Naraksura  Dainik Gomantak
गोवा

आपल्या सुंदर, ‘सोबीत’ गोव्याला प्रदूषणरहित ठेवणे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे

Goa News: गोव्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या प्रतिमा जाळण्यासाठी फटाके आणि इतर दारूकामासहित भरपूर सामग्री सांगाड्यात भरली जाते. मोठ्या प्रमाणावर जाळ झाल्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते. यामुळे वातावरणातील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या बिघडते आणि अनेक वायूप्रदूषकांमध्ये वाढ नोंदवली जाते असे वैज्ञानिकांचे मत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Narakasura Celebrations in Goa Lead to Environmental Concerns

डॉ. संगीता साेनक

नुकत्याच झालेल्या नरकचतुर्दशीच्या दिवशी गोव्यातील बहुतेक ठिकाणी मोठमोठ्या नरकासुराच्या प्रतिमा उभारून दिवाळी साजरी करण्यात आली. समोर कानठळ्या बसवणारे मोठ्या आवाजातील संगीत. जवळच्या घरांतील अनेक वयस्कर माणसांना याचा खूप त्रास झाला. लोकांनी पोलिसांना अनेक तक्रारीही केल्या. पण कुणालाच न जुमानता हे मोठ्या आवाजातील संगीत, नाच आणि दारू पिणे चालूच होते. अनेक ठिकाणी अगदी सकाळी सात-आठ वाजेपर्यंत. त्यानंतरच नरकासुर दहन करण्यात आले. ही गोव्यातील आजकालची दिवाळी.

दिवाळी हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. सामान्यतः धनत्रयोदशीपासून सुरू होणारी दिवाळी बहुतेक ठिकाणी पाच दिवस साजरी केली जाते. काही ठिकाणी ही सुरुवात वसूबारसपासून होते. पण वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी वेगवेगळ्या कारणांनी साजरी केली जाते. भारताबाहेरही अनेक ठिकाणी हा सण साजरा केला जातो. तसेच हिंदू धर्माप्रमाणे हा सण जैन, बौद्ध आणि शीख धर्मातही वेगळ्या कारणांनी साजरा केला जातो.

उत्तर भारतात बहुतेक ठिकाणी दिवाळी सीता, राम, आणि लक्ष्मण यांच्या अयोध्येत पुनरागमनाचा दिवस म्हणून साजरी केली जाते. धनत्रयोदशीला म्हणजे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी दिवाळीची सुरुवात होते. या दिवशी काही ठिकाणी कुबेराची, तर काही ठिकाणी धन्वंतरीची पूजा केली जाते. आख्यायिकेप्रमाणे देव दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी प्रकट झाला.

तर कार्तिक अमावास्येला लक्ष्मी प्रकट झाली. त्यामुळे त्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. उत्तर भारतात बलिप्रतिपदेच्या दिवशी कृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला म्हणून गोवर्धन पूजा अर्थात बैलांची पूजा केली जाते, तर दक्षिण भारतात हा दिवस वामनअवतारातील विष्णूने पाताळात पाठवलेला बळीराजा पृथ्वीवर परत येतो म्हणून साजरा केला जातो. दिवाळीची सांगता बहीण भावाचे प्रेम साजरे करणाऱ्या यमद्वितीयेने म्हणजे भाऊबिजेने होते.

गोव्यात नरकचतुर्दशी हा दिवाळीचा मुख्य दिवस मानला जातो. पहाटे श्रीकृष्णाकडून नरकासुरदहन झाल्यानंतर अभ्यंगस्नान व्हायचे. घरातील बायकांकडून पुरुषमंडळी आणि मुले यांचे औक्षण केले जायचे. नरकासुर वधाचे प्रतीक म्हणून गोडधोड खायच्या आधी कडू कारीट पायांनी फोडून जिभेला लावले जायचे.

या दिवशी आपल्या गोव्यात अनेक प्रकारचे पोहे केले जातात. फोडणीचे बटाटपोहे, गूळपोहे, कालवलेले पोहे, दुधातील पोहे, दही-ताकातील पोहे, नारळाच्या दुधात केलेले पोहे इत्यादी. आंबाड्याची करम आणि वाटण्याची उसळ हे खास दिवाळीसाठी केलेले प्रकार. या दिवशी वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करण्यासाठी एकमेकांच्या घरी जायची पद्धत आहे. पण आजकाल दिवाळीच्या पूर्वसंध्येला चालणारे मोठ्या आवाजातील संगीत आणि नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिमा यांनाच जास्त महत्त्व दिले जाते. दिवाळीच्या दिवसांत फटाके आणि दारूकाम यालाच प्राधान्य दिले जाते. ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरण प्रदूषण याचा विचारही केला जात नाही.

भारतात फटाक्यांचा उपयोग सामान्य युगपूर्व कालीन केला जात होता असे भारतात काहींचे म्हणणे असले तरी जगातील बहुतेक इतिहासकार मानतात की फटाक्यांचा शोध चीनमध्ये लागला होता. चीनमध्ये बांबूचे फटाके सामान्य युगपूर्व २०० वर्षांपासून वापरले जायचे असे मानले जाते. सामान्य युगाच्या नवव्या शतकात चिनी शास्त्रज्ञांनी सॉल्टपीटर (पोटॅशियम नायट्रेट), गंधक आणि कोळसा एकत्र करून एक गनपावडर तयार केला होता असे मानले जाते.

