Mopa International Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मोपाच्या उद्घाटनास येणार असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यासह भाजप संघटनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी बराच रस घेतला आहे. गुरुवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री भाजप नेत्यांना घेऊन मोपावर गेले होते. तेथे किमान 5 हजार पक्ष कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या बस पार्किंगची व्यवस्था बघण्यासाठी गुरुवारची भेट होती.
तयारी जोरात सुरू आहे, परंतु ज्या पद्धतीने काम पूर्ण व्हायला हवे, तेवढे मात्र झालेले नाही. आज जी तफावत दिसते, ती उद्या राहत नाही. तेवढ्या वेगाने तीन कंत्राटदारांनी काम चालवले आहे. रात्रंदिवस त्यांचे काम चालते. तेथे उभारलेली बाग पाहण्यासारखी आहे. या हिरवळीवरच पाच कोटी खर्च झालेले आहेत.
जेवढी झाडे या पठारावर नव्हती, त्याच्यापेक्षा कित्येक झाडे नव्याने लावण्यात आली आणि बाग तयार होईल, तेव्हा तो देखावा सुंदर आणि हरित असेल. तेथे बघण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे जलसंवर्धन.
विमानतळ परिसरात पडणारा पावसाचा दरएक थेंब वाचविला जाणार आहे. हेच पाणी रिसायकल करून बाग व इतर कामासाठी वापरले जाणार आहे. वास्तविक मोपा विमानतळाची खासियत ती हीच असेल. आपल्या इतर प्रकल्पांना अशी सुबुद्धी का दिली जात नाही?
दिगंबर कामत कुणीकडे?
मोपा विमानतळाच्या उद्घाटनाला दिगंबर कामत यांच्यासह आठ नवागतांना कोणतेही काम दिलेले नाही. वास्तविक मोपाच्या स्वागतामध्ये त्यांना कुठलेच स्थान नाही. हे नवागत भाजपात येऊन कित्येक महिने झाले, परंतु अद्याप केंद्रीय नेत्यांनी त्यांना वेळसुद्धा दिलेला नाही. त्यामुळे आठजणांपैकी अनेकजण दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्याविषयी कुजबुजू लागले आहेत.
आम्ही भाजपात यावे म्हणून कामत यांनी आमच्याकडे अनेक बंडले मारली. तिघांना मंत्रिपद मिळणार असे ते ठासून सांगत असत, परंतु पक्षश्रेष्ठींकडे त्यांची काहीच लिंक नाही असे आता नवागत आपसात बोलू लागले आहेत.
कामत पणजीमध्ये यायचेही बंद झाले आहेत. कोणा मंत्र्यांच्या दालनात येण्याचीही त्यांना लाज वाटत असावी. ते मुख्यमंत्री असताना माविन यांना मंत्रिपद नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडे जाणेही शक्य नाही. लोकसभा, राज्यसभा त्यांच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, त्यांनाही माहीत नाही.
महामंडळांचे वाटप लटकले
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नवागतांना जी काही महामंडळे द्यायची आहेत, त्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवून एक महिना होत आला, परंतु अद्याप त्याबाबतची मान्यता मिळालेली नाही. दिगंबर कामत, मायकल लोबो व आलेक्स सिक्वेरा वगळता इतरांना महामंडळे देण्याची योजना आहे.
ती मुख्यमंत्र्यांनी इफ्फीच्या आधी दिल्लीला पाठविली होती. काँग्रेसप्रमाणेच प्रत्येक गोष्ट पक्षश्रेष्ठींकडे मोहर उमटवून घेण्याची पद्धत भाजपातही सुरू झाली आहे. पर्रीकरांनी मात्र असले काही प्रकार खपवून घेतले नाहीत. ते स्वतःच्या मर्जीने वागायचे आणि त्यांनी गोव्यात स्वतःची भाजपा स्थापन केली होती. सध्या मोदी - शहा यांना सारेच टरकून आहेत.
त्यामुळे साधे महामंडळ वाटायचे झाल्यास दिल्लीचा आशीर्वाद लागतो. महामंडळे मिळत नसल्याने साऱ्या नवागतांची स्थिती ना घर का ना घाट का झाली आहे. आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद मिळणार होते, त्यांना संघाकडून विरोध झाल्यावर मी मंत्रिपद मागितलेच नाही अशी साळसूद भूमिका घेण्याची पाळी आलेक्सवर आलीय.
त्यात नवे दिव्य म्हणजे कोणतेही पद नसताना मोदींच्या मोपा सभेसाठी बसेस भरून कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी नवागतांवरही आहे. हा पुरावा म्हणून पक्षश्रेष्ठींना दाखवला जाणार आहे. नंतरच मंत्रिपद, महामंडळे मिळतील!
भाजप नेते नाखूष
भारतीय जनता पक्षाचे नेते विधानसभा निवडणुकीवरून फारसे खूष नाहीत. गुजरातमध्ये वृत्तवाहिन्यांनी 140 पर्यंत जागा मिळतील असे अनुमान काढले होते. तेथे त्यांना 156 मिळाल्या, परंतु तो नरेंद्र मोदी - अमित शहा यांचा होम ग्राऊंड आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सरकारी नोकर व मागासवर्गीयांनी भाजपचा सफाया केला आहे.
भाजपने आणलेली निवृत्ती योजना त्यांच्या अंगलट आली. काँग्रेसने या संधीचा पुरेपूर फायदा उठवत राजस्थान धर्तीची निवृत्ती योजना पुन्हा लागू करणार असल्याचे जाहीर केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या हस्तेच या निवृत्ती योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. भाजपला ही बाब लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता.
हिमाचलमध्ये दर निवडणुकीत सरकारे बदलत असल्याचा अनुभव गेली 35 वर्षे येतो आहे, परंतु काँग्रेस नेते वीरभद्र सिंग यांच्या निधनानंतर भाजपला कोणी राखू शकणार नाही असा त्या पक्षाच्या नेत्यांचा होरा चुकला. गुरुवारी निवडणूक निकालानंतर दूरचित्रवाणीवर नरेंद्र मोदींचा त्रासलेला चेहरा लोकांनी पाहिला.
म्हणे जागतिक परिषद...
विज्ञान भारती या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विभागाने भरविलेला जागतिक आयुर्वेद काँग्रेस उपक्रम स्थानिक भाजप नेत्यांनाही फारसा मानवलेला नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपला निकट जाऊ इच्छितात.
त्यामुळे त्यांनी या आयुर्वेद काँग्रेसला सरकारचा भरभरून पाठिंबा दिल्याचे कांपालवर जो भव्यदिव्य शामियाना उभारला आहे, त्यावरूनच लक्षात येऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी इफ्फीच्या प्रांगणात संस्कार भारतीलाही जागा दिली होती.
तेथे संघाचे प्रचारक दादा गोखले यांचा मुख्यमंत्र्यांबरोबर फोटोही प्रसिद्ध झाला आहे, परंतु आयुर्वेद काँग्रेससाठी 60 देशांचे प्रतिनिधी येणार अशी जी दर्पोक्ती व्यक्त झाली आहे, त्याला काही अर्थ नसल्याचे भाजपचे नेतेच सांगतात. परंतु सरकारच पुरस्कर्ते असल्यावर उपस्थित कोण राहिले, कोण नाही याचेही कोणाला कर्तव्य राहत नाही.
अकार्यक्षमतेचा ठपका
पावसाळा संपल्यानंतर राज्यातील एकाही रस्त्यावर खड्डा दिसणार नाही, अशी घोषणा सरकारने राणा भीमदेेवी थाटात केली होती. मात्र, अजूनही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जनता बेजार झाली आहे आणि सरकारही टीकेचे धनी बनले आहे.
विरोधक सरकारवर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. सरकारचा निष्क्रियपणा उघडकीस येत असतानाच दुचाकी निर्मिती करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय आस्थापनाने सामाजिक उपक्रम राबविण्याच्या हेतूने राज्यातील ठिकठिकाणचे तब्बल 300 हून अधिक खड्डे डांबर, खडी घालून बुजवले आहेत. या उपक्रमात कंपनीचा कर्मचारी वर्ग हिरीरीने सहभागी झाला होता.
एक खासगी आस्थापन जर इतक्या मोठ्या संख्येने खड्डे बुजवत असेल, तर राज्यातील रस्ते किती खड्डेमय आहेत, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. हा उपक्रम राबवण्यामागे सरकारचे वाभाडे काढण्याचा या आस्थापनाचा जरी उद्देश नसला, तरी नकळत का होईना, सरकारवर अकार्यक्षमतेचा ठपका बसतोच, अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
धिरयोविना वाढदिवस
सासष्टीत कुठलाही राजकारणी असो, त्यांच्या वाढदिनी धिरयोंचे आयोजन होतेच. त्यात तो राजकारणी आलेमाव कुटुंबातील जर असेल, तर काही सांगायची गरजच नाही. मागच्या वर्षी चर्चिल पुत्र सावियो यांच्या वाढदिनी सहा ठिकाणी धिरयो लावायचे ठरल्याने शेवटी एका एनजीओला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले होते आणि असे असतानाही स्थानिक पोलिसांच्या कृपेने दोन तीन ठिकाणी धिरयो झाल्याच.
मात्र, यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकही धिरयो झाली नाही. त्यांना उपरती झाल्याने त्यांनी त्या आयोजित केल्या नाहीत असे नव्हे हां! त्यांनी धिरयोंचे आयोजन केले होतेच, पण बाणावलीचे नवीन आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी पोलिसांना सांगून त्या बंद पाडल्या. बाणावलीत चर्चिल यांची सद्दी सरली याचे हे उदाहरण नव्हे ना?
कथा 14 लाखांच्या शौचालयाची
सध्या मडगावचे आमदार दिगंबर कामत हे विकास करण्याच्या मोडमध्ये असल्याने की माहीत नाही, पण कालकोंडा परिसरात ज्या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे तेथे थोडे थोडके नव्हे, तर तब्बल 14 लाख रुपये खर्चून सुसज्ज असे शौचालय उभारण्यात आले. त्यामुळे स्थानिक नगरसेविकेलाही श्रेय मिळाले हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
मात्र, यातील ग्यानबाची मेख म्हणजे या शौचालयाला पुरेसा पाणीपुरवठाच होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेले शौचालय असे जे बाहेरून वाटते त्याचा उपयोग कुणी केला तर त्याचे हाल काय होतात ते तो एकटाच जाणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.