पणजी: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन अवघ्या आठवडाभरावर आलेले असताना तसेच प्रश्न सादर करण्याची मुदत सोमवारी संपत असताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी येत्या मंगळवारी विरोधी आमदारांची बैठक बोलावली. यावरून आमदार विजय सरदेसाई यांनी युरींवर टीकास्र सोडले आहे.
शिवाय आम आदमी पक्षाकडूनही उशिरा बैठकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने बैठकीआधीच विरोधकांमधील दुफळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
विधानसभेचे १५ दिवसीय पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरू होत आहे. अधिवेशनात विरोधी सात आमदार संघटित होऊन सरकारला विविध प्रश्नांवरून घेरतील अशी जनतेला आशा होती; परंतु गेल्या काही महिन्यांत विरोधी पक्षांमध्ये विविध कारणांमुळे सुरू असलेल्या धुसफुशीमुळे काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’चे आमदार अधिवेशनावेळी सभागृहात एकसंध राहतील का, असा सवाल उपस्थित होत असतानाच आता युरींनी उशिरा बोलावलेल्या बैठकीवरून आमदार सरदेसाईंनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.
त्यातच ‘आप’कडूनही शंका उपस्थित झाल्याने विरोधी आमदार सभागृहात एकत्र राहण्याची शक्यता कमीच आहे, असा तर्क राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.
विरोधी पक्षांना एका झेंड्याखाली आणण्यासाठी काहीही करण्यास तयार असल्याची हमी देणारे आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेस, ‘आप’ला अंधारात ठेवून सर्वच तालुक्यांत जनता दरबार घेतले. कुडचडेतील त्यांच्या जनता दरबारादिवशीच काँग्रेसने तेथे संविधान बचाव रॅलीचे आयोजन केले. या घटनेमुळे या दोन्ही पक्षांमधील फूट स्पष्टपणे दिसून आली होती.
परंतु, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यानंतर आपल्यात आलबेल असल्याचे स्पष्ट केले. त्यातच बाणावलीत आमदार निवडून येण्यासाठी काँग्रेसला ‘आप’ची गरज नसल्याचे स्थानिक गट काँग्रेसने जाहीर केल्याने काँग्रेस आणि ‘आप’मध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता युरींनी बोलावलेल्या बैठकीवरून सरदेसाई आणि ‘आप’ने नाराजी व्यक्त केल्याने विरोधकांमधील फूट अद्याप कायम असल्याचेच स्पष्टपणे दिसून येत आहे.
‘आप’चे आमदार आज घेणार निर्णय : ‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, विरोधी पक्षनेत्यांनी बैठकीसाठी खूपच उशीर केल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारच्या बैठकीला उपस्थित राहायचे की नाही, याचा निर्णय ‘आप’चे दोन्ही आमदार उद्या (सोमवारी) घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
१ विधानसभा अधिवेशन जाहीर होताच तत्काळ विरोधी पक्षनेते विरोधी आमदारांची बैठक घेतात. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे.
२ प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत आणि मायकल लोबो या तीन माजी विरोधी पक्षनेत्यांसोबत मी काम केले आहे. त्यांनी ही प्रथा कायम ठेवली होती.
३ अधिवेशनाची प्रक्रिया सुरू होताच कोणते प्रश्न, खासगी ठरावांना प्राधान्य द्यायचे, कोणत्या प्रश्नांवर आवाज उठवायचा, अशा अनेक गोष्टींवर विरोधी आमदार एकत्र येऊन चर्चा करतात आणि त्यानुसार रणनिती आखून सभागृहात सरकारवर हल्ला चढवतात.
४ प्रश्न सादर करण्याचा अंतिम दिवस सोमवारचा आहे. खासगी ठरावाची मुदतही संपली आहे. अशा स्थितीत युरी यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीला काहीच अर्थ राहात नाही.
५ मंगळवारच्या बैठकीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही.
‘आप’चे आमदार आज घेणार निर्णय : ‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, विरोधी पक्षनेत्यांनी बैठकीसाठी खूपच उशीर केल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारच्या बैठकीला उपस्थित राहायचे की नाही, याचा निर्णय ‘आप’चे दोन्ही आमदार उद्या (सोमवारी) घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांनी अधिवेशनात आपण वेगळी चूल मांडणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे आमदार बोरकर यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशन जवळ आले आहे. अशा स्थितीत आम्हाला कोणताही विवाद करायचा नाही. विरोधकांची रणनीती सुरुवातीला नव्हे, तर आताच ठरायला हवी. यासाठीच आम्ही मंगळवारी बैठक बोलावली आहे. आमदार विजय सरदेसाई हे माझे चांगले मित्र आहेत. याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करेन.युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.