फटाक्यांच्या उपयोगाचा सर्वांत जुना पुरावा चीनमधील दहाव्या शतकातील सॉन्ग राजवंशातून आला आहे असे मानले जाते. चीनमधून फटाके आणि दारूकाम तेराव्या शतकाच्या अखेरीस युरोपमध्ये गेले. काही लोक मानतात की मार्को पोलो ह्यांनी १२९५मध्ये फटाके बनवायचे तंत्रज्ञान चीनमधून इटलीत नेले आणि तेथून युरोपमध्ये पसरले. तर इतर काहींचे मानणे आहे की हे ज्ञान मिशनरि धर्मप्रसारकांबरोबर युरोपमध्ये गेले.

फटाके लवकरच आशिया आणि युरोपमध्ये लोकप्रिय झाले. भारतात फटाक्यांचा वापर सर्वप्रथम १४४३मध्ये देवरायाच्या (दुसरा) कारकिर्दीत विजयनगर दरबारातील राजदूत अब्दुर रज्जाक यांनी महानवमी उत्सवात केला होता, असे म्हणतात. भारतात दिवाळीच्या सणात फटाके फोडण्याची परंपरा मुघलांनी रुजवली असे काही विद्वान मानतात. ‘जश्न-ए-चिराग’ म्हणजेच दीपोत्सव साजरा करणे अकबराच्या व्यापक धार्मिक धोरणाचा एक भाग होता असे इतिहासकार मानतात. सतराव्या शतकात मात्र औरंगजेबाने आतषबाजीवर निर्बंध घातले. भारतातील दारूकामाचा पहिला कारखाना १९व्या शतकात कोलकाता येथे तर दुसरा तमिळनाडू राज्यातील शिवकाशी येथे आला.

गोव्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या प्रतिमा जाळण्यासाठी फटाके आणि इतर दारूकामासहित भरपूर सामग्री सांगाड्यात भरली जाते. मोठ्या प्रमाणावर जाळ झाल्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते. यामुळे वातावरणातील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या बिघडते आणि अनेक वायूप्रदूषकांमध्ये वाढ नोंदवली जाते असे वैज्ञानिकांचे मत आहे.

फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे बहुआयामी आहे. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, माती आणि पाणी प्रदूषण होते. संशोधकांनी फटाक्यांशी संबंधित प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल धोक्याची सूचना दिली आहे.

हवेतील प्रदूषके श्वसनाच्या समस्या आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकारांना कारणीभूत ठरतात. तसेच ध्वनिप्रदूषणाचाही वाईट परिणाम आरोग्यावर होतो, खास करून लहान बाळे, वयस्क आणि हृदयविकाराच्या रुग्णांना.

फटाक्यांपासून होणारे वायू प्रदूषण विशेषतः सूक्ष्म कण फुफ्फुसात आणि रक्तप्रवाहात खोलवर प्रवेश करू शकतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे श्रवणशक्तीवर परिणाम होतो, तणावाची पातळी वाढते आणि वन्यजिवांना त्रास होतो. याव्यतिरिक्त, फटाक्यांचे अवशेष माती आणि जलस्रोत दूषित करू शकतात. यामुळे वनस्पती आणि प्राणी जीवनावर परिणाम होऊ शकतो.

फटाक्याने होणारे प्रदूषण कमी करणे आपल्या हातात आहे. आपल्या सुंदर, ‘सोबीत’ गोव्याला प्रदूषणरहित ठेवणे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आपली भारतीय संस्कृती निसर्गप्रेम रुजवते. ती पर्यावरणपूरक आहे. निसर्गातील घटकांचा, नैसर्गिक संसाधनांचा आदर करणारी आहे. आतषबाजी आपली संस्कृती नाही.

पर्यावरणपूरक पर्याय निवडून ही आयात केलेली पर्यावरण आणि आरोग्याला हानिकारक संस्कृती आपण वेळीच दूर केली पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: विदेशी पर्यटकांची गोव्‍याऐवजी श्रीलंकेला पसंती! वाढीव व्‍हिसा शुल्‍काचा परिणाम; रशियन पर्यटकांचे मात्र प्राधान्‍य

Bhandari Community In Goa: निवडून आल्यानंतर 'जैसे थे' आदेश! भंडारी समाजाच्या निवडणूक प्रक्रियेत नाट्यमय वळण

Goa Crime: कॉन्‍स्‍टेबल आत्‍महत्‍या प्रकरण! ‘त्या’ दोन महिला पोलिसांना अटक; प्रेमप्रकरणावरुन सतावणूकीचे सापडले 'कॉल्स'

Rashi Bhavishya 05 November 2024: व्यवसायात प्रगती कराल, मेहनतीला यश मिळले; जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Cash For Job प्रकरणातील तिघीही अटकेत! आत्‍महत्‍या प्रकरणी पूजावर गुन्‍हा; आणखी एक नवी तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT