Goa Accident Cases: काणकोणमधील मडगाव-कारवार व चाररस्ता-माशे पर्यंतच्या मनोहर पर्रीकर चौपदरी रस्त्यावरील अपघातप्रवण क्षेत्रात अपघातांची मालिका सुरुच आहे. मडगाव-कारवार हमरस्त्यावर करमल घाटात तर प्रत्येक दिवशी अपघात होतात.
दरम्यान, त्यामुळे आतापर्यंत कित्येकांनी प्राण गमावले आहेत. तसेच रक्तबंबाळ अवस्थेत इस्पितळात नेण्यात आलेले काहींचा जीव वाचला असला तरी ते कायमचे जायबंदी होऊन घरी बसलेले आहेत. अपघातांना आळा घालण्यासाठी करमल घाटातील रस्त्याची रचना बदलणे गरजेचे आहे.
डांबरीकरण केल्यानंतर रस्त्याची डागडुजी करण्याची गरज असते. ती केली नसल्याने अवजड वाहने रस्त्याच्या कडेला गेल्यानंतर रस्ता कोसळून आडवी होतात, असे ‘गोंयकार’ संघटनेचे अध्यक्ष जॅक फर्नांडिस व संदेश तेलेकर यांचे म्हणणे आहे.
सर्वाधिक अपघात सध्या गुळे ते बेंदुर्डे या हमरस्त्यावर होत आहेत. या भागात दहापेक्षा जास्त धोकादायक वळणे आहेत. सध्या करमल घाटातून बोगदा काढावा की जमिनीवरून रस्ता काढावा हा वाद सुरू आहे. या भागात रस्त्यासाठी जमीन संपादन करण्याकरिता केंद्र सरकारने 79 कोटी रुपये संमत केलेले आहेत.
जमीन संपादन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यापूर्वी किमान तीव्र वळणे कापून रस्त्याचे रूंदीकरण करण्याला सभापती रमेश तवडकर यांनी प्राधान्य दिले आहे.
दोन तास वाहतुकीची कोंडी
करमल घाटात काल शनिवारी संध्याकाळी तीन वाजल्यापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सुमारे दोन तास दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली. काणकोणच्या बाजूने व बाळ्ळीच्या बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
याबाबत कुंकळ्ळी पोलिस स्थानकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तीन वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली होती, मात्र नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
गेल्या महिन्यात तिघांचा बळी
मनोहर पर्रीकर चौपदरी रस्त्याची रचना दोषपूर्ण असल्याच्या तक्रारी सुरूवातीपासूनच सुरू होत्या. त्यानंतर तळपण, गालजीबाग व बाबरे खाडीवरील पुलांवरील रस्त्यांची काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली. या रस्त्यावर आंबेनास-राजबाग येथे गेल्या महिन्यात मोठा अपघात होऊन तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या परिसरात अनेक धोकादायक वळणे असून मालवाहू ट्रक उलटून अपघात झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.