मडगाव: कोळसा विरोधी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करण्याचे संकेत मिळत असून हे आंदोलन चालविणाऱ्या ‘गोंयात कोळसो नाका’ या संघटनेकडून शनिवार १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मडगावच्या लोहिया मैदानावर जागृती सभेचे आयोजन केले आहे.
या सभेला मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या आंदोलनाला सामाजिक कामकाज हाताळणारा चर्चचा विभाग असलेल्या कौन्सिल फॉर सोशल जस्टिस ॲण्ड पीस संघटनेनेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मुरगाव बंदरात जादा कोळसा हाताळण्यासाठी जिंदाल कंपनीला सरकारने दिलेली मान्यता, गोव्यातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेला विस्तार, नवीन बोरी पुल आणि गोव्यात सुरू करण्यात येणाऱ्या नवीन जेटी हे
सारे प्रकल्प फक्त कोळसा वाहतुकीला फायदा व्हावा यासाठी हाती घेण्यात आले असून सरकारचे हे कारस्थान लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही शनिवारी या सभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती गोयात कोळसो नाका या संघटनेचे सहनिमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी दिली.
यापूर्वी आम्ही गोव्यातील कोळसा हाताळणीला तीव्र विरोध केला होता, त्यावेळी सरकारने नमते घेतले होते. मात्र आमचा विरोध कमी झाल्याचे पाहून सरकारने पुन्हा एकदा आपला हा कोळसा अजेंडा पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे.
या कारस्थानाला वेसण घालण्यासाठीच आम्ही पुन्हा एकदा जागृती हाती घेतली असून मडगावातून या जागृती अभियानाची सुरुवात होईल. नागरिकांनी या सभेत सहभागी व्हावे, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
या सभेला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चर्चप्रणित कौन्सिल फॉर सोशल जस्टिस ॲण्ड पीस या संघटनेकडून आवाहन करण्यात आले आहे. जर या कोळसा हाताळणीला विरोध केला नाही तर गोव्यातील पर्यावरणाला हानी पोचणार आहे.
त्यामुळे आमच्या संस्थेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, अशी प्रतिक्रिया या संघटनेचे कार्यकारी सचिव फा. सावियो फर्नांडिस यांनी व्यक्त केली. काल गोव्यातील विविध चर्चमध्ये झालेल्या प्रार्थनेच्यावेळी शनिवारच्या या जागृती सभेला लोकांनी हजेरी लावावी, असेही आवाहन करण्यात आले होते.
गोव्यात कोळशाला विरोध करण्यासाठी जे आंदोलन छेडले जात आहे त्या आंदोलनात गोव्यातील सगळ्या जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले आहे.
सरदेसाई म्हणाले, गोव्यात कोळशाची वाहतूक वाढली तर गोव्यातील पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटन उद्योगावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे गोव्यात कोळशाची हाताळणी वाढवू नका अशी मागणी आंदोलक करत आहेत, पण कोळसा माफियांच्या अधीन गेलेले हे सरकार ते मान्य करत नाही.
त्यामुळे या सरकारला लोकभावना काय हे कळण्यासाठी आता पुन्हा एकदा रस्त्यावर येणे गरजेचे आहे, असे सरदेसाई म्हणाले. गोव्यात होऊ घातलेले रेल्वे मार्ग दुपदरीकरण पर्यटन वृद्धीसाठी असे सरकार सांगत आले असले तरी रेल्वे मंत्रालयाने हे दुपदरीकरण कोळसा वाहतुकीसाठी आहे हे मान्य केले आहे. त्यामुळे गोवा सरकारची दुटप्पी भूमिका स्पष्ट झालेली आहे. गोव्यातील या सरकारवर आता जनता विश्वास ठेवू शकत नाही, असे सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.