Local Opposition To Proposed Dam जलस्रोत खात्याच्यावतीने मुर्डी - खांडेपार येथे खांडेपार नदीवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित बंधाऱ्याला स्थानिकांचा विरोध कायम असून सरकार हा बंधारा उभारण्यासाठी आग्रही आहे. यासाठी सरकारने या परिसरात जमावबंदीचे कलम 144 लागू करून प्रस्तावित बंधाऱ्याची रेखांकने पूर्ण केली आहेत.
याला स्थानिकांनी तीव्र आक्षेप घेऊन बंधाऱ्याला विरोध दर्शविला आहे. दरम्यान, सरकारने जारी केलेले कलम 144 त्वरित हटवावे या मागणीसाठी गावकरी सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटणार आहेत.
मुर्डी-खांडेपार येथील स्थानिकांनी आज कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन आम्हाला कोणत्याही स्थितीत हा बंधारा नको व जारी केलेले 144 कलम त्वरित हटवावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली.
शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून मुर्डी-खांडेपार येथील नागरिक मंत्री रवी नाईक यांच्या कार्यालयात जमा झाले होते. पंच अभिजित गावडे, मनीष नाईक, नीलेश नाईक व इतर ग्रामस्थांनी मंत्र्यांकडे एकच विनंती केली, की आम्हाला न्याय मिळवून द्या.
आम्हाला बंधारा नको. हा बंधारा प्रियोळ मतदारसंघाच्या क्षेत्रात घालण्यात यावा तसेच या ठिकाणी लावलेले 144 कलम त्वरित मागे घ्यावे. यावेळी फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, खांडेपार सरपंच संजना नाईकही उपस्थित होत्या.
...तर जगणे मुश्कील
तुम्हीच आमच्या गावाचा आधारस्तंभ आहे, अशी रवी नाईक यांच्याकडे विनंती करीत सर्व महिलांनी २०२१ मधील पुराची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, नदीला महापूर आला, तेव्हा आमच्या घरात पाणी शिरले होते.
या बंधाऱ्यामुळे आमचे जगणे मुश्कील होईल. आमच्या बागायती नष्ट होतील. त्यामुळे बंधाऱ्याचे स्थलांतर प्रियोळ मतदारसंघात करावे, तसेच आमच्या गावात आम्ही भीतीच्या छायेत वावरत असून येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे.
मुख्यमंत्री सोमवारी भेटणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी सकाळी १० वाजता स्थानिकांना भेटण्याची वेळ दिल्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी सांगितले. रवी नाईक यांच्यासोबत ७ ते १० ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या भेटीत आम्हाला बंधारा का नको याविषयी बोलणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.