Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘केव्‍हा देणार तुम्‍ही आश्‍वासन?’ विजय सरदेसाईंचा मराठी प्रश्न आणि साधलेली संधी

Vijai Sardesai: सोमवारी सुदिन ढवळीकरांनी मराठीत उत्तर देण्‍यास सुरवात केल्‍यानंतर विजय सरदेसाई यंदाही त्‍यांना डिवचणार का? याकडे गॅलरीतील पत्रकारांसह तमाम मराठीप्रेमींचे लक्ष लागून होते.

Sameer Panditrao

सिद्धार्थ कांबळे

सत्ताधाऱ्यांच्‍या पार्टीला सभापती रमेश तवडकर उपस्‍थित राहिल्‍याने निर्माण झालेला वाद आणि गेल्‍या काही महिन्‍यांत विरोधकांतील फुटीमुळे राज्‍यभर झडलेल्‍या चर्चेच्‍या पार्श्वभूमीवर, संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून राहिलेले विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले.

पहिल्‍याच दिवशीच्‍या कामकाजावेळी प्रश्‍नोत्तराच्‍या तासाला आमदार उल्‍हास तुयेकर यांनी गृहनिर्माण मंडळाच्‍या अनुषंगाने विचारलेल्‍या प्रश्‍नाला गृहनिर्माणमंत्री सुदिन ढवळीकर यांनी चक्‍क मराठीत उत्तर दिले. त्‍यामुळे साहजिकच राज्‍यभरातील मराठीप्रेमींच्‍या नजरेसमोर आमदार विजय सरदेसाई उभे राहिले असणार हे नक्‍की.

गत अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात विजय सरदेसाई यांच्‍याच प्रश्‍नाला उत्तर देताना सुदिन ढवळीकर यांनी त्‍यांना ‘मराठीत बोलू का?’ असे विचारले होते. त्‍यावेळी आमदार सरदेसाईंनी त्‍यांना ‘मराठी नकोच, कुठली मराठी घेऊन आला इथे? साध्या कोकणीत उत्तर द्या’, असे सुनावले होते. हा वाद पुढील काही दिवस सुरूच राहिला. अखेर मराठीप्रेमींनी यावरून सरदेसाईंना घेरण्‍यास सुरवात केल्‍यानंतर ‘आपल्‍या वक्तव्‍यामुळे कुणी दुखावले असल्‍यास सॉरी’ असे म्‍हणत, सरदेसाईंनी या वादावर पडदा टाकला होता.

सोमवारी सुदिन ढवळीकरांनी मराठीत उत्तर देण्‍यास सुरवात केल्‍यानंतर विजय सरदेसाई यंदाही त्‍यांना डिवचणार का? याकडे गॅलरीतील पत्रकारांसह तमाम मराठीप्रेमींचे लक्ष लागून होते. पण, अधिवेशनाच्‍या सुरवातीलाच वादाच्‍या भोवऱ्यात अडकायला नको, म्‍हणून कदाचित विजय सरदेसाईंनी ढवळीकर बोलत असताना कोणतेही भाष्‍य करण्‍याचे टाळले. ढवळीकरांचे मराठी उत्तर शांतपणे ऐकण्‍यातच त्‍यांनी धन्‍यता मानली.

पण, कोणत्‍या कोणत्‍या कारणातून विजय याचा वचपा काढणार, हे त्‍यांना ओळखणाऱ्यांना पक्‍के माहिती होते. आणि त्‍यावर शिक्‍कामोर्तब झाले, ते आमदार डिलायला लोबो यांनी शापोरा किल्ल्‍याच्‍या सौंदर्यीकरणासंदर्भात विचारलेल्‍या प्रश्‍नावरील चर्चेदरम्‍यान.

शापोरा किल्ल्‍याच्‍या सौंदर्यीकरणाची अनेक कामे प्रलंबित आहेत. खर्चाची फाईल वित्त खात्‍याकडे आहे, असेच उत्तर पुरातत्त्‍व खात्‍याचे मंत्री सुभाष फळदेसाई वारंवार देत आहेत. त्‍यांनी मला आताच प्रलंबित कामे कधीपासून सुरू करणार, वर्कऑर्डर कधी काढणार, याबाबत ठोस आश्‍वासन द्यावे, अशी मागणी ताणून धरली. त्‍यात एकदा सुदिन ढवळीकर यांनी तोंड घातल्‍यानंतर मात्र विजयनी पद्धतशीरपणे सुदिन ढवळीकरांना डिवचण्‍याची संधी साधली.

आपण पुरातत्त्‍व खात्‍याचा मंत्री असताना शापोरा किल्ल्‍याच्‍या सौंदर्यीकरणाचा विषय हाती घेतला होता. परंतु, ते काम आपल्याकडून झाले नाही अशी कबुली देतानाच, आपल्‍याकडून ते काम झाले नाही म्‍हणूनच डिलायला लोबो यांनी विकासासाठी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. त्‍यामुळे सरकारने आमदार लोबोंना ठोस आश्‍वासन दिलेच पाहिजे असे म्‍हणत, ‘केव्‍हा देणार तुम्‍ही आश्‍वासन?’ असा प्रश्‍न मराठीतून विचारला. विजय सरदेसाईंच्‍या या मराठी वक्तव्यावरून सभागृहात काहीवेळ हास्‍याचे कारंजे उडाले. तेव्‍हा ढवळीकरांना किती समाधान वाटत होते, ते त्‍यांच्‍या चेहऱ्यावरूनच लख्खपणे दिसून येत होते.

खरेतर, अधिवेशनाच्‍या काही दिवस आधी विरोधी पक्षांमध्‍ये जो अंतर्गत कलह होता, त्‍याचे पडसाद अधिवेशन सुरू होताच दिसतील, विरोधक एकजूट न होता स्‍वतंत्रपणे सरकारला धारेवर धरतील, असे सर्वांनाच वाटत होते. पण, सोमवारच्‍या पहिल्‍या दिवशी मात्र एकमेव आरजीचे विरेश बोरकर वगळले, तर इतरांनी जनतेचा हा गैरसमज काहीअंशी दूर करण्‍याचा प्रयत्‍न केला.

काँग्रेसच्‍या तीन, आपच्‍या दोन आणि गोवा फॉरवर्डच्‍या एक अशा सहा आमदारांनी तरी पहिल्‍या दिवशी एकी दाखवत सत्ताधाऱ्यांना विविध विषयांवरून उघडे पाडण्‍याचा आटोकाट प्रयत्‍न केला. त्‍यामुळे या पक्षांच्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्‍ये समाधान पसरले असेल हे निश्‍चित. पण, पंधरा दिवसांच्‍या अधिवेशनात ही एकी कुठपर्यंत राहणार? याकडेही जनतेचे निश्‍चित लक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये जो रुट गाठणार नवा 'माइलस्टोन'! 22 धावा करताच रचणार इतिहास

SCROLL FOR NEXT