पणजी: दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरिआतो फर्नांडिस यांनी शनिवारी (17 मे) पत्रकार परिषद घेऊन म्हादई नदीचे पाणी वळवण्याच्या प्रकल्पावरुन समाचार घेतला. त्यांनी राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेच्या (NIO) ताज्या अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली. हा एकतर्फी अहवाल असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, काँग्रेस (Congress) मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला खासदार फर्नांडिस यांच्यासोबत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा आणि विरेंद्र शिरोडकर उपस्थित होते.
खासदार फर्नांडिस यांनी राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेच्या अहवालावर टीका केली. म्हादईचे पाणी वळवणे शक्य नसल्याचे फर्नांडिस म्हणाले. यावेळी बोलताना फर्नांडिस यांनी IISC, ATRI (Ashoka Trust for Research in Ecology and the Environment), नॉर्वेजियन जलसंशोधन संस्था आणि IIT मुंबई यांसारख्या नामांकित संस्थांमधील तज्ज्ञांनी केलेल्या चार अभ्यासांचा संदर्भ दिला, ज्यामध्ये म्हादई नदीचे वळवणे गोव्यात खाऱ्या वाळवंटीकरणाचे कारण ठरु शकते असे सांगण्यात आले.
फर्नांडिस म्हणाले की, NIO च्या अहवालातील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे तो केवळ जलशास्त्रज्ञांनी तयार केला. त्यात पावसाळ्यानंतरच्या काळातील म्हादईच्या प्रवाहांचा विचारच केला गेला नाही. भांडुरा आणि काळसा येथून वर्षभर वाहणारे पाणी सदाहरित जंगल टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढते जागतिक तापमान आणि पर्यावरणीय ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे संपूर्ण परिसंस्थेस आणि आपल्या जीवनशैलीलाच गंभीर धोका निर्माण करणारे आहे.
फर्नांडिस पुढे म्हणाले की, 'नद्यांना स्वतःचा एक प्रवाह आणि लय असते. त्या नकाशावरील रेषा समजून त्यांना कृत्रिमरीत्या वळवता येत नाही. शिवाय, समुद्रकिनाऱ्यालगत वाहणारी म्हादई नदी गोव्याच्या सुमारे 43 टक्के गोमंतकीयांचा प्राण आहे. म्हादई नदीचा प्रवाह कमी झाल्यास जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो.' तसेच, वाघ, बिबटे आणि काळे पँथर वारंवार गावांमध्ये दिसून येत असणे हे सरकारला व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्यासाठी एक जागृतीसदृश इशारा असल्याचे देखील फर्नांडिस म्हणाले.
फर्नांडिस पुढे असेही म्हणाले की, सुचवलेले धरण प्रकल्प देखील एक गंभीर धोका ठरतात, कारण हे प्रकल्प म्हादई (गोवा) आणि भिमगड (कर्नाटक) येथील अत्यावश्यक वन्यजीव अभयारण्यांतील पाण्याचा स्त्रोत तोडण्याचे काम करतील. इको सेंसिटिव्ह झोन (श्रेणी 1) मध्ये उभारलेले हे धरण प्रकल्प गोव्याच्या अन्न आणि जलसुरक्षेला पोसणाऱ्या वनस्पती, प्राणी आणि अभयारण्य यांना धोका निर्माण करतील. हीच जंगले कार्बनचे शोषण करतात व जागतिक तापमानवाढ रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
पश्चिम घाट हे युनेस्कोने जगातील 10 प्रमुख जैववैज्ञानिक हॉटस्पॉट्सपैकी एक मानले आहे. मात्र आता याचाच विध्वंस सुरु आहे. पर्यावरणीय असमतोल पाहायला मिळत आहे. पावसाचे स्वरुप बदलणे, भूगर्भजल कमी होणे, तापमानवाढ हे परिणाम केवळ गोव्यापुरते मर्यादित राहणार नाहीत तर उत्तर कर्नाटकातही दिसून येतील.
पारंपरिक पिकांना बाजूला ठेवून वर्षातून तीनदा ऊसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि कोल्ड ड्रिंक कंपन्यांसह इतर उद्योगांनी कर्नाटकात जलसंकट निर्माण केले आहे. यासाठी शेजारच्या राज्याची निसर्गसंपत्ती आणि नदीचा प्रवाह वळवून पर्यावरणीय विनाश घडवून आणणे कितपत योग्य आहे? ही अत्यंत अपारंपरिक, दूरदृष्टीशून्य आणि अस्थायी भूमिका केवळ आपल्या पाण्याच्या स्रोतांनाच नाहीतर आपल्या संपूर्ण परिसंस्थेलाच धोक्यात आणेल. कर्नाटकालाच योग्य आणि शाश्वत मार्गाने आपल्या पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक समर्पक ठरेल, असेही फर्नांडिस यांनी पुढे बोलताना नमूद केले.
गोवा आज अशा वळणावर उभा आहे, जिथे घेतलेले निर्णय भावी पिढ्यांवर दीर्घकालीन परिणाम घडवतील. सर्व सुजाण गोमंतकीयांनी आता एकत्र येऊन म्हादई नदीच्या रक्षणासाठी गंभीरपणे भूमिका घ्यायला हवी. कारण सध्याच्या गोवा सरकारकडून ती अपेक्षा ठेवणे व्यर्थ ठरत आहे, हे आता स्पष्ट होत चालले आहे. कॅप्टन फर्नांडिस यांनी यापुढे जात सर्वपक्षीय एकतेचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी सर्व 40 आमदार आणि 2 खासदारांना घेऊन पंतप्रधानांची भेट घ्यावी आणि म्हादई वाचवण्याची मागणी करावी असे शेवटी फर्नांडिस म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.