पणजी: राज्यपालांच्या अधिकारांशी संबंधित विषय आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ऐरणीवर असल्याने, नियमित स्वरूपातील प्रकरणे न घेतल्यामुळे गोव्याशी संबंधित महत्त्वाच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही. यामुळे १० माजी व ८ आताच्या आमदारांच्या आपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीतून कोणता आदेश येतो याकडे लक्ष लावलेल्यांना पुढील तारखेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मागील विधानसभेच्या कालखंडात काँग्रेस पक्षातील दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याविरोधात दाखल झालेल्या अपात्रता याचिका अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे या विधानसभेत काँग्रेसमधून आठ आमदार भाजपमध्ये गेले, त्यांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या याचिका सादर केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर आज या सर्व याचिकांवर सुनावणी अपेक्षित होती. मात्र, इतर विषयांमुळे गोव्याच्या राजकीय घडामोडींशी संबंधित या संवेदनशील प्रकरणांवर सुनावणी झाली नाही.
आजच्या सुनावणीअभावी या अपात्रता प्रकरणांच्या याचिका नेमक्या कधी ऐकल्या जाणार, याबाबतही स्पष्टता निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे या खटल्यांचा पुढील टप्पा आता सर्वोच्च न्यायालयाच्या लिस्टिंगवर अवलंबून राहणार आहे.
गोव्यातील विरोधी पक्ष आणि नागरी समाजाचे डोळे या सुनावण्यांवर लागलेले असताना पुन्हा एकदा पुढील तारीख अनिश्चित ठरल्याने राजकीय उत्सुकता अधिक वाढली आहे. या याचिकांमुळे भविष्यातील सत्ता समीकरणावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे न्यायालयाच्या पुढील तारखेची सर्वत्र आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.