पणजी: राज्यात वाढत्या गुन्ह्यांमुळे येथील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. ‘रासुका’ कायदा लावला तरी गुन्हेगारांना त्याची भीती उरली नाही. राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्था या विषयावर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
काँग्रेस भवनात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची उपस्थिती होती. आलेमाव म्हणाले, राज्यातील पोलिस खाते अपयशी ठरल्यामुळे गोव्यात गुन्हे वाढत आहेत. राज्य गुन्हेगारांसाठी सुरक्षीत आश्रयस्थान बनत असून, येथील लोकांसाठी ते असुरक्षित बनत चालले आहे.
राज्य सरकार अध्यात्मिक आणि वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देत असल्याचे सांगत असलेतरी दररोज घडत असलेले गुन्हे पाहता ‘गुन्हेगारी पर्यटन'' घडविले जात आहे काय? असा सवाल उपस्थित होतो. ‘गॅंग्स ऑफ वासेपूर''प्रमाणे आता ‘गँग्स ऑफ गोवा‘ असे म्हणावे लागत आहे. आलेमाव म्हणाले, गुन्ह्यांमुळे जगभर राज्याचे नाव बदनाम होत आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्री सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत.
बेकायदेशीर कारवायांबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर मालमत्तेच्या वादातून उमाकांत खोत यांची हत्या करण्यात आली होती. राजकीय संरक्षणामुळे हे गुन्हे सुरूच आहेत. ही कायदा आणि सुव्यवस्था नाही; ती ‘जमीन आणि सुव्यवस्था’ आहे, असा उपरोधिक सवाल करीत आलेमाव म्हणाले, साळगाव दुहेरी खुनाची न्यायालयीन चौकशी व्हावी.
भाजप सरकार काही झाले की काँग्रेसला दोष देत आले आहे. केंद्रातील सरकार नेहरूंना दोष देते, तर राज्यातील सरकार काँग्रेसला दोष देते. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सध्या गोव्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचे बी २००७ मध्ये काँग्रेस काळात रोवल्याचे सांगतात. भाजपचे सरकार २०१२ मध्ये आले आहे, असे सांगतात. त्यामुळे यावरून प्रदेशाध्यक्षांना काहीच माहीत नाही, असेच दिसते. कोण जमीन घेतात त्याची माहिती ठेवणारी यंत्रणा नसल्याचे ते सांगतात, मग उपनिबंधकांकडे जमीन व्यवहार कसे होतात, असा सवाल करीत नाईक यांनी जनतेची दिशाभूल करू नये.
-अमित पाटकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.