
गोव्यातील दोन राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची गोव्याबाहेर गुप्त बैठक झाली, अशी वार्ता गोव्याच्या राजकीय पटावर पसरली आहे. या बैठकीत नेमके काय ठरले हे उघड झालेले नसले तरी ही बैठक म्हणजे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतील डावपेचांचा, रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जाते. एका पक्षाच्या नेत्याला विद्यमान आमदाराला तिकीट न देता क्रीडा क्षेत्रातील प्रशासकाला उमेदवारी द्यावी, म्हणजे त्याची वाट मोकळी. दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला राष्ट्रीय व स्थानिक पक्षांमध्ये युती नको आहे. म्हणजे मते विभागून त्याला जिंकण्याची संधी आहे. ही गोष्ट काही विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या कानावरही गेली आहे. म्हणूनच विजयबाबने काँग्रेसकडील युती तुटली नाही व २०२७ पर्यंत ही युती अतूट राहील, असे म्हटलेय की काय, अशी चर्चाही सुरु झालीय. हीच वेळ साधून कॉंग्रेसच्या जनता दरबारात ५ लाख चौरस मीटर जागेचे रुपांतरण झाल्याची तक्रार एक व्यक्ती करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तर त्या व्यक्तीला कधी झाली, हे खोचून खोचून विचारत आहेत व ती व्यक्ती विजयबाबचे नाव घेत आहे. हा योगायोग म्हणावा की, राजकारणाचा भाग किंवा त्या भेटीचा मतितार्थ तर नसेल ना! ∙∙∙
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनास आठवडाच शिल्लक राहिलेला असताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी बोलवलेल्या विरोधी आमदारांच्या बैठकीवरून विरोधकांत धुसफूस सुरू झाली आहे. युरींनी उशिरा बैठक बोलावल्याचा दावा करीत विजय सरदेसाईंनी त्यांना प्रथेची आठवण करून दिली. शिवाय अधिवेशनाची प्रक्रिया संपल्यानंतर बैठक घेतली जात असल्याने बैठकीला अर्थ राहत नसल्याचे सांगतानाच युरींचा ‘बोलवता धनी’ वेगळाच असल्याचेही अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न केला. ∙∙∙
मंत्री माविन गुदिन्हो हे सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याची तयारी करत आहेत, ही चर्चा सुरू झाली आहे. बरं त्यांचा हा सिनेमाही इतरांसारखा ‘साधासुधा’ गोमंतकीय कथेवर वगैरे आधारित नाही, तर तो चक्क अयोध्येत घडलेल्या राम जन्मभूमी प्रकरणाच्या एकंदर प्रवासावर आधारित असेल, अशी बातमी आहे. माविन गुदिन्होंना, अशी एकदम राम जन्मभूमी विषयावर उडी घेण्याची इच्छा का बरे झाली असेल? राम जन्मभूमी प्रकरण हाताळणे (मग ते सिनेमातून का होईना) हेच मुळात पक्षाचे सर्वेसर्वा तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे लक्ष ठळकपणे वेधून घेणे आहे. गोव्याच्या निवडणुकाही जवळ येत आहेत. मुख्यमंत्रिपदावरही अनेकांचा डोळा आहे. त्यामुळे ‘राम जन्मभूमी’ या विषयात गुंतवणूक करण्याने आपला मार्ग प्रशस्त होईल, असे तर माविन गुदिन्हो यांना वाटत नाही ना? ∙∙∙
