डिचोली : नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने घर वा बंगला बांधकामाचा परवाना (Online Construction Permit) मिळणार आहे. डिचोली पालिकेने (Bicholim Municipal Council) तसा निर्णय घेतला असून, प्रायोगिक तत्त्वावर या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून एक परवानाही देण्यात आला आहे, अशी माहिती शुक्रवारी सायंकाळी डिचोली पालिकेच्या परिषद सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष पुंडलिक (कुंदन) फळारी आणि पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी दिली. (Bicholim-Goa)
प्रायोगिक तत्त्वावरील हा निर्णय यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने एकापेक्षा अधिक मजली घरे आणि इमारत बांधकामांसाठी ऑनलाईन परवाने देण्यावर विचार करण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. फळारी आणि श्री. शिरगावकर यांनी दिली. यावेळी नगरसेवक विजयकुमार नाटेकर, रियाज बेग, नीलेश टोपले, दीपा शेणवी शिरगावकर आणि दीपा पळ यांची उपस्थिती होती.
दरम्यान, गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीतर्फे ४५.१० लाख रुपये खर्चून सोलर रूफटॉप पॉवर प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्ष फळारी यांनी यावेळी दिली.
असा मिळवता येईल परवाना
ऑनलाईन परवाने देण्यासाठी पालिकेचे अभियंते राजेश फडते यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक टीम नियुक्त करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना बांधकाम परवाने मिळवायचे असतील त्यांनी पालिकेत येऊन संबंधित विभागाशी संपर्क साधून आवश्यक दस्तऐवजांसह अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर संबंधित माहिती अपलोड करण्यात येणार आहे. नंतर दिलेल्या लिंकवर पुढील सर्व प्रक्रिया अर्जदाराला घरबसल्या करता येणार आहे. कागदोपत्री सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला बांधकाम परवाना देण्यात येणार आहे.
ठरली राज्यातील पहिली पालिका
ऑनलाईन बांधकाम परवाने देण्याचा निर्णय घेणारी आणि त्याची अंमलबजावणी करणारी डिचोली ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी दिली. या निर्णयामुळे पालिका क्षेत्रातील नागरिकांना बांधकाम परवान्यासाठी पालिकेत हेलपाटे घालावे लागणार नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल. ऑनलाईन परवाने देताना अतिरिक्त शुल्कही आकारण्यात येणार नाही, असेही श्री. फळारी यांनी स्पष्ट केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.