
पणजी: गृहनिर्माण मंडळाची घरे घेण्यासाठी १५ वर्षे रहिवासी असल्याची नाही तर ३० वर्षे रहिवाशी असावा अशी अट आहे. राज्यातील गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात घरे बांधून देण्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पेडण्यात अशी घरे उभारण्यासाठी जमीन निश्चित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभा सभागृहात बोलताना स्पष्ट केले.
आमदार उल्हास तुयेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. राज्यातील गरीब जनतेला परवडणाऱ्या दरात घरे मिळावीत यासाठी गृहनिर्माण मंडळाची स्थापना करण्यात आली. याआधी गरिबांना कमी पैशांत तसेच हप्त्यांनी अशी घरे मिळत होती. परंतु आता मंडळाने अशा घरांचा लिलाव करण्यास सुरवात केली आहे. त्याचा फायदा केवळ परराज्यांतून गोव्यात आलेल्या धनाढ्यांना मिळत आहे. त्यामुळे मंडळाने ही लिलाव प्रक्रिया बंद करावी, अशी मागणी तुयेकर यांनी केली.
राज्यात सध्या फ्लॅटची किंमत ५० ते ६० लाखांवर पोहोचली आहे. ‘बिल्डर’ बनलेल्या गृहनिर्माण मंडळाच्या फ्लॅटची किंमतही तेवढीच आहे. असे फ्लॅट विकत घेण्यासाठी गरिबांना बँकांकडून कर्ज मिळत नाही. त्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा. ज्यांच्या पालकांचा व घर घेणाऱ्यांचा जन्म गोव्यात झालेला आहे, अशांनाच गृहनिर्माण मंडळाची घरे दिली पाहिजेत, असेही तुयेकर यांनी नमूद केले.
या चर्चेत मंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार व्हेंझी व्हिएगस, प्रेमेंद्र शेट, विजय सरदेसाई, दिगंबर कामत यांनीही सहभाग घेतला.
गृहनिर्माण मंडळ यापूर्वी आर्थिक मागास गटातील नागरिकांसाठी घरे बांधून देत होते. परंतु या गटातील गोमंतकीय अशी घरे घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे गृहनिर्माणमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. मंडळाकडे सध्या रुमडामळ-दवर्ली येथे ७३ फ्लॅट आहेत. त्यातील ४६ फ्लॅट गरिबांना देता येणे शक्य आहे. ज्यांना ही घरे घ्यावयाची आहेत, त्यांची यादी आमदार तुयेकर यांनी मंडळाकडे सादर करावी, असेही ते म्हणाले.
‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यात २५४ घरे बांधण्याचे राज्य सरकारने निश्चित केले होते. त्यातील २४० घरे बांधल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. परंतु, विधानसभेतील लेखी उत्तरात या योजनेअंतर्गत राज्यात एकही घर बांधले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा आमदारांचा अवमान आहे, असे आमदार व्हेंझी व्हिएगस म्हणाले. त्यावर २४० घरे बांधून पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले. त्यावरून दोघांमध्ये बराच वेळ जुंपली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.