
पणजी: कोट्यवधी रुपये खर्च करून गोवा मनोरंजन संस्थेची गेल्या वर्षीचीच टीम यंदाही फ्रान्समध्ये होणाऱ्या ‘कान्स चित्रपट महोत्सवा’त आपली हजेरी लावायला पुन्हा एकदा सज्ज झाली आहे; परंतु त्याचा खरंच गोव्याला उपयोग होतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उद्या, १३ मे रोजी या संस्थेचे पाच सदस्य कान्सला रवाना होत आहेत. २१ मे पर्यंत म्हणजे कान्स चित्रपट महोत्सव समाप्त होईपर्यंत त्यांचा मुक्काम कान्समध्येच असेल. यावर्षी कान्स फिल्म मार्केटमध्ये प्रथमच स्थापन होणाऱ्या गोवा पॅव्हेलियनमध्ये मीटिंग, नेटवर्किंग इव्हेंट्स आणि सादरीकरणाच्या माध्यमातून गोव्याला शूटिंगचे प्रमुख ठिकाण म्हणून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न राहील, असे गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन चंद्रू यांनी सांगितले.
कान्सला जाणाऱ्या या शिष्टमंडळामध्ये गोवा मनोरंजन संस्थेचे कार्यकारी अधिकारी अश्विन चंद्रू, सरव्यवस्थापक मृणाल वाळके, व्यवस्थापकीय अधिकारी प्रवीण प्रभू, सिद्धेश साने आणि अर्जुन नार्वेकर यांचा समावेश आहे.
गोवा मनोरंजन सोसायटीचे प्रतिनिधी ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात गोव्याच्या प्रसिद्धीसाठी जात आहेत. आंतरराष्ट्रीय सिनेमा निर्मिती गोव्यात व्हावी, यादृष्टीने यंदा गोवा मनोरंजन सोसायटीचे शिष्टमंडळ कान्समध्ये प्रयत्न करणार आहेत, असे संस्थेचे कार्यकारी अधिकारी अश्विन चंद्रू यांनी सांगितले. मात्र, गोव्यातील काही लाईन प्रोड्युसर्सशी बोलल्यानंतर त्यांनी गोव्यात होणाऱ्या भारतीय चित्रपट निर्मितीला किती अडथळे येत असतात, याचेच विदारक वर्णन केले.
पंचायत, पोलिस, सुरक्षितता अशा सर्व स्तरांवर त्याला अडचणी येत असतात, असे त्यांचे म्हणणे होते. अशावेळी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मित्यांना गोव्यात शूटिंग करण्यासाठी निमंत्रण देणे, हा कान्सला जाण्याचा गोवा मनोरंजन संस्थेचा हेतू किती पोकळ आहे, हेच दर्शविते.
गेल्या वर्षी गोवा सरकारने कान्स फिल्म फेस्टिवलला शिष्टमंडळ पाठवल्यामुळे गोवा मनोरंजन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना त्या प्रतिष्ठित महोत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि त्यांच्या विविध कार्यपद्धती समजून घेणे शक्य झाले, असा गोवा मनोरंजन सोसायटीचा दावा आहे.
या भेटीमुळे काही किरकोळ फरक वगळता इफ्फीच्या आयोजनाचे मापदंडही कान महोत्सवाइतकेच दर्जेदार आहेत, असा दृष्टावाही गोवा मनोरंजन सोसायटीला झाल्याची माहिती अश्विन चंद्रू यांनी दिली. ‘जागेचा उत्तम वापर’, ‘बॅच कलेक्शन किऑस्क’, ‘पर्यावरण स्नेही सजावटीचा वापर’ या तीन महत्त्वाच्या (?) बाबी शिष्टमंडळाने गेल्या वर्षी कान्समधील महोत्सवात अनुभवून, गेल्या इफ्फी मध्येअमलात आणल्या, असाही अजब दावा त्यांनी केला.
इफ्फी २००४ पासून गोव्यात आल्यानंतर आतापर्यंत गोव्यातला इफ्फीचा प्रवास पाहिल्यास, सुरुवातीची काही वर्षे वगळता दरवर्षी प्रतिनिधींच्या संख्येत घट होताना आणि महोत्सवाचा दर्जा उतरताना दिसते आहे. जरी गोवा मनोरंजन सोसायटी हजारो प्रतिनिधींचा दाखला देत असली तरी त्यात फी भरून प्रतिनिधी होणारे अवघे हजारच आहेत, ही सत्यस्थिती आहे. सुमारे ३ हजार स्वयंसेवकांची नोंदणी तसेच इतर पाहुण्यांची नोंदणी यांचा हिशेब करून हजारो प्रतिनिधी चित्रपट महोत्सवाला हजर होते हे दाखवण्यात येते.
भारतात मामी (मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) आणि केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे दोन महत्त्वाचे महोत्सव दर्जेदारपणे होतात. या दोन्ही महोत्सवांना चित्रपट रसिकांची प्रचंड गर्दी असते. या दोन्ही महोत्सवांना जागतिक स्तरावर प्रतिष्ठा आहे. या दोन्ही महोत्सवांतून खूप काही शिकण्यासारखे असले तरी गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भारतात होणाऱ्या या महोत्सवाला हजेरी लावून काही शिकण्यापेक्षा परदेशातील ‘कान्स’ला हजेरी लावून शिकणे अधिक महत्त्वाचे वाटते.
‘कान्स’ला जाणाऱ्या शिष्टमंडळात यावेळी तब्बल आठ लोकांची निवड करण्यात आली होती. त्यातील काही नावे माहिती खात्यातील मंडळींची होती, तर काही नावे गोवा मनोरंजन संस्थेच्या बाहेरील मंडळींची होती. मात्र, व्हिसा न मिळाल्यामुळे व अन्य काही कारणांमुळे या नावांवर काट मारावी लागली. अशामुळे त्यांच्या खर्चात छोटीसी बचत झाली हा दिलासा. तरीदेखील या मंडळींच्या या वेळच्या या कान्स सफरीचे बजेट एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, असे समजते.
१. एक इफ्फीचे आयोजन सोडल्यास वर्षभर कोणताही कार्यक्रम गोवा मनोरंजन संस्था करू इच्छित नसते. पैशांची अडचण ते कायम सांगत असतात. अशावेळी कान्सची महागडी सफर त्यांना कशी परवडते, हा देखील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे.
२. कान्सला गोव्याचे शिष्टमंडळ पाठवणे, ही गौरवाची बाब असायला हवी होती. त्यासाठी ज्या हेतूने हे शिष्टमंडळ कान्सला जात आहे, तो हेतू सार्वजनिक करणे महत्त्वाचे होते.
३. परंतु कुणालाही वास न लागू देता ज्याप्रकारे गुपचूपपणे हे शिष्टमंडळ कान्सला जायच्या तयारीत आहे त्याचा अर्थ काय लावायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.