School Merger : राज्यातील प्राथमिक शाळांच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र, विरोधकांकडून विनाकारण अपप्रचार करण्यात येत आहे. परंतु सूज्ञ जनतेने अशा अपप्रचाराला बळी न पडता राज्यातील शिक्षणाचा स्तर आणि क्षमता वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी शापोरा येथे केले.
वार्षिक परंपरेनुसार, नारळी पंचमीनिमित्त बार्देशातील शापोरा येथील मच्छीमार जेटीवर समुद्रात नारळ सोडल्यानंतर मंत्री हळर्णकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शापोरा बोट असोसिएशनचे अध्यक्ष बलभीम मालवणकर, हणजूण-कायसूवचे माजी सदस्य सुरेंद्र गोवेकर, आसगाव-बादेचे माजी सरपंच गोकुळदास नाईक, सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत परब आणि स्थानिक मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बलभीम मालवणकर यांनी स्थानिक मच्छीमारांच्या समस्या मंत्री हळर्णकर यांच्यासमोर मांडल्या. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे हळर्णकर म्हणाले.
शापोरात भव्य मत्स्य प्रकल्प
शापोरात भव्य मत्स्य प्रकल्प उभारण्यासाठी याआधी झालेले प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यामुळे त्या कारणांची ठोस मीमांसा करून या भागात पुढील काळात भव्य मत्स्य प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या मत्स्योद्योग खात्याची मदत घेतली जाईल. यासाठी मच्छीमार खात्याकडून हालचाली सुरू असल्याची माहिती हळर्णकर यांनी सांगितले.
सॅण्ड बार समस्या सोडविणार
समुद्रात निर्माण होणाऱ्या वाळूच्या टेकड्यांमुळे (सॅण्ड बार) मच्छिमारांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या अनेक वर्षांपासूनच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे हळर्णकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.