काही दिवसांपूर्वी कदंब बस चालकाने दारूच्या नशेत बस चालवली होती. त्या प्रकारानंतर जुने गोवा पोलिसांनी एल्विस रॉड्रिग्स या बस चालकावर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
तसेच सदर चालकाला निलंबित करून त्याचा परवानाही रद्द केल्याची माहिती समोर आली होती. याच धर्तीवर आता कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने महत्वाचं पाऊल उचललं असून राज्यातील प्रमुख बसस्थानकावर अल्कोमीटर ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
खांडेपार ओपा जंक्शनवरील सरकारी जागेतली दोन बेकायदेशीर दुकाने 10 दिवसात हटवा, फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा दुकान मालकांना निर्देश. जर दुकान मालकांनी दुकाने न हटवल्यास ती मोडून टाकण्याचा उपजिल्हाधिकाऱ्यांचा सार्वजनीक बांधकाम खात्याला आदेश. ह्या दोन दुकानांमुळे शाळेच्या मुलांसाठीच्या बस स्टॉपची मागणी रखडली होती.
७०वा गोवा राज्य सहकारी सप्ताह उद्या १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत राज्यात सुरू. मये येथून होणार सुरू. सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या कॉऑपरेटर, अध्यक्ष, सचिव, सहकारी संस्था, डेअरी सहकारी संस्था व इतर सहकारी संस्थाना पुरस्कार जाहीर करण्यात आले.
गोवा सरकार, क्रीडा आणि युवा कार्य संचालनालयाच्या वतीने 2021-22 आणि 2022-23 सालच्या राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. युवा विकास कार्याच्या क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था /महाविद्यालये/ युथ क्लब आणि स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागवले आहेत.
अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे. वैयक्तिक पुरस्कारासाठी 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवकांना अर्ज करता येईल.
एकीकडे सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू असताना साळेली सत्तरी येथे लोकांना पाण्याची तीव्र समस्या कायम. गेले साधारण महिनाभर आठवड्यातून फक्त दोन ते तीन दिवस काही तासांसाठीच नळांना पाणी. पाण्याची टॅंकर सेवाही पडतेय अपुरी. ग्रामस्थांच्या सणावर पाण्याच्या टंचाईचं सावट.
वागातोर येथे झालेल्या अपघाता संबंधी एक अपडेट हाती येत असून एसयूव्ही चालक वेणू गोपाल कुरूपला 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती समजतेय. या घटनेसंबंधी काल म्हणजेच 12 नोव्हेंबरला त्याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. तसेच येथील स्थानिकांनी पोलिसांनी केलेल्या पंचनाम्याविषयी संशय व्यक्त करत पोलीस स्टेशनला घेराव घातला होता.
माझ्या अथक प्रयत्नांनी अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील घातक कचरा साफ करण्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला 5 कोटी मंजूर करण्यास भाग पाडले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित अधिकारणीला आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाला आळा घालून कुंकळ्ळीवासीयांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी ठोस कृती करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
मडगाव येथील अबरार मशिदीजवळ (खरेबांध) रस्त्यावरील वीजवितरण विभागाचा पोल मोडून रस्त्यावर पडल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या पोलवरील वीजवाहिन्यांमधून विजेचा प्रवाह सुरु होता का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र या घटनेमुळे अल्प कालावधीसाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
निवृत्त बँक अधिकारी असलेले वडिल आणि बहिणीचा खून करून एक माथेफिरू सायकोल किलर गोव्यात आल्याची माहिती आहे.
मध्यप्रदेशात खूनाची घटना घडली असून त्यानंतर आरोपी आधी गुजरातला गेला, तिथून महाराष्ट्रात गेला आणि तिथून गोव्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पुलकित उर्फ पुलिन असे आरोपीचे नाव आहे. तो इंदूरच्या नौलखा भागातील वसुधैव कुटूंबकम अपार्टमेंट येथे राहतो. राहत्या घरात त्याने वडिल आणि बहिणीची हत्या केली. तिथून गुजरातला गेला, त्यानंतर महाराष्ट्र आणि तो गोव्यात आल्याचा संशय आहे.
पोलिस तिन्ही ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्यावर 10 हजार रूपयाचे इनाम घोषित करण्याचा प्रस्तावही डीसीपींना पाठवला आहे.
काल (रविवार) होंडा येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार, पीएसआय विराग पवार आणि पोलीस कॉंस्टेबल गौरेश नाईक, प्रशांत सुतार, प्रसन्ना नाईक, निखिल गावस आणि प्रणय गवस यांच्या नेतृत्वात होंडा येथे अमली पदार्थांवर छापा टाकला आणि आरोपी सूरज रामप्रताप शाह (32, कुंभारजुवे, मूळ-बिहार) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीकडून पोलिसांनी सुमारे 50,000 हजार किमतीचा गांजा जप्त केला आहे.
नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे काम अतिवृष्टीमुळे लांबले होते. मात्र त्याला गती मिळाली असून हे काम येत्या 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. संपूर्ण चाचण्या केल्यानंतर जानेवारीपर्यंत त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लवकरच त्याची तारीख जाहीर करतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.
कोमुनिदादीतील घरांसाठी कायदा दुरुस्ती आवश्यक.त्यासाठी कोमुनिदाद संस्थांना विश्वासात घेऊन एजी आणि कायदा खात्याच्या सहयोगाने उपाय काढणे गरजेचे अन्यथा कोर्टाच्या आदेशानुसार लोकांची घरे पाडण्याचे प्रकार सुरुच राहतील, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचे भाष्य.
कार्तिकी शुद्ध एकादशी जी प्रबोधिनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते. यादिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार सांभाळतात, असे मानले जाते.
आषाढी एकादशीप्रमाणेच या एकादशीला सुद्धा गोव्यातून पायी वारी करत वारकरी विठ्ठलाच्या भक्तीपोटी पंढरपुरात दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणे हरमल गावातील वारकरी यंदाही पायी वारी करत पंढरपुरसाठी रवाना झाले आहेत.
धारबांदोडा वंडाळा येथे काही दिवसांपूर्वी अतुल नाईक यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात ब्लॅक पॅंथर दिसला होता. तोंडात मांजर पकडलेला पॅंथर दिसल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. काल पुन्हा पॅंथर दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बोरी येथील प्रस्तावित नवीन पुलाला लोटलीतील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्याबाबत शेतकऱ्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री (MoRTH) नितीन गडकरी यांनाच पत्र लिहिले आहे.
या पत्रातून प्रस्तावित भूसंपादन वगळण्याची मागणी केली आहे. तसेच ग्राऊंड रिअॅलिटीचा अभ्यास करावा, असेही म्हटले आहे.
दक्षिण गोव्यातील कोलवा सीमेजवळील बेतालभाटी येथील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या बार आणि रेस्टॉरंटला मोठा धक्का बसला आहे.
गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी (GCZMA) ने हा बार पाडण्याचे आदेश दिले होते. त्या विरोधात सुप्रीम कोर्टात करण्यात आलेले अपील कोर्टाने फेटाळून लावले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने नमूद केले आहे की, त्यांना चुकीच्या निकालात/आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही.
SC ने सध्याची रचना पाडण्यासाठी मालकाला 4 महिन्यांचा वाढीव कालावधी दिला असताना, या मुदतीचे पालन करण्यात तो अयशस्वी झाल्यास ते पाडण्यासाठी अधिकारी नियुक्त केले जातील, असे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.