Congress  Dainik Gomantak
गोवा

Congress: काँग्रेसला नवे चेहरे मिळणार तरी कसे? 'खरी कुजबूज'

Congress: काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोवा प्रदेश काँग्रेस नेत्यांना नवे चेहरे घेऊन पक्षसंघटना बळकट करण्याचा कानमंत्र दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Congress: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोवा प्रदेश काँग्रेस नेत्यांना नवे चेहरे घेऊन पक्षसंघटना बळकट करण्याचा कानमंत्र ते त्यांच्या अभिनंदनासाठी गेले असता दिला आहे. खरे तर येथवर सारे ठिक आहे.

कारण सध्या प्रदेश समितीवर जी काय मोजकीच मंडळी आहे, त्यांची समस्या वेगळीच आहे व ती म्हणजे हे नवे चेहरे आणावयाचे कोठून? असे चेहरे नसल्यानेच तर पक्षाला हल्लीच पार पडलेल्या व नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागलेल्या जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीतील उमेदवार अन्य पक्षांतून आणावे लागले होते.

पण हे श्रेष्ठींना सांगणार कसे? आठ आमदारांनी ‘हात’ दाखवल्यापासून पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. सध्या गोव्यातील काँग्रेसची अवस्था जुनेही नाहीत व नवेही नाहीत अशी आहे.

ऐन दिवाळीत ‘गोविंदा गोविंदा’

राज्यातील कलावंतांची शिखर संस्था असलेल्‍या कला अकादमीचे सध्‍या नूतनीकरणाचे काम सुरू असले तरी विरोधकांनी याविरोधात उठविलेला आवाज आणि दक्षता खात्याकडे घेतलेली धाव यामुळे कला अकादमी चर्चेत राहिली आहे.

अखेर मुख्यमंत्र्यांनी कला अकादमीच्‍या कामात कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही असे सांगून या कामाला एक प्रकारे क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे भलतेच खूष झालेले आहेत.

शिवाय दक्षता खात्याने कला अकादमी कामाच्‍या तीन सदस्य तांत्रिक समितीमार्फत चौकशी करावी अशी केलेली शिफारसही आता मागे पडणार आहे. त्यामुळेच गावडे यांची दिवाळी आता चांगली जाणार आहे, अशी चर्चा खुद्द कला-संस्‍कृती खात्‍यात सुरू आहे.

मुख्‍यमंत्री दोतोरांचा पाठिंबा कोणाला?

‘जो जिता वही सिकंदर’ या फिल्मी संवादाप्रमाणे ‘जो जिंकतो तो आमचा’ असा संवाद राजकारण्यांमध्‍ये चालतो. सध्‍या गोव्यात क्रीडा संघटनांच्या निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. गोवा क्रिकेट संघटनेसाठी फडके व देसाई गटात निवडणूक होणार आहे.

फडके यांच्या गटातील व मुख्यमंत्री दोतोर यांचे निकटवर्ती रोहन गावस देसाई यापूर्वीच सचिव म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा फडके गटाला की देसाई गटाला, असा प्रश्न आम जनतेला पडणे स्वाभाविक आहे. कारण दोन्ही गटांनी दोतोर यांच्‍यासमवेत फोटो काढून ‘मुख्यमंत्री हमारे साथ’ असा संदेश देण्‍याचा खटाटोप चालविला आहे. आता मुख्यमंत्री म्हणत असतील, ‘जिथे क्लब तिथे मी’!

विदेशी नगरसेवकावर आता भाजपचे भाग्य!

‘वक्त से पहले और किस्मत से ज्यादा किसीको कुछ नही मिलता’ असे म्हणतात तेच खरे. कुंकळळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची हिसकावण्यासाठी भाजपचे नगरसेवक गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करीत होते.

आता भाजप नगरसेवकांनी सात नगरसेवकांच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणलेला आहे. मात्र लक्ष्मणला खुर्चीवरून खाली खेचायचे झाल्यास पालिकेचा एक नगरसेवक, जो सध्‍या विदेशात आहे त्याला रोखावे लागणार आहे. तो विदेशी एनआरआय नगरसेवक देशात आला तर विदेशचे स्वप्न भंगणार हे मात्र निश्चित.

मंत्री ढवळीकरांनी दिला ‘शॉक’

वीजमंत्री सुदिन ढवळीकर फक्त 1200 रुपयांचा मोबाईल वापरतात. काणकोणातील जाहीर बैठकीत त्‍यांनी तसे सांगून आपला तो साधा मोबाईलही दाखविला व उपस्‍थित सर्वांना एक प्रकारे शॉकच दिला.

