खात्याने सोमवारी रात्री सर्व व्यावसायिकांना नोटीस बजावून हे विस्तार हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, स्थिती हाताबाहेर जाणार, याची माहिती असल्याने काही दुकानदारांनी स्वतःहून हे विस्तार हटविले.मात्र, व्यावसायिक न्यायालयात जाऊन स्थगिती घेणार याची कल्पना असल्याने आज सकाळीच ही कारवाई सुरू करण्यात आली. पर्यटन खात्याचे उपसंचालक धीरज वागळे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होत असल्याचे स्पष्ट केले.

Goa News
Talegaon: जॉब फेअरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

ही कारवाई करण्यासाठी न्यायालयाने फक्त एक महिन्याची मुदत दिली होती, असेही त्यांनी सांगितले. या कारवाईमुळे पर्यटन व्यावसायिकांमध्ये मात्र चिंता निर्माण झाली आहे.

पर्यटन खात्याचे दुटप्पी धोरण : दिनीज

या बेकायदा विस्तारामध्ये कोलव्यातील केंटकी या हॉटेलचाही समावेश होता. पर्यटन खात्याच्या या कारवाईवर या हॉटेलचे मालक मॅथ्यू दिनीज यांनी तीव्र नापसंती व्यक्त करताना, आपल्याला शेड उभारण्याची परवानगी पर्यटन खात्यानेच दिली होती.

तरीही ही कारवाई करण्यात आली, असे सांगितले. आपल्याकडे जी परवानगी आहे, ती 2034 पर्यंत वैध आहे, तरीही पर्यटन खात्याने आपल्याला पूर्वकल्पना न देता ती रद्द केली. पर्यटन खात्याचा हा निर्णय पूर्णतः बेकायदेशीर आहे, असा आरोप त्यांनी केला.

Goa News
Goa News: डिचोलीत कला भवनसाठी प्रयत्न

कोलवा येथील व्यापाऱ्यांवर आज जी कारवाई झाली, ती दुर्दैवी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खात्याने ही कारवाई केली असली तरी असे विस्तार पंचतारांकित हॉटेलांनीही केले आहेत.

मात्र, त्यांच्या विरोधात कुणी तक्रार का करत नाही? तक्रारदारांना हे छोटे व्यावसायिकच दिसतात का? की जिथे मऊ माती सापडते, तिथे खणणे ही तक्रारदाराची वृत्ती आहे? यासंबंधी तोडगा काढेपर्यंत येथे एक तात्पुरती शेड उभारण्याची परवानगी पर्यटन खात्याने द्यावी. यासाठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याशी मी चर्चा करीन.

- वेंझी व्हिएगस, आमदार, बाणावली.

Goa News
Goa Petrol Price: गोव्यात पेट्रोल आणि डिझेल महागले, येथे पहा दर किती वाढले...

कोलवा येथे जी बेकायदेशीर बांधकामे उभी आहेत, त्यात पर्यटन खात्याच्या बांधकामांचाही समावेश आहे. ही बांधकामे उभारण्यास खात्याने कोणत्या आधारावर परवानगी दिली, याची चौकशी झाली पाहिजे. सध्या दक्षता खाते सतर्कता पंधरवडा साजरा करत आहे. दक्षता खात्याने पर्यटन खात्याच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करावी.

-ज्युडीथ आल्मेदा, याचिकादार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com