Panaji Municipal Election: उत्‍पल मांडताहेत पणजीच्‍या व्‍यथा! ‘आमी पणजेकार’चा घरोघरी प्रचार; सत्ताबदलाचा निर्धार

Utpal Parrikar: पणजी (मनपा) निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्‍पल पर्रीकर यांनी स्वतःचे पॅनल उभे करत प्रचाराची धुरा हाती घेतली आहे.
Utpal Parrikar | Panaji Municipal Election
Utpal Parrikar | Panaji Municipal ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : येत्या ११ मार्च रोजी होणाऱ्या पणजी महानगरपालिका (मनपा) निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्‍पल पर्रीकर यांनी स्वतःचे पॅनल उभे करत प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. ‘आमी पणजेकार’ या स्वतंत्र पॅनलच्या उमेदवारांसाठी ते सध्या पणजीत घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

राजधानीतील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचत उत्‍पल यांनी शहरातील विविध प्रश्‍‍न आणि विकासाचा मुद्दा लोकांसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेत अनेक वर्षे प्रभाव असलेल्या एका कुटुंबाच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा त्यांचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो.

गेल्या अनेक वर्षांपासून पणजीची आमदारकी भाजपकडे आणि मनपा बाबूश मोन्सेरात यांच्या गटाकडे, असा एक अलिखित समन्वय साधला गेल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यानुसार मनोहर पर्रीकर यांनी पणजीची आमदारकी स्वतःकडे ठेवत मनपाचा कारभार बाबूश मोन्सेरात यांच्याकडे दिला असे बोलले जाते.

पर्रीकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उत्‍पल पर्रीकर यांना उमेदवारी न देता सिद्धार्थ कुंकळयेकर यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत प्रथमच पणजीचे आमदारपद भूषवले. काही आठवड्यांतच त्यांनी इतर दहा आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

काही ठळक मुद्दे

यंदाची निवडणूक दोन पॅनलमध्ये होत आहे. २१ ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. महत्त्वाच्या लढतींमध्ये रोहित मोन्सेरात, उदय मडकईकर, बेंतो लॉरेन, सुरेंद्र फुर्तादो, प्रसाद आमोणकर, दीक्षा माईणकर, शुभम चोडणकर, करण पारेख, वर्षा शेट्ये आणि रुपेश हळर्णकर यांचा समावेश आहे.

माजी उपमहापौर संजीव नाईक तसेच संतोष सुर्लकर, नीलेश मोरजकर, नेल्सन काब्राल या माजी नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यांच्या हालचालींवर दोन्ही गटांचे बारीक लक्ष आहे.

सत्ताधारी गटातून पुन्हा उमेदवारी मिळालेल्यांपैकी कितीजण विजयी होतात, याबाबत उत्सुकता आहे. काही उमेदवारांनी आश्‍‍वासने दिली असली, तरी मतदार आता अधिक सजग झाले आहेत. केवळ रस्त्यांवर डांबर टाकल्याने मते मिळतील अशी स्थिती राहिलेली नाही, असे उमेदवारही मान्य करत आहेत.

मनपा ताब्यात घेण्यासाठी शिकस्‍त

यंदाच्या निवडणुकीत महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्याच्या उद्देशाने उत्‍पल पर्रीकर यांनी भाजप आणि बाबूश समर्थक पॅनलविरोधात ‘आमी पणजेकार’ नावाचे स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. आपल्या पॅनलमधील अधिकाधिक उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी ते कठोर परिश्रम घेत आहेत. मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.

Utpal Parrikar | Panaji Municipal Election
Panaji Election: पणजीच्या समस्या सोडवण्यात महापौर, आमदार अकार्यक्षम! पर्रीकरांचे टीकास्त्र; आवश्‍यक कामे न झाल्याचा दावा

तळागाळात संपर्कावर भर

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पणजीत मनोहर पर्रीकर यांचा तळागाळातील घटकापर्यंत मजबूत संपर्क होता. त्याच परंपरेचा आधार घेत उत्‍पल यांनी घरोघरी भेटी देण्यास सुरुवात केली आहे. आमदार असतानाही बाबूश मोन्सेरात राजधानीचा अपेक्षित विकास करण्यात कसे अपयशी ठरले, तसेच मनपात आपले पॅनल सत्तेत आल्यास कोणत्या पद्धतीने विकास साधता जाईल, याचे विवेचन ते मतदारांसमोर करत आहेत. शिवाय भाजपसोबतच्या राजकीय घडामोडींविषयीची आपली भूमिका आणि व्यथा देखील ते स्पष्टपणे मांडत आहेत. या संवाद मोहिमेमुळे पणजीतील नागरिकांकडून त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Utpal Parrikar | Panaji Municipal Election
Panaji Municipal Election: तीस जागांसाठी 69 उमेदवार, महापालिका निवडणुकीत आठ जणांनी घेतली माघार; 'या' उमेदवारांचे अर्ज मागे

२०२२ नंतर वाढले राजकीय द्वंद्व

२०२२च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उत्‍पल यांनाच उमेदवारी मिळेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र पक्षाने बाबूश मोन्सेरात यांच्यावर विश्‍‍वास ठेवत त्यांनाच तिकीट दिले. त्‍यामुळे निराश झालेले उत्‍पल पर्रीकर यांनी भाजपपासून फारकत घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. परंतु त्यांना अल्प मतांनी पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून उत्‍पल आणि बाबूश यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक स्पष्टपणे दिसू लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com