पणजी: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तसेच अबकारी विभागासह मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाने बनावट नियुक्तिपत्रे तयार करत एकाच कुटुंबाला तब्बल ५२ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी दोन गुन्हे नोंद झालेल्या अजित शंखवाळकर याचा एका पोलिस अधीक्षकासोबतचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने पोलिस खात्यातीलच बड्या अधिकाऱ्यांचा शंखवाळकर याच्यावर वरदहस्त होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शंखवाळकर याने पर्वरी येथील निवृत्त सैनिक अनिल तळेकर आणि त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तळेकर यांचा मुलगा मनोज याच्यासाठी अबकारी आयुक्तांच्या नावाने बनावट आदेशपत्र तयार करून मनोजकडून २७ लाख रुपये घेतले.
मनोजने नियुक्तिपत्र खरे असल्याचे समजून अबकारी आयुक्तांच्या कार्यालयात रुजू होण्यासाठी गेला. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी पत्राची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर साहाय्यक अबकारी आयुक्त संकेत साखरदांडे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी शंखवाळकरविरोधात दोन एफआयआर नोंदवले.
दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री
अबकारी खात्यातील तोतया आयुक्त प्रकरणात गुंतलेल्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण पोलिसांना दिले आहेत. संबंधित व्यक्ती कोणासोबत फिरत होती, कुठे जात होती, याची माहिती घेऊन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.