पणजी: परदेशी चित्रपट गोव्यात शूट व्हावेत या भव्य इच्छेने जरी गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवाला कोट्यवधी रुपये खर्च करून हजेरी लावायचे ठरवले असले आणि (एखाद्या चमत्काराने) तिथल्या काही चित्रपट निर्मिती संस्थांचे गोव्यात येऊन शूटिंग करण्यासाठी मन त्यांनी वळवले तरी त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज घेण्यासाठी गोव्यात ‘लाईन प्रोड्युसर’ म्हणून गेली अनेक वर्ष यशस्वीपणे काम करणाऱ्या काहींची भेट दै. गोमन्तकच्या प्रतिनिधीने जेव्हा घेतली तेव्हा समोर आलेले वास्तव फारच अस्वस्थ करणारे होते.
दिलीप बोरकर हे गोव्याचे प्रसिद्ध लाईन प्रोड्यूसर आहेत. बॉलिवूड तसेच दक्षिणेतील गाजलेल्या सिनेमांचे शूटिंग गोव्यात होताना, त्यांचे लाईन प्रोड्यूसर म्हणून त्यांनी काम केले आहे. अलीकडच्या काळात गोवा मनोरंजन संस्थेने ज्या प्रकारे गोव्यात होणाऱ्या शूटिंगची फी वाढवली आहे, त्यातून गोव्यात शूटिंग करण्यासाठी उत्सुक असलेले देशभरातील निर्माते आपले पाय मागे घेतील अशी भीती त्यांना वाटते.
ते सांगतात, ‘सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत निल (गाजलेल्या केजीएफ या चित्रपटाचे दिग्दर्शक) दिग्दर्शित करत असलेला आणि जुनियर एटीआर या अभिनेतेचा समावेश असलेला एक चित्रपट आम्ही नुकताच गमावला आहे. आता या चित्रपटाचे चित्रीकरण कर्नाटकात होणार आहे.
गोव्यात शूटिंगसाठी आकारल्या जाणाऱ्या अवाढव्य फीसंबंधी जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी कर्नाटकातच शूटिंग करायचे ठरवले. गोव्यात शूटिंग करायचे ठरवल्यास मनोरंजन संस्था (१२,५०० रुपये प्रति दिवस), पर्यटन खाते (१० हजार रुपये प्रति दिवस), सीआरझेड (एक लाख रुपये प्रति दिवस),
वन खाते (१० हजार रुपये प्रति दिवस) असे महागडे दर आकारतात. तर कर्नाटकमधील कुमठा सारख्या समुद्रकिनाऱ्यावरील भागात शूटिंग करण्यासाठी सरसकट ५००० रुपये प्रतिदिन असा आकार आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्ये चित्रपट निर्मात्यांना कमीत कमी रक्कम आकारून तिथे शूटिंग करण्यासाठी येण्याचे आमंत्रण देतात. त्याशिवाय तिथे शूट करण्यासाठी जवळपास ३०% सबसिडीही मिळते.
‘भारतीय चित्रपटसृष्टी सध्या गोव्याबद्दल आपले प्रेम या कारणामुळे दाखवते की गोव्यात पंचतारांकित हॉटेले खूप आहेत. आपल्या चित्रपट ताऱ्यांना राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेले हवी असतात. गोव्याइतकेच आपल्या आजूबाजूच्या राज्यातील किनारी प्रदेशही सुंदर आहेत. तिथे जर पंचतारांकित हॉटेले आली तर गोव्याला कोणीच विचारणार नाही’, असेही विधानही दिलीप बोरकर यांनी केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार मराठी निर्मात्यांनी गोव्यात शूटिंगसाठी येणे कधीच बंद केले आहे. शेजारचे सिंधुदुर्ग राज्य पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी राणे पिता-पुत्रांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. तिथे चांगल्या सोयी उपलब्ध झाल्या तर मग गोव्यात शूटिंग करण्यासाठी कोणच तयार होणार नाही अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.