Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: गोव्यात तिसरा विमानतळ? 'खरी कुजबूज'

Mopa Airport: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे.

दैनिक गोमन्तक

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. परंतु मोपा सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद होईल का अशी भीती दक्षिण गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांना वाटत आहे.

दाबोळी बंद होणार नाही हे पटवून देण्यासाठी दक्षिण गोव्यातील भाजपचे मंत्री आणि आमदारांचे जोरादार प्रयत्न सुरू असून पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यात आघाडीवर आहेत. काही काळापूर्वी गोव्यात तिसरा विमानतळ येऊ शकतो असे विधान त्यांनी केले होते. तेव्हा सोशल मीडियावर त्यांची खिल्ली नागरिकांनी उडवली होती.

आता विमानसेवेशी नगडित संस्थेची गोव्‍यात बैठक झाली आहे, त्यात संस्थेने आपल्या विशेष अहवालात तिसऱ्या विमानतळाची आवश्‍यक निर्माण होऊ शकते असे म्हटल्याचा दावा गुदिन्हो करत आहेत. मात्र, तिसरा विमानतळ सोडाच दाबोळी सुरू रहावा अशी इच्छा दक्षिण गोव्यातील नागरिकांची आहे.

भाजप सरकार दक्षिण गोवा विरोधी?

‘वड्याचे तेल वांग्याला’ अशी एक म्हण आहे. मोपा विमानतळाच्या उद्‍घाटन कार्यक्रम पत्रिकेवर दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिन व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे नाव टाकले नाही म्हणून काँग्रेसने संताप व्यक्त करणे आपण समजू शकतो. मात्र, युरी व सार्दिन यांचे नाव न घालण्याने सरकार दक्षिण गोवा विरोधी म्हणणे अतीच झाले.

काँग्रेसचे विरियाटो फर्नांडिस यांनी उत्तर गोवा व दक्षिण गोवा हे एकमेकांचे शत्रू असल्यासारखेच केले. कॅप्टन साहेब निमंत्रण पत्रिकेत दक्षिणेचे विनय तेंडुलकर यांचे नाव आहे की. विरोध करा, मात्र राजकारणासाठी गोव्याचे आणखी तुकडे करू नका असा सल्ला आता नेटिझन काँग्रेसला द्यायला लागले आहेत.

ही संधी साधणार का?

किनारी भागातील ध्वनिप्रदूषणाविरुद्ध उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानंतर किनारी पट्ट्यातील अनेक पंचायतींनी प्रथमच सक्रिय होत आजवर पंचायतींना न जुमानणाऱ्या अनेक आस्थापनांवर कारवाई केली आहे.

यापूर्वी नव्वदच्या दशकात उच्च न्यायालयाने असाच निवाडा पालिका क्षेत्रात पदपथ व पायवाटा व मोकळ्या जागावरील अतिक्रमणाबाबत दिल्यावर असे भाग मोकळे झाले होते. त्यासाठी किनारपट्टीतील बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याची ही संधी संबंधितांनी सोडू नये अशीच सर्वसामान्यांची मागणी आहे.

खटल्याचा खर्च कोण देणार?

काँग्रेस सोडून भाजप पक्षात सामील झालेल्या आठ आमदारांच्या विरोधात माजी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अपात्रता याचिका सभापतींसमोर दाखल केलेली असताना दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने आणखी एक याचिका दाखल केली आहे.

वास्तविक यापूर्वी काँग्रेस पक्षातून 11 आमदार फुटून भाजप पक्षात गेले होते, त्यावेळी काँग्रेस पक्षाने अपात्रता याचिका दाखल न करता चोडणकर यांनी स्वतः ती दाखल केली होती. मात्र, यासंबंधी खटला लढविण्यासाठी जो खर्च आला होता, तो काँग्रेस पक्षाने दिला होता.

मात्र, आता काँग्रेस पक्षाने स्वतःच याचिका दाखल केली आहे. त्यामुळे गिरीशरावांना आता दाखल केलेल्या याचिकेवरील न्यायालयीन कामकाजासाठी लागणारा खर्च स्वतःच्या खिशातून तर काढावा लागणार नाही ना?

पदपथावर पार्किंग!

पणजीतील प्रमुख समस्यांपैकी पार्किंगची समस्या खरोखरच गंभीर आहे. गेल्या काही वर्षांत शुल्क देऊन पार्किंग प्रणाली सुरू केली आहे, परंतु अजूनही बेशिस्तपणे पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहे.

आता पार्किंग आणि वाहतूक कोंडीचे प्रकार सुरू असतानाच पणजीत पदपथावर पार्किंग सुरू झाली आहे. सांतिनेज येथील चौकाजवळ असलेल्या पदपथावर चक्क मोठी चारचाकी उभी केल्याने शहरात पार्किंगचा नवा प्रकार सुरू झाला आहे की काय अशी चर्चा रंगली आहे.

युरी व एल्टनचे फुटबॉल प्रेम!

आलेमाव कुटुंबाचे फुटबॉल प्रेम गोमंतकीयांना परिचित आहे. विरोधी पक्षनेते, कुंकळ्ळीचे आमदार व केपेचे आमदार फुटबॉल विश्व चषकाचे सामने पाहण्यासाठी कतारला गेले आहेत. कतारात असलेल्या काही गोमंतकीयांनाही युरी व एल्टन भेटले म्हणे.

युरीच्या एका समर्थकाने त्यांना मेजवानीही दिली. एल्टनला फुटबॉलचे किती प्रेम आहे ते माहीत नाही. जसे सासष्टीत आहे, तसे केप्यात फुटबॉल कल्चर नाही. आता युरी व एल्टन जागतिक फुटबॉल स्पर्धेतून काय शिकून येतात ते पाहूया. एक मात्र खरे यंदा फुटबॉलचा कुंभमेळा आशिया खंडात झाला म्हणून अनेक गोमतकीयांना फुटबॉलचे लाईव्ह सामने बघायला मिळाले.

सिल्वेराबाबांचे फोटोसेशन

सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत सिल्वेरा यांची सांतआंद्रेच्या जनतेने घरी रवानगी केल्यानंतर आपण गेल्या कार्यकाळात किती विकासकामे आणि नोकऱ्या दिल्या याचे प्रदर्शन सिल्वेराबाब करत आहेत.

हल्लीच पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून ही गेल्या सरकारच्या कार्यकाळात झाली होती. सांतआंद्रेत पोलिस खात्यात नोकऱ्या मिळालेल्यांना सिल्वेरबाब आपल्या घरी आणून नियुक्ती पत्रासह फोटोसेशन करत आहेत. जणू माझ्याशिवाय तुमचे काय होईल? असे ते सांतआंद्रेच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत असावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT