Water Shortage गांजे - उसगाव भागात गेल्या 17 दिवसांपासून वारंवार पाण्याची कमतरता भासत असल्याने गावातील महिलांनी आज आक्रमक पवित्रा घेत साहाय्यक अभियंते महेश गावणेकर यांना सकाळी 11 वाजता पंप हाउसजवळ जाऊन घेराव घातला व पाणीटंचाईबद्दल जाब विचारला.
गांजे भागातील महिला एकत्र येऊन सकाळी पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाउसजवळ जमा झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत उसगावचे सरपंच नरेंद्र गावकर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी जेव्हा पाणीपुरवठा विभागाचे साहाय्यक अभियंते महेश गावणेकर त्या ठिकाणी आले, तेव्हा या महिलांनी त्यांना घेराव घालून पाण्याविषयी जाब विचारला. आम्हाला पाणी कधी देणार? पाण्याविना तुम्ही राहू शकता का? अशा प्रश्नांचा भडिमार केला.
सोमवारपर्यंत नियमित पाणीपुरवठा झाला नाही, तर आम्ही गांजे येथे होत असलेला प्रकल्प बंद करू, असा इशारा दिला. या प्रकल्पासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे तो बंद करण्याचा आम्हाला हक्क असल्याचेही या महिलांनी ठणकावून सांगितले.
दोन पंप जळाल्याने समस्या
गांजे भागात पाणीपुरवठा नियमित होत होता, पण गेल्या काही दिवसांपूर्वी चिखलमिश्रीत पाण्यामुळे पंप जळाला. त्या ठिकाणी दुसरा पंप जोडला, पण तोही जळाला. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. आता दुसऱ्या पंपची व्यवस्था करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
- महेश गावणेकर, साहाय्यक अभियंते
आम्ही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही दूरध्वनी उचलत नव्हते. त्यामुळे गांजे येथील कंत्राटदाराला आम्ही गांजेतील प्रकल्प बंद करण्याचा इशारा दिला, तेव्हा लगेच या ठिकाणी साहाय्यक अभियंते महेश गावणेकर आले.
- नरेंद्र गावकर, सरपंच गांजे-उसगाव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.