CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

GMC Protest: ‘संप सुरूच राहील’! गोमेकॉतील डॉक्टरांचा निर्धार; आंदोलन मागे घेण्यासाठी मुख्‍यमंत्र्यांची साद

Goa Doctors Protest: आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी गोमेकॉत येऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत डॉक्‍टरांनी आंदोलन सुरूच ठेवण्‍याचा निर्णय घेतला आहे.

Sameer Panditrao

पणजी: आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी गोमेकॉत येऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत डॉक्‍टरांनी आंदोलन सुरूच ठेवण्‍याचा निर्णय घेतला आहे. राणे यांनी ‘एक्‍स’वरही माफी मागितली आहे. ‘संघटनेच्‍या बहुतांश समस्‍या सोडवल्‍या गेल्‍या आहेत. भविष्‍यात असे प्रकार घडणार नाहीत’, अशी ग्‍वाही देत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलन मागे घेण्‍याचे आवाहन केले आहे.

‘संप सुरूच राहील’, असे आपत्‍कालीन विभागाने कळविल्‍याने गोमेकॉच्‍या संचालक (प्रशासन) गौतमी काणेकर यांनी सर्व विभागप्रमुखांना निर्देश दिले आहेत की, रजा वा सुटीवर असलेल्‍या सर्व सल्‍लागार, कर्मचाऱ्यांना परत बोलावले जावे. कोणतीही रजा पुढील आदेशापर्यंत मंजूर केली जाऊ नये. दरम्‍यान, गोमेकॉच्‍या आंदोलनकर्त्या डॉक्टरांच्या मागण्या मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मान्य केल्या आहेत. मात्र, गोमेकॉच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांची आरोग्यमंत्री राणे यांनी तेथे जाऊन माफी मागू नये, असे सत्ताधारी वर्तुळात ठरविण्यात आले आहे.

त्यानुसार आवश्यकता भासल्यास उद्या (ता. १०) मुख्यमंत्री गोमेकॉला भेट देणार आहेत. त्‍यांनी आंदोलन मागे घेण्‍याचे आवाहन केले आहे. एखाद्या मंत्र्याने अशा प्रकारे जाऊन माफी मागितली तर चुकीचा पायंडा पडणार आहे. त्याचे लोण इतरत्रही पसरू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण हाताळावे अशी सूचना सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉतील आंदोलकांना व अधिष्ठात्यांना बोलावून घेतले आणि त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच आरोग्यमंत्र्यांनी जाहीरपणे मागितलेली माफी पुरेशी आहे, अशी भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

रुग्णाला योग्य वागणूक न दिल्‍याच्‍या तक्रारीनंतर डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित करण्याचा आदेश आरोग्यमंत्र्यांनी आपत्कालीन विभागाला भेट दिल्‍यानंतर दिला होता. त्यानंतर या कारवाईबाबत जनमानसात पडसाद उमटल्यानंतर आणि डॉक्टरांच्या संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्‍यात आल्‍यानंतर आरोग्यमंत्र्यांनी आधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आणि नंतर ‘एक्स’वर माफी मागितली होती. मात्र, गोमेकॉत आज आंदोलन करणाऱ्या डॉक्टरनी ती माफी मान्य केली नाही.

तर, आरोग्यमंत्र्यांनी आपत्कालीन विभागात येऊनच डॉ. कुट्टीकर यांची माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पुन्हा हस्तक्षेप केला. दरम्‍यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्या मंगळवारी गोमेकॉला भेट देण्‍याची तयारी दर्शविली आहे. गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर व गोवा निवासी डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींनी आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍‍नांना उत्तर देताना डॉ. बांदेकर यांनीच ही माहिती दिली.

कॅज्‍युअल्‍टीमध्‍येच माफी मागा

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी स्पष्ट सांगितले, माझा अपमान ज्या आपत्कालीन विभागात झाला, तेथेच आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी माझी जाहीर माफी मागावी. तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. दरम्यान, आम्ही केवळ आपत्‍कालीन स्‍थितीतील रुग्णांना सेवा देणार आहोत. अन्य सेवा ठप्प ठेवत आहोत. मी एक डॉक्टर आहे. मी फक्त माझे कर्तव्य करत होतो. माझ्यावर सार्वजनिकरीत्या अपमानजनक शब्दांत टीका झाली. त्यामुळे हा फक्त माझा नव्हे तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचा अपमान आहे, असे ते म्‍हणाले.

व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रकरणी गुन्हा नोंदवा

गोमेकॉतील डॉक्टरांची संघटना ‘गार्ड’चे अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा यांनी सांगितले की, डीनकडे आम्ही व्हीआयपी संस्कृती बंद करण्याची आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची लेखी मागणी केली आहे. गोमेकॉत कोणत्याही सेवा बंद राहिलेल्‍या नाहीत, मात्र डॉक्टरांचा नैतिक विरोध सुरू आहे.

अनेकजण माघारी

गोमेकॉतील बाह्यरुग्ण सेवा आज पूर्णतः विस्कळीत झाली होती, असा अनेकांनी दावा केला. उपचारांसाठी आलेल्या शेकडो रुग्णांना उपचारांविनाच माघारी परतावे लागले. वैद्यकीय अधिकारी, विभागप्रमुख, सल्लागार, विद्यार्थी व इंटर्ननी आंदोलनात सहभाग घेतला.

डॉक्टरांच्या मागण्या

आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी आपत्कालीन विभागात येऊनच डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांची माफी मागावी.

व्हिडिओग्राफी करणाऱ्याविरोधात डीननी पोलिसांत ‘एफआयआर’ नोंदवावा.

गोमेकॉतील ‘व्हीआयपी’ संस्कृती तात्काळ बंद करावी.

गोमेकॉचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि ‘गार्ड’चे प्रतिनिधी डॉक्टर यांच्‍या भेटीत त्‍यांच्‍या बहुतांश समस्या सोडवण्यात आल्या आहेत. संप न करण्याचे मी त्यांना आवाहन केले असून, गरज भासल्यास स्वतः वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देईन.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT