Goa Cricket Association election 2025 Result
पणजी: प्रतिष्ठेच्या बनलेल्या गोवा क्रिकेट असोसिएशन निवडणुकीत चेतन देसाई विनोद (बाळू) फडके गटाने सहाही जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवत, निर्विवाद वर्चस्व 'प्रस्थापित' केले आहे. 'बीसीसीआय'चे संयुक्त सचिव रोहन गावस देसाई यांचे समर्थन लाभलेल्या 'परिवर्तन' गटाचा धुव्वा उडाला आहे.
रोहन गांवस देसाई पुरस्कृत 'परिवर्तन' गटाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पाठिंबा मानला जात होता. परिणामी विरोधात गेलेला निकाल रोहन देसाई यांना मोठा धक्का ठरणार आहे. मावळत्या समितीमधील (विद्यमान परिवर्तन गट) रुपेश नाईक, दया पाणी यांच्यासह माजी सभापती राजेश पाटणेकर यांनाही पराभवाची चव चाखावी लागली आहे.
व्यवस्थापकीय समितीच्या एकूण सहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक प्रक्रिया दुपारपर्यंत चालली. बहुसंख्य क्लबांनी मतदानाचा हक्क बजावला. पर्वरी येथील 'जीसीएस'च्या कार्यालयात निकालाला सुरवात होताच चेतन देसाई विनोद (बाळू) फडके गटामध्ये चैतन्य संचारले.
एकामागोमाग निकाल त्यांच्या बाजूने होत गेले. दरम्यान, चेतन- विनोद गटाचे सदस्य तथा माजी रणजीपटू महेश देसाई हे अध्यक्ष होतील.
क्लबांचा आम्हाला पाठिंबा राहिल, हा विश्वास सार्थ ठरला. गोव्यातील क्रिकेटच्या हितासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. - चेतन देसाई, चेतन-बाळू गटाचे प्रवर्तक
गोव्यातील क्रिकेटमध्ये मागील सुमारे तीन दशकांपासून सक्रिय असलेले गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये (जीसीए) माजी अध्यक्ष चेतन देसाई व विनोद (बाळू) फडके यांना प्रस्थापित मानलं जातं. यावेळच्या निवडणुकीत ते स्वतः नसले, तरी त्यांचा गट होता.
त्यांना तीन वर्षांपूर्वी जीसीएत पदार्पण केलेल्या रोहन गावस देसाई यांचा पाठिंबा असलेला ‘परिवर्तन’ गट आव्हान देत होतं. मात्र, त्याचं हे आवाहन चेतन-बाळू यांच्या गटासमोर फिकं पडलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.