त्यांना माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी 1200 रुपयांच्‍या मोबाईलला कुठेही रेंज मिळते असे सांगून एकप्रकारे प्रोत्‍साहनच दिले. वीजमंत्र्यांना स्‍मार्ट फोन परवडत नाहीत काय, अशी कुजबुज बैठकीत सुरू झाली. मात्र 1200 रुपयांच्या मोबाईलचे रहस्‍य ढवळीकरांनाच ठाऊक.

म्‍हापसा पालिका कर्मचारी बॅकफूटवर!

म्हापसा पालिका कर्मचारी वर्गाने मोठा गाजावाजा करीत संपाचे हत्यार उपसले खरे, मात्र केवळ 12 तासांतच त्यांनी संप तात्पुरता स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. एकीकडे 31 ऑक्टोबरला तुमच्या प्रश्नासंदर्भात बैठक बोलावली आहे, तोवर कळ सोसा असे पालिका मंडळाने सांगितले होते.

तरीही, कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचे ठरविले आणि शुक्रवारी काम बंद संप पुकारला. परंतु या संपावेळी काही अशा गोष्टी घडल्या की त्‍यामुळे संपकऱ्यांना स्वतःहून बॅकफूटवर जावे लागले. त्‍यांनी पालिका कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने आपल्या संपात सहभागी होण्यास भाग पाडले. तसेच कुचेली येथे करचावाहू ट्रकच्या टायरची हवा सोडली.

सायंकाळी पालिका मंडळ व संपकरी मंडळींच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात हा विषय प्रामुख्याने गाजला. त्यामुळेच की काय, कर्मचाऱ्यांवर थोडे नमते घेण्याची वेळ ओढवली आहे. तशी कुजबुज पालिकेत सुरू होती. आता 31 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीनंतर कर्मचारीवर्गाच्या चार्टर ऑफ डिमांडचे भवितव्य ठरणार आहे.

मनपातील सावळागोंधळ!

महापालिकेच्या नगरसेवकांचे अनेक व्हॉट्स-ॲप ग्रुप आहेत. काही मोजक्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचा, तर काही नगरसेवक व महापौर-उपमहापौर यांचा समावेश असलेला ग्रुप. त्यावर टाकलेले संदेश कोण किती पाहतो कोणास ठाऊक.

शिवाय कोणाची निमंत्रण पत्रिका अपलोड केली म्हणजे निमंत्रण मानावे का, असा सवाल आता काही नगरसेवकांना पडला आहे. आता हेच पाहा ना, तांबडी-माती येथे एक्स-रे युनिटचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते ठेवला होता. त्या कार्यक्रमास ताळगावच्या आमदार व महापौर प्रमुख पाहुणे असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद केले होते.

प्रदेशाध्यक्ष वेळेत पोहोचले. काही वेळाने त्यांनी आमदार आणि नगरसेवक का आले नाहीत, याची विचारणा केली. बरं आता त्यावर उत्तर काय द्यायचे, हे उपस्थितांना समजले नाही. त्यामुळे यातून प्रदेशाध्यक्षांना मनपात सत्तेवर असलेल्या मंडळात अजूनही एकवाक्यता नसल्याचेच नक्कीच जाणवले.

मटकावाल्‍यांचे ‘दिवाळे’

कायद्याने बंदी असलेला पण राजरोसपणे बिनधास्त सुरू असलेला ‘प्रामाणिक’ असा मटका जुगार दिवाळीच्या निमित्ताने आठ दिवस बंद होत आहे. या मटक्याची इतकी जादू आहे की, एकदा गळाला लागलेला माणूस सहसा बाजूला राहूच शकत नाही. मटका जरी बेकायदेशीर असला तरी लोकांच्या मते प्रामाणिक आहे.

इवल्याश्या चिट्ठीवर नाव-गाव नसताना लाखोंची उलाढाल होत असते. आता पुढील आठ दिवस मटक्याची दिवाळी असल्याने मटकाप्रेमींचे दिवाळे झालेच म्हणून समजावे. बाजारातसुद्धा गर्दी कमी झालेली असते, इतका परिणाम जनमानसात मटक्याने निर्माण केला आहे. चला आता आठ दिवस मटक्याची दिवाळी आणि मटका लावणाऱ्यांचे दिवाळे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: "कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक"

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

ड्रोनने ठेवली जाणार Iffi, Exposition वर नजर; 1,500 पोलिस, IRB फोर्स तैनात! पर्यटन सुस्साट, हॉटेल्स फुल्ल!

Keerthy Suresh Wedding: कीर्ती सुरेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय; 'या' दिवशी प्रियकरासोबत गोव्यात बांधणार लग्नगाठ

IFFI 2024: In Conversation मध्ये दिग्गजांची मांदियाळी! रेहमान, मणीरत्नम, रणबीरसोबत खुला संवाद

SCROLL FOR NEXT