पणजी: गोव्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिल २०२६पासून आत्तापर्यंत ३५ हून अधिक तपासणी मोहिमा राबविल्या आहेत. त्यात जप्त केलेले २,३०० किलोग्रॅमपेक्षा जास्त निकृष्ट दर्जाचे अन्न नष्ट केले आहे. तसेच, ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायद्या’चे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांकडून २९.०९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
राज्यभरातील रेस्टॉरंट्स, खानावळी, अन्नप्रक्रिया केंद्रे आणि दुकानांची अचानक तपासणी करण्याची मोहीमही अधिक तीव्र करण्यात आल्याची माहिती एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांनी दिली.
देसाई यांनी सांगितले की, एफडीएच्या पथकांनी सायंकाळी, मध्यरात्री आणि पहाटे अशा विशेष तपासणी मोहिमा राबविल्या. त्यात ३५ हून अधिक ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये लहान खाद्यगाड्या, रस्त्यावरील खाद्यविक्रीची दुकाने, रेस्टॉरंट्स, उत्पादन केंद्रे, केटरर्स, सुपरमार्केट्स आणि इतर दुकानांचा समावेश होता.
जनतेला सुरक्षित अन्न मिळावे यासाठी स्वच्छता तसेच ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायद्या’च्या (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट) इतर नियमांचे पालन केले जात आहे की नाही, हे तपासण्यासाठी ३२५ हून अधिक आस्थापनांची पाहणी करण्यात आली.
विविध नियमांचे पालन न केल्यामुळे बिस्किटे, मिठाई, काजू, पनीर, टोफू, फरसाण, खवा आणि चिकन यांसारखे सुमारे २,३०० किलो अन्नपदार्थ नष्ट करण्यात आले. येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर या तपासणी मोहिमा यापुढेही सुरू ठेवल्या जातील, असे देसाई यांनी सांगितले.
एप्रिल २०२५पासून आत्तापर्यंत ‘कोटपा’ कायद्याच्या तरतुदींनुसार विभागाने ६,६८,३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. २०२५-२६ या कालावधीत आणि आतापर्यंत, निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे एकूण ३६ प्रकरणे (ॲडजेस्टिंग केसेस) दाखल करण्यात आली आहेत. निकाली काढलेल्या १८ प्रकरणांमध्ये दोषींवर एकूण १०,४५,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
- श्वेता देसाई, संचालक, एफडीए
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.