पणजी: गोवा विधानसभेच्या आठव्या अधिवेशनाचे दोन दिवसांसाठी आयोजन केल्याच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप सरकार लोकशाही मूल्यांची पायमल्ली करत असल्याचा आरोपही विरोधी पक्षांकडून करण्यात आला.
आठव्या विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन हे केवळ लोकशाहीची थट्टा असून भाजप सरकारला जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची भीती वाटते. त्यामुळेच त्यांनी हे अधिवेशन एवढ्या कमी कालावधीत आटोपण्याचा निर्णय घेतला, असा घणाघात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
आलेमाव म्हणाले की, ''भाजप (BJP) सरकारचा हा निर्णय लोकशाही प्रक्रियेला कमकुवत करण्याचा स्पष्ट पुरावा आहे. त्यांनी विरोधकांच्या हक्कांवर गदा आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधाऱ्यांनी लोकहितासाठी ठोस चर्चा करण्याऐवजी विषय बाजूला सारत एकतर्फी धोरण राबवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजप सरकारच्या या निर्णयाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. विधानसभेचा अर्थ केवळ चर्चा करण्यापुरता नाही, तर लोकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ती एक महत्त्वाची पायरी आहे. मात्र, भाजपला याचा पुरता विसर पडला आहे.''
''नोकर भरतीवरुन सुरु असलेला वाद, सिद्दीकी प्रकरण, 'स्मार्ट सिटी' प्रकल्प, पर्यटनातील घसरण अशा राज्याला भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन अपुरे आहे. या सर्व महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणे आवश्यक आहे,’’ असेही ते पुढे म्हणाले.
‘‘भाजपचा स्वत:वरचा विश्वास उडाला असून जनतेचाही त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे, हेही त्यांना ठाऊक आहे. यामुळे ते गोंधळलेले आहेत. त्यांनी म्हादई कर्नाटकला कशी विकली आणि भ्रष्टाचारातून संपत्ती कशी जमवली हे गोमंतकीय विसरलेले नाहीत. आम्ही त्यांना या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करु देणार नाही,’’ असे म्हणत आलेमाव यांनी जोरदार हल्लाबोल केला.
बेरोजगारी, महागाई (Inflation), पायाभूत सुविधांची कमतरता यांसारख्या मुद्द्यांवर योग्य तोडगा काढण्यास भाजप सरकार अपयशी ठरत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवून जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा केली जावी अशीही मागणी देखील त्यांनी केली आहे. भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी निर्णयांविरोधात विरोधी पक्ष आपला संघर्ष सुरु ठेवणार असल्याचे देखील आलेमाव यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. गोमंतकीयांच्या आवाजाला बुलंद करण्यासाठी आम्ही नेहमीच उभे राहू असेही त्यांनी शेवटी स्पष्टपणे म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.