Goa Assembly 2023: दिवसभराचे निलंबन, सभात्याग आणि अशोक स्तंभाजवळ ठिय्या; मणिपूर मुद्द्यावर विरोधक आक्रमक
Goa Assembly Monsoon Session: मणिपुरातील हिंसाचारावर चर्चा करावी यासाठी आंदोलन करून दिवसभराचे निलंबन ओढवून घेऊनही विरोधी आमदारांनी तो विषय हातून सोडलेला नाही. त्यांनी आज त्या विषयावर चर्चा करावी यासाठी जोरदार प्रयत्न केले.
सुरवातीला त्यांनी सभापतींना विनंती केली, ती मान्य केली नाही म्हणून सभापतींसमोरील हौदात धाव घेतली. तरीही दाद घेतली नसल्याने अखेरीस त्यांनी सभात्यागाचे शस्त्र उगारले.
त्यानंतर विरोधकांनी विधानसभा संकुलाबाहेरील अशोक स्तंभाजवळ बसून ठिय्या आंदोलन करत लक्ष वेधून घेतले.
मणिपूर हिंसाचारासंदर्भातील खासगी ठराव कामकाजात दाखल करून घ्यावा ही मागणी अव्हेरल्याने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार क्रुझ सिल्वा, व्हेंझी व्हिएगस, आल्टन डिकॉस्ता आणि वीरेश बोरकर यांनी विधानसभा संकुलात असलेल्या अशोक स्तंभाजवळ बसकण मारून सत्याग्रह केला.
विधानसभेत विरोधकांकडून या चर्चेची जोरदार मागणी करण्यात आली. सभापतींच्या आसनासमोर त्यांनी दोन वेळा धाव घेतली. त्यावेळी आमदार विजय सरदेसाई त्यांच्यासोबत होते.
या साऱ्याची सुरवात विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हाच झाली. आमदार विजय सरदेसाई वगळता विरोधी आमदार काळे कपडे परिधान करून आले होते. त्यामुळे ते काहीतरी कृती करतील याची कल्पना येत होती. सभापती आसनाधिस्थ झाल्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मणिपुरातील हिंसाचारावर चर्चेची मागणी केली.
ते म्हणाले, विधिमंडळ कामकाज नियम ११५ नुसार मी ही मागणी करत आहे. सभापतींनी आज हा विषय घेता येऊ शकतो असे पूर्वी सांगितल्याने चर्चेची मागणी करत आहे.
यावेळी आमदार आल्टन डिकॉस्ता, व्हेंझी व्हिएगस, वीरेश बोरकर, क्रुझ सिल्वा हे उभे राहून आलेमाव यांच्या म्हणण्याचे समर्थन करत होते. आमदार विजय सरदेसाई यांनीही चर्चा का व्हावी हे सांगण्याचा प्रयत्न याच दरम्यान चालवला होता.
सभापतींनी विरोधकांकडून चर्चेची मागणी सुरू असतानाच प्रश्न क्र. एक पुकारला. तो क्रुझ सिल्वा यांचा होता. ते चर्चेची मागणी करत होते. सभापतींनी मणिपूरच्या चर्चेचा विषय खासगी कामकाज सुरू होण्यापूर्वी उपस्थित करावा.
तूर्त प्रश्नोत्तराचा तास होऊ द्या, असे सांगून विरोधी आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. सिल्वा हे चर्चा व्हावी यावर ठाम राहिल्याने सभापतींनी क्र. दोनचा प्रश्न विचारावा असे जाहीर केले. तो प्रश्न विचारण्यासाठी दिगंबर कामत उभे राहिले, पण सिल्वा यांनी प्रश्न विचारण्याची तयारी दर्शवून प्रश्नही पुकारला. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास सुरळीत झाला.
शून्य तास सुरू होण्याआधी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मणिपूरचा विषय पुन्हा काढला. त्यावेळी शून्य तास झाल्यानंतर खासगी कामकाजावेळी पाहू असे सभापतींनी सांगितल्याने शून्य तासाचे कामकाजही झाले.
ते संपल्यावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे निवेदनही झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून पटलावर कागदपत्रे सादर झाली. त्यानंतर युरी आलेमाव यांनी पुन्हा चर्चेचा आग्रह धरला. त्यावेळी सभापतींनी याबाबतीत आपला निर्णय ऐका असे सांगितले. विरोधी आमदार ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.
त्यांनी चर्चा हवीच अशी मागणी जोरदारपणे करत आपल्या जागा सोडल्या. आलेमाव यांच्यासह आल्टन डिकॉस्ता, विजय सरदेसाई, व्हेझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, वीरेश बोरकर यांनी सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली.
त्याचवेळी या विषयाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे, केंद्रीय गृह मंत्रालय हा विषय हाताळत असल्याने ठरावाची गरज नाही, तो फेटाळावा असे निवेदन करणे मुख्यमंत्र्यांनी सुरू केले. विरोधकांकडून मणिपूरसारखी स्थिती गोव्यातही होऊ शकते असे त्यावेळी सांगण्यात येऊ लागले.
विरोधकांनी घेतली हौदात धाव...
मणिपूरातील हिंसाचारावर विधानसभेत चर्चा करावी. त्याविषयीचा खासगी ठराव का दाखल करून घेतला नाही अशी विचारणा करत आज विरोधी आमदारांनी पुन्हा सभापतींसमोरील हौदात धाव घेतली.
क्रुझ सिल्वा यांचा खासगी ठराव फेटाळल्याचे त्याच गदारोळात सभापती रमेश तवडकर यांनी जाहीर केले, तरीही विरोधक हटण्याचे नाव घेत नव्हते. त्यामुळे सभापतींनी भोजनाची सुट्टी जाहीर करत कामकाज तहकूब केले.
अपेक्षाभंगामुळे आंदोलनाचा पवित्रा
क्रुझ सिल्वा यांचा खासगी ठराव स्वीकारला जाईल, अशी विरोधी आमदारांना अपेक्षा होती. याआधी त्यांनी चर्चेची मागणी केली होती, तेव्हा शुक्रवारी विषय मांडता येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. तसे न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
सरदेसाईंनी बजावली विरोधकाची भूमिका
विरोधी आमदारांनी सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली तेव्हा आमदार विजय सरदेसाई विरोधकांसमवेत होते. विरोधी आमदारांनी सभात्याग केला त्यात मात्र ते सहभागी झाले नाहीत. त्यांनी एकट्यांनी नंतर विरोधी आमदारांची भूमिका बजावली.
अशोक स्तंभाखाली धरणे
खासगी सभासद ठरावाला परवानगी नाकारणे हे अन्यायकारक आहे. यासाठी आम्ही आज सभागृह सुरू होताच तशी विनंती सभापतींकडे केली होती. मात्र, त्यांनी ती नाकारली. पुन्हा आम्ही शून्य प्रहरावेळीही हा मुद्दा उपस्थित केला, पण त्यावेळीही आम्हाला परवानगी नाकारण्यात आली आणि आताही तेच झाले म्हणून आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकून अशोक स्तंभाखाली न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करत आहोत, असे विरोधी पक्षनेते आलेमाव म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.