Goa News: तातोडी-धारबांदोडा गावात बिबट्याची दहशत वाढली आहे. येथील लक्ष्मण नारायण कोलेकर यांच्या झोपडीजवळ रात्रीच्या वेळी त्याचा मुक्त संचार असतो. गेल्या महिनाभरात बिबट्याने 6 बकऱ्या फस्त केल्या असून, गुरांनाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे या गावातील लोक भीतीच्या वातावरणात दिवस काढत आहेत.
लक्ष्मण कोलेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या घराच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबटा येत आहे. गेल्या महिनाभरात त्याने एकूण ६ बकऱ्या फस्त केल्या असून एका वासरावर हल्ला करून त्याच्या कानाचा चावा घेऊन जखमी केले आहे. तसेच अन्य गुरांनाही त्याने आपले लक्ष्य बनविले आहे.
तातोडी गावातील लोकवस्तीपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर जंगल भागात झोपडीत राहणारे कोलेकर कुटुंब बिबट्याच्या दहशतीमुळे भयभीत झालेले आहे. या परिसरात धुमाकूळ घालणारा हा बिबटा दर चार दिवसांनी रात्रीच्या वेळी बकऱ्याची शिकार करण्यासाठी येतो आणि लक्ष्य साधतो. याबाबत वन खात्याला कळविणार असल्याचे कोलेकर यांनी सांगितले.
लक्ष्मण कोलेकर, शेतकरी-
दोन महिन्यांपूर्वी धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील शेटीमळ-धारबांदोडा येथील एका गोठ्यात घुसून बिबट्याने वासराचा फडशा पाडला होता. रात्री-बेरात्री बिबटा कधीही गावात येतो आणि पाळीव प्राण्यांची शिकार करतो. बिबटा आल्याने अन्य म्हशी जेव्हा ओरडायला लागतात तेव्हा जाग येते. परंतु तोपर्यंत बिबट्याने आपली शिकार जंगलात पळविलेली असते. अशा प्रकारामुळे आमचा दूधव्यवसाय धोक्यात आला आहे. वन खात्याने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.