Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: ड्रग्स प्रकरणातून डुडू सुटला, पोलिस अडकले; तपासकामाची लक्तरे चव्हाट्यावर

न्यायालयाचा आदेश: 7 पोलिसांविरुद्ध आरोप निश्‍चित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs Case ड्रग्सप्रकरणी खोटी तक्रार दाखल करून सतावणूक करणाऱ्या गोवा पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) तपासकामाची लक्तरे जिल्हा व सत्र न्यायालयाने चव्हाट्यावर आणली आहेत.

या कक्षाच्या अधिकाऱ्यांनी इस्रायली नागरिक डेव्हिड ड्रिहम ऊर्फ डुडू याला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक करून गुन्हा दाखल केला होता, त्यातून अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याला आरोपमुक्त करत सात पोलिसांविरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश जारी केला आहे.

डुडू याच्याविरुद्धचा गुन्हा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या ड्रग्सप्रकरणी 13 वर्षांपूर्वी राज्यात पोलिस व ड्रग्स दलाल यांच्यातील लागेबांधेप्रकरणामुळे मोठी खळबळ माजली होती.

सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चितीचा आदेश दिला असून त्यामध्ये तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नरेश म्हामल तसेच सध्या पोलिस सेवेत असलेले पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल इर्मिया गुर्रैया, समीर वारखंडकर, महादेव नाईक, नागेश पार्सेकर, महाबळेश्‍वर सावंत या सात पोलिसांचा समावेश आहे.

या सर्वांविरुद्ध ड्रग्स प्रतिबंधक कायद्याखाली, धमकी व कटकारस्थानाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी हा आदेश दिला आहे.

अंमलीपदार्थविरोधी कक्षामध्ये २०१० साली असलेल्या उपनिरीक्षक सुनील गुडलर याने डुडू याच्याविरुद्ध ड्रग्स बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली होती.

त्याच्याकडून विविध प्रकारचा ड्रग्स मोठ्या प्रमाणात जप्त केला होता. त्यावेळी संशयित डुडू याने पोलिसांनी खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा केला होता. ड्रग्स प्रकरणाशी पोलिसांचेही संबंध असल्याचे उघड केल्याने सुनील कवठणकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणात पोलिसांचाही समावेश असल्याने हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी विनंती केली होती. उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देण्यात आले होते.

गोवा पोलिसांकडून हे ड्रग्स प्रकरण सीबीआयने स्वीकारल्यानंतर त्याची नव्याने चौकशी सुरू केली होती. सीबीआयने संशयित डुडू याच्याविरुद्ध आरोपपत्र सादर केल्यानंतर पुढे चौकशी सुरू ठेवताना ही पोलिसांनी दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे सीबीआयने पुरवणी आरोपपत्र सादर करून संशयित डुडू याच्या अटकेसाठी जबाबदार असलेल्या सर्व पोलिसांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने डुडू याच्याविरुद्ध आरोप निश्‍चित करण्याचा आदेश देताना न्यायालयाने पुरवणी आरोपपत्राची दखल घेतली नसल्याचे सीबीआयने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

संशयित डुडू याच्या वकिलांनी त्याच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा दावा केला होता. अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने २१ फेब्रुवारी २०१० रोजी मध्यरात्री ११.३५ वाजता हणजूण येथील सेंट अँथनी चॅपेलजवळ छापा टाकला होता. या छाप्यावेळी त्याला एका हॉटेलातून ताब्यात घेतले होते.

त्यावेळी त्याच्यासोबत त्याची प्रेयसी होती. ही कारवाई तत्कालीन कक्षाचे अधीक्षक वेणू बन्सल यांच्या निर्देशानुसार झाली होती. या कारवाईवेळी त्याच्याकडून २ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचे ४.४ ग्रॅम हेरॉईन, ५.३४ ग्रॅम कोकेन, ४.३१ ग्रॅम लिक्विड एलएसडी, १.१६ किलो चरस तसेच रोख रक्कम ५ हजार जप्त करण्यात आले होते.

या प्रकरणी एएनसीने अमलीपदार्थविरोधी कायद्याचे कलम २० (बी) (ii) (सी), २१ (ए) (बी) आणि २२ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून डुडूला अटक केली होती.

राजकारणी - पोलिस यांच्यात झाले होते आरोप - प्रत्यारोप

राज्यातील ड्रग्ज दलाल म्हणून नावारूपास असलेल्या डुडूच्या अटकेनंतर राज्यात बरीच खळबळ माजली होती. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असता काही पोलिस अधिकाऱ्यांसह काही मंत्र्यांच्या नातेवाइकांचा नावे समोर आली होती.

त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. या प्रकरणावरून राजकारणी व पोलिस यांच्यात आरोप - प्रत्यारोपही झाले होते. संशयित डुडू याच्याशी एका ज्येष्ठ राजकारण्याच्या मुलाचा संबंध आहे असा निष्कर्षही काढण्यात आला होता.

न्यायालयाचे निरीक्षण...

  • या प्रकरणातील तपास अधिकारी असलेले सुनील गुडलर यांनी पंचनामा नोंद करताना नमूद केलेल्या वेळांमध्ये बरीच तफावत आहे.

  • पंचनामा नोंद करून झाल्यानंतर दोन पंचांना सह्या करण्यासाठी त्याने बोलावून आणले होते व त्यांना या कारवाईची काहीच माहिती नसल्याचे सीबीआयला दिलेल्या जबान्यांत साक्षीदारांनी सांगितले आहे.

  • संशयित डुडू याला मध्यरात्रीच अंमलीपदार्थविरोधी कक्षात आणण्यात आले होते व पहाटे पंचनामा घटनास्थळी संपल्याचे दाखवण्यात आले आहे.

  • जेव्हा डुडूला ताब्यात घेण्यात आले, तेव्हा त्याच्याकडे ड्रग्ज सापडले नव्हते हे सीबीआयने केलेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हा ड्रग्स पोलिसांनी संशयिताकडे सापडल्याचे दाखवून गुन्हा दाखल केला आहे.

  • डुडू याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध होत नाहीत, त्यामुळे हा ड्रग्स पोलिसांनीच आणल्याने त्यांच्याविरुद्ध आरोप निश्‍चित करण्यात येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT