Amit Patkar : काँग्रेस नेते मायकल लोबोंच्या दिल्लीवारीची गोव्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांची लोबोंनी भेट घेतल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरीही लोबोंनी मात्र या सर्व गोष्टी निव्वळ अफवा असल्याचं सांगत आपण काँग्रेसच्या रॅलीसाठी दिल्लीत गेल्याचं सांगितलं आहे. आता गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही लोबोंवर निशाणा साधला आहे.
आपण मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. ज्यावर 11 किंवा 12 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे लोबो सध्या काय करतात याची आपल्याला माहिती नाही, अशा शब्दात पाटकरांनी लोबोंचा समाचार घेतला. तसंच काँग्रेसच्या रॅलीतही लोबो न दिसल्याने गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी शरसंधान साधलं आहे.
गोव्यातील काँग्रेस नेते आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो गोव्यात परतले आहेत. दिल्लीवरून गोव्यात दाखल झालेल्या लोबोंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा सध्या गोव्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र लोबोंनी अशा कोणत्याही भेटीची शक्यता फेटाळली आहे. आपण भाजपच्या कोणत्याही नेत्याला भेटायला गेलो नव्हतो असा दावाच लोबोंनी केला आहे. मायकल लोबो यांनी आपण दिल्लीत महंगाई पे हल्लाबोल रॅलीसाठी दिल्लीत गेल्याचं म्हटलं आहे. मात्र लोबोंच्या दिल्लीवारीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
दरम्यान लोबो कुठे आहेत हे माहित नाही म्हणजे ते तुमच्या संपर्कात नाहीत का असा प्रश्न पत्रकारांनी पाटकरांना विचारला. मात्र यावर अमित पाटकर यांनी भाष्य करणं टाळलं. गेले तीन महिने मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देत आलोय. त्यामुळे पुन्हा हा प्रश्न का विचारता अशा शब्दात त्यांनी लोबोंशी झालेल्या शेवटच्या भेटीवरही मौन साधलं. तसंच अपात्रता याचिकेवर 11 किंवा 12 सप्टेंबर रोजी सुनावणी अपेक्षित आहे. याचवेळी विरोधी पक्षनेताही निवडला जाईल. पक्षश्रेष्ठींसह ज्येष्ठ काँग्रेस नेते मुकुल वासनिकही गोव्यात येणार असल्याचं पाटकर यांनी स्पष्ट केलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.