राज्यात सध्या ‘आयआयटी’च्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागच्या काळात काणकोण, सांगे आणि त्यानंतर सत्तरीत ‘आयआयटी’साठी सरकारने जमीन संपादित करून त्याठिकाणी ‘आयआयटी’ प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला, पण जनक्षोभामुळे सरकारला मागे हटावे लागले. शिवाय सरकारला नामुष्कीला सामोरे जावे लागले ती गोष्ट वेगळीच. आताही फोंड्यात ‘आयआयटी’च्या दीक्षांत समारंभावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आयआयटी’साठी लवकरच भव्य प्रकल्प उभारण्यात येईल, असे सांगितले, पण कुठे ते नमूद केले नाही. पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना या जागेसंबंधी विचारले तर मुख्यमंत्र्यांनी नंतर जाहीर करू, असे सांगून वेळ मारून नेली. आता गोमंतकीयांसाठी उपयोगाचा नाही, अशा ‘आयआयटी’ प्रकल्पासाठी एवढी मोठी जमीन संपादित करून गोव्याचे वाट्टोळे करायचे आहे काय, असा सवाल फोंडावासीय विचारत आहेत. ∙∙∙
हे सुभाषराव सांगेचे नाहीत तर शिरोड्यातील आहेत. ते मीतभाषी आहेत.कमी बोलावे पण प्रत्यक्ष काम करून दाखवावे या प्रवृत्तीचे आहेत. आपल्या खात्यावर त्यांचे बारीक लक्ष असते हे जलस्त्रोत खात्याने विविध भागात केलेल्या कामांवरून दिसून येते. सध्या त्यांनी अरुंद असलेल्या बोरी ते बायथाखोल ते टॅापकोला या मडगाव फोंडा मार्गावरील प्रमुख भागांतील गैरसोय दूर करण्याच्या कामावर लक्ष दिले आहे. त्यासाठी त्यांनी मांगीरवाडा-खाजोर्डे या भागांतील रस्ता प्रथम काही प्रमाणात रुंद केला व आता टॅापकोला पर्यंतचा रस्ता रुंद करण्यास प्राधान्य दिले आहे. रस्त्यालगत असलेले गाडे पर्यायी जागेत हटविण्याचे ठरवून संबंधितांना त्यासाठी राजीही केले आहे. केवळ लोक विरोध करतात म्हणून ते हात बांधून गप्प बसले नाहीत, तर त्यांनी त्यावर उपायही शोधला. त्यामुळे लोकप्रतिनिधी असावा तर असा, असे लोक म्हणताना दिसतात. अशीच मध्यस्थी अन्यत्र झाली तर बरे, असेही काहीजण म्हणतात. ∙∙∙
गोव्यात सध्या एक नवाच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे नेपाळी लोकांचे आधार कार्ड! काही दिवसांपासून ही आधार कार्डस् इथे धडाधड बनताहेत. पण गंमत अशी की, अनेकांच्या आधार कार्डवर घर नंबरच नाही! पत्ता वाचायला घेतला की, ‘अमुक तमुक गावात’ असा काहीतरी पत्ता दिसतो. आता गोमंतकीयांना प्रश्न पडला की, अहो, हे आधार कार्ड देणारे अधिकारी नेमकं काय बघून आधार कार्ड देतात? त्यांना घर नंबरचं महत्त्व कळत नाही का? की ‘घर नंबर’ हा फक्त भारतीयांसाठीच महत्त्वाचा असतो, परदेशी लोकांसाठी तो फक्त एक ‘आकडा’ असतो?; आता याचे उत्तर कोण देणार, याच्या शोधात जनता भटकतेय. ∙∙∙
मागच्या आठवड्यात आमदार विजय सरदेसाई यांनी मडगाव पालिका सभागृहात जनता दरबार भरविला. संपूर्ण सासष्टीतील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी या संवादाचे आयोजन केले होते. यात उपस्थित लोकांनी मडगावातील समस्यांचा पाढा वाचला. या जनता दरबारात पालिकेचे एकही अधिकारी उपस्थित नव्हते. वरून त्यांना तसा आदेशच आला होता म्हणे. या आदेशाचे पालन या सर्व सरकारी बाबूंनी केले. विजयने या कृतीचा नंतर आपल्या ‘स्टाईल’ने समाचारही घेतला. विधानसभा आधिवेशनात जर सरदेसाई यांनी हा विषय उपस्थित केला तर या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची काही धडगत नाही. सध्या या बाबूंची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’, अशी झालेली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.