पणजी : अवघ्या तीन महिन्यांवर आलेली जिल्हा पंचायत आणि दीड वर्षावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस नेते त्यासंदर्भात थेट दुजोरा देत नसले तरी कार्यकर्ते चलबिचल झाले आहेत.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या गटातील काहीजणांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. तर, पाटकर यांना तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून न हटवल्यास राजीनामा देण्यासंदर्भातील पत्र राज्य कार्यकारिणी तसेच विविध गटांच्या पदाधिकाऱ्यांनी तयार केले असून, ते पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी रविवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
दरम्यान, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडे पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदी आणण्याचे पक्षश्रेष्ठींनी निश्चित केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. गत विधानसभा निवडणुकीत गिरीश चोडणकर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी होते.
गेली तीन वर्षे प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू असलेली धुसफूस, पडलेले दोन गट आणि त्यामुळे पूर्णपणे विस्कळीत झालेली पक्षसंघटना यांसारख्या गोष्टींमुळे बदलाचे वारे वाहू लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्ष पाटकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
पाटकरांना हटवल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा पाटकर समर्थकांनी दिला आहे. तर, पाटकर यांच्यावर कारवाई न केल्यास सामूहिक राजीनामे देऊ, असे काँग्रेसच्या विविध गटांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या पत्रात म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंदर्भातील पक्षांतर्गत चर्चा अजून तरी माझ्यापर्यंत आलेल्या नाहीत. परंतु, प्रदेशाध्यक्ष बदलू शकतात आणि नाहीही. आगामी निवडणुका विचारात घेऊन श्रेष्ठी अनेक निर्णय घेऊ शकतात.अंजली निंबाळकर, प्रभारी सचिव.
मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने माझ्याकडे ज्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. यापुढे जी जबाबदारी मिळेल, ती स्वीकारण्यास मी तयार आहे.गिरीश चोडणकर, माजी प्रदेशाध्यक्ष.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.