पणजी : कोलवाळ कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयआरबी पोलिस, कमांडोजच्या मदतीने दबंगगिरी करत कैद्यांना चांगला हिसका दाखवला. स्वतःला टोळी प्रमुख समजणाऱ्या कैद्यांना या अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वार खुले करून पळण्याचे आव्हानच दिले. या अधिकाऱ्यांचा रौद्ररुप पाहून एकाही कैद्याने हे आव्हान स्वीकारण्याचे धाडस दाखवले नाही.
कारागृहातील कैद्यांची हाणामारी, ड्रग्ज, मोबाईल्स सापडणे यासारखे प्रकार सुरू असल्याने कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर उपाय म्हणून अचानक संध्याकाळच्या वेळेला छापा टाकला. मोठ्या प्रमाणात आयआरबी व कमांडो पोलिसांना मदतीला होते. ज्या कैद्यांमुळे कारागृहात गुन्हेगारी कारवाया व हाणामाऱ्या होतात त्यातील टारझन पार्सेकर, कारबोटकर तसेच काही नायजेरियन कैद्यांना बाजूला काढण्यात आले.
या कैद्यांना चांगला धडा शिकवण्यासाठीच ही छापेमारी होती. ज्यांच्या अंथरूणात मोबाईल्स सापडले होते, त्यांना एकत्र करण्यात आले. कैद्यांच्या खोल्याच्या संरक्षणसाठी असलेल्या तुरुंगरक्षांची या कारागृह प्रमुखांनी उजळणी घेतली. या अधिकाऱ्यांचे कधी न पाहिलेले रौद्ररुप पाहून अनेकांची झोप उडाली. शनिवारी संध्याकाळी ७.३० वा. सुरू झालेला हा थरार रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
...तर कर्मचाऱ्यांवरही कारवाई
मोबाईल्स, ड्रग्ज आतमध्ये पोहोचण्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याला थेट घरचा रस्ता दाखवला जाईल. तुरुंगात पुन्हा हाणामाऱ्या, गुन्हेगारांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यास तसेच ज्या कैद्यांच्या खोल्यांमध्ये मोबाईल सापडतील, त्यावेळी ड्युटीवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत कोलवाळ कारागृह प्रमखांनी दिले आहेत.
अधिकाऱ्यांनी घेतली दक्षता
कोलवाळ कारागृहात अनेक कैद्यांना पोलिसांच्या हिसक्यामुळे उपचारासाठी कारागृहाबाहेर न नेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी दाखविलेला हिसका उजेडात येण्याची तसेच हे कैदी न्यायालयात झालेल्या घटनेबाबतची माहिती आपल्या वकिलामार्फत सादर करण्याची भीती वरिष्ठ कारागृह प्रमुखांना होती. त्यामुळे कैदी काही कारणास्तव न्यायालयात येऊ शकत नाही, अशी माहिती न्यायालयाला पाठवण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.