पर्वरी: गोव्यातील तरुणांना परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुबाडण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. नुकतीच एक अशीच घटना समोर आली असून, वार्का (Varca) येथील एका रहिवाशाला दोन भामट्यांनी तब्बल ५ लाख रुपयांना गंडा घातला आहे. नोकरीही नाही आणि दिलेले पैसेही परत मिळेना, अशी अवस्था झालेल्या पीडित व्यक्तीने अखेर पर्वरी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वार्का येथील तक्रारदाराची ओळख दोन व्यक्तींशी झाली होती. या दोघांनी तक्रारदाराला परदेशात उच्च पगाराची नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रक्रियेसाठी आणि कागदपत्रांच्या नावाखाली त्यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली. परदेशात जाऊन चांगले भविष्य घडवण्याच्या आशेने तक्रारदाराने ही मोठी रक्कम संशयितांच्या हवाली केली. मात्र, पैसे हातात पडताच संशयितांनी आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली.
पैसे देऊन बरेच दिवस उलटल्यानंतरही जेव्हा नोकरीबाबत कोणतीही हालचाल झाली नाही, तेव्हा तक्रारदाराने संशयितांकडे पाठपुरावा सुरू केला. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या संशयितांनी नंतर नोकरी देण्यास असमर्थता दर्शवली. तक्रारदाराने आपले पैसे परत मागितले असता, त्यांनी पैसे देण्यासही नकार दिला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने पर्वरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
एजंटांपासून सावध राहा
या घटनेमुळे पुन्हा एकदा परदेशात जाणाऱ्या तरुणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पर्वरी पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे. "नोकरीच्या नावाखाली मोठी रक्कम मागणाऱ्या कोणत्याही अनधिकृत एजंटांवर विश्वास ठेवू नका," असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयित इतर कोणाशी संबंधित